Friday, 7 February 2025

गाण्यामागची गोष्ट - सुरमयी शाम इस तरह

"लेकिन" या चित्रपटातील "सुरमयी शाम इस तरह आये" हे गाणे आपण सगळ्यांनी ऐकले असेल. पण त्याच्या मागील एक गंमत आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

या गाण्याची चाल आधी एका मराठी चित्रपटासाठी केली होती. त्या चित्रपटाचे नाव होते आघात. पण हा सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही. 

तर शांताबाईंनी लिहिलेली कविता अशी आहे, 

स्पर्श सांगेल सारी कहाणी, 
शब्द बोलू नकोस आज राणी,

संथ सागराच्या लाटा किनाऱ्यास येती, 
फेनफुले वाळूवर अंथरून जाती,
धुंद हृदयातुनी आर्त गाणी

हाती गुंफिलेले हाती, फुले लाज गाली,
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली,
जन्म-जन्मांतरीची ही विराणी
-- कवियित्री शांताबाई शेळके

कदाचित हे गाणे एका प्रणय (रोमँटिक) प्रसंगासाठी लिहिले गेलं असावे. याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम चाल लावली आहे. 
"लेकिन" चित्रपटासाठी गाणे लिहिले आहे कवी गुलजार यांनी. त्याचे शब्द देखील खूप समर्पक आहेत. 
"सुरमयी शाम इस तरह आए, साँस लेते हैं जिस तरह साये"

सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे गाणे गायलेले आहे. तुम्हाला या गाण्याचे व्हिडिओस युट्युब वर मिळतील. सुरेशजी त्यांच्या कार्यक्रमात देखील कधी कधी "स्पर्श सांगेल" या मराठी गाण्यातून सुरवात करतात आणि "सुरमयी शाम" या गाण्याने शेवट करतात.  या गाण्याची चाल इतकी लडिवाळ आहे की गाणे ऐकल्यावर बराच वेळ ती गुणगुणावीशी वाटते. 

- अभिजीत जोशी,
७ फेब्रुवारी २०२५

Monday, 16 December 2024

वाह उस्ताद वाह

आज पदमविभूषण श्री. झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

मला उस्ताद झाकीरजी यांची पहिली ओळख ही ताजमहाल चहा च्या जाहिरातीमुळे झाली. त्या वेळी खूप वेगळेपण वाटले होते. कारण साधारण १९८८-१९९५ या वर्षांत जाहिरातीमध्ये प्रामुख्याने क्रिकेटपटू किंवा हिंदी सिनेमातील नायक नायिका असायचे. त्यावेळी दूरदर्शन वर रविवारी दुपारी आकाशवाणी संगीत संमेलन असा कार्यक्रम लागायचा. त्यात प्रामुख्याने शास्त्रीय गायकांचे गायन व्हायचे. सोबतीला कधी कधी झाकीरजी असायचे. त्यांच्या तबल्याची जादू नंतर कळायला लागली. 

१९९८ साली त्यांचा साज नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात एक अप्रतिम गाणे होते," क्या तुम ने ये कह दिया". हे गाणे एकदम भन्नाट होते. तबला, बेस गिटार आणि बरीच वेगळी वाद्ये त्यात होती. झाकीरभाईंनी स्वतः या गाण्याला संगीत दिले होते. इंडो-वेस्टर्न फ्युजन असा काहीसा प्रकार होता. त्यात त्यांचे वेगळेपण उठून दिसले होते. 

त्यांचा मी बघितलेला पहिला जाहीर कार्यक्रम पुण्यात गणेश कला क्रीडा मंच मध्ये. त्यानंतर बऱ्याचदा सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांच्या तबला वादनाची जादू अनुभवली. शक्ती, Remembering शक्ती वैगरे बरेचसे कार्यक्रम इकडे प्रत्यक्ष बघायला मिळाले. २०१५ मध्ये न्यूयॉर्क मधल्या कार्नेजी हॉल मध्ये त्यांचा "Celtic Connections" नावाचा अप्रतिम कार्यक्रम बघितला. त्यांना जगातील कोणत्याही प्रकारच्या संगीताचे अफाट ज्ञान होते. जॅझ फेस्टिवल मधील तबलावादन देखील खूप गाजले. 

तबला या साथसंगतीच्या वाद्याला त्यांनी रंगमंचावर मानाचे स्थान दिले. पंडित रविशंकर आणि उस्ताद झाकीर हुसैन या दोघांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर ओळखच नव्हे तर महत्वाचे स्थान मिळवून दिले. 

त्यांच्या तबला tune करण्यात देखील नजाकत होती. नवीन पिढीला ते कायमच प्राधान्य द्यायचे. अमेरिकेत एका  कार्यक्रमात तर त्यांनी तरुण मुलांना अगदी स्टेज वरील सगळ्यात जवळची जागा दिली होती. इतका मोठा कलाकार असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यातील विनम्रता शिकण्यासारखी होती. साथ संगत असो किंवा सोलो वादन असो, त्यांचा रंगमंचावरील वावर अद्भुत होता. 

झाकीर भाई त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करायचे. ते ऐकून पुढील कार्यक्रमात काय सुधारणा करता येईल यावर त्यांचा विचार सुरु असायचा. तबल्यावरील थिरकणारी त्यांची बोटे दैवी संगीत निर्माण करायची. त्याच्या पाठीमागे त्यांची इतक्या वर्षांपासूनची मेहनत दिसायची. त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो..!! ओम शांती...!!

तबल्यावर बरसे, बोटातील जादू, श्रोते सुखावती, नादब्रह्मी।।

असो साथ संगत, वा एकल वादन, तालाचा तो नाद, गुंजी कानी ।।

नव्या पिढीला, प्रोत्साहित करी, संगीत साधना, आयुष्यभरी ।।

तबला नवाज, गेला निघोनि आज, धिनक धिन बोलांची, पसरे स्वर्गातही गाज ।।

-- अभिजीत जोशी, 

१६ डिसेंबर २०२४


Monday, 28 October 2024

आली माझ्या घरी दिवाळी..



हिंदू संस्कृती मधील सगळे सण हे निसर्गाशी जोडले आहेत. गुढी पाडवा ते होळी या कालावधीत साजरे होणारे सगळे सण, सर्व उत्सव हे वातावरणाशी घट्टपणे निगडित आहेत. दिवाळी देखील त्याला अपवाद नाही. 

नवरात्र बसताच दिवाळीचे वेध लागायला सुरुवात होते. दांडिया, गरबा खेळता खेळता कधी दसरा येतो ते कळत नाही. कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिताना वातावरणात एक प्रकारचा बदल जाणवतो. अचानक सकाळ धुक्यात गुरफटून येते.


मुलांच्या सहामाही परीक्षा संपून कोणता किल्ला करायचा याच्या चर्चा सुरु होतात. गृहखाते म्हणजेच घरातील होम मिनिस्टर साफसफाईच्या कामाचा आदेश काढते. टी.व्ही. वर चकली चिवडा मसाल्याच्या जाहिराती सुरु होतात. वृत्तपत्रांमध्ये अनेक खर्चिक जाहिराती (लागू बंधू, पु. ना. गाडगीळ, स्वामिनी (साडयांची महाराणी) वैगरे वैगरे. विशेष नोंद - आम्ही इथे कोणाचीही जाहिरात करत नाही) दिसू लागतात.


बाजारपेठा नवनवीन वस्तुंनी सजतात. रांगोळ्या, आकाशदिवे, पणत्या, झेंडूची फुले अशा अनेक गोष्टी सर्वत्र दिसायला लागतात. दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरु होते. घरोघरी खमंग वास यायला लागतात. चकल्या, लाडू, करंज्या, अनारसे, चिरोटे अन काय काय. हळूच कुठेतरी फटाक्यांचे आवाज ऐकायला येतात.


अंगणात, बाल्कनीत आकाशकंदील डौलाने मिरवू लागतो. रंगांची उधळण करणाऱ्या रांगोळीला, तेजाने तेवणाऱ्या पणत्यांची रोषणाई खुलवू लागते.


फटाक्यांच्या आवाजात, कुटुंबाच्या एकत्र येण्याच्या आनंदात, अंधारावर प्रकाशाचा वर्षाव करत दिवाळी, वाजत गाजत प्रत्येकाच्या घरी येते. 


सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची ||

तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी ||

- संत ज्ञानेश्वर 


या दिवाळी दिवशी पणती लावताना आपल्या मनातील अंधाराचा, वाईट वृत्तीचा नाश होऊन सत्याचा प्रकाश सर्वत्र पसरू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 


तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!! Wishing you all a very happy and prosperous Diwali..!!



-- अभिजीत जोशी,

दिवाळी २०२४


Friday, 11 October 2024

ती येते, आणिक जाते...

 ब्लॉग # ९

ती येते, आणिक जाते...

आज स्वयंपाक काय करावा हा बऱ्याच जणांना किंवा जणींना पडणारा रोजचा प्रश्न. 

रोज काय नवीन लिहावे? हे मला पडलेले एक कोडेच आहे. त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे. कधी कधी नुसतेच काहीबाही लिहीत बसतो. कधी कधी तर कित्येक तास, कित्येक दिवस काही सुचत नाही. यंत्राप्रमाणे माणसाला देखील Down Time असतो. बऱ्याच लेखकांनी, कवींनी या विषयवार खूप काही लिहिले आहे. 

कवी आरती प्रभू एका कवितेत लिहितात, "ती येते, आणिक जाते, येताना कधी कळ्या आणिते, आणि जाताना फुले मागते." (The idea appears and leaves in a flash)

Creativity does not understand the timeline. As a Writer, you must catch the flow of writing. Even a single thought of distraction can derail the entire process.

तुम्हाला कोणत्यावेळी काय सुचेल ते सांगणे अवघड आहे. आर्किमिडीजला बरं का, अंघोळ करताना घनतेचा सिद्धांत आठवला आणि तो तसाच उघडा धावत सुटला. हा विचार त्याला अभ्यासाच्या खोलीत कधी का बरे आला नाही ? 

असाच एखादा विचार सुचला तरी त्या क्षणी कागदावर उतरवणे हे देखील मोठे कष्टाचे काम आहे. कागदाचा चिटोरा, मोबाईल मध्ये draft केलेली note, बसच्या तिकिटाच्या मागे असलेली मोकळी जागा, पत्राच्या पाकिटाची मागची बाजू...अशी कोणतीही गोष्ट त्यावेळी उपयोगी पडते. त्या क्षणाला ओळखणे आणि त्याचा सदुपयोग करून प्रत्यक्षात उतरवणे हे अतिशय अवघड काम.  एकदा का तो विचार मनातून गेला की त्याचे पुढे काहीच होत नाही. तो तसाच कुठेतरी हरवून जातो. 

या सगळ्यांचा अनुभव सांगणारी ही पुढची कविता. 

मनातील भावनांना, शब्दावाटे उतरावे,

ओथंबल्या संवेदनांनी, हलकेच रिते व्हावे ।।१।।

कधी आटतील शब्द, मनी विचारांचे काहूर,

वणवण फिरशील तू, तहानलेला चकोर,

अधिक उणे, का बरे व्हावे, 

अस्वस्थ मनाने, कसे निजावे? ।।२।।

सुचतील शब्द, अचानक मध्यरात्री,

उठवतील तुला, त्या ओलेत्या गात्री,

सतर्क राहून, वेचून घे, 

शब्द शब्द टिपून घे ।।३।।

क्षण हे उत्स्फूर्ततेचे, संचित प्रतिभेचे, 

देणे ईश्वराचे, जाणून घे

अजाणता होई उशीर, शब्द जाती निघून,

कधी येतील परतून, शाश्वती नाही.. ।।४।।

-- अभिजीत जोशी,

११ ऑक्टोबर २०२४

Thursday, 10 October 2024

जग थोडीशी स्वत:साठी

ब्लॉग # ८

ही कविता सर्व स्त्री शक्तीसाठी... आपल्या लहानपणापासून आपण बघत आलो आहोत, घरी आजी, आई, बायको, काकू, मावशी,आत्या वैगरे किती कष्ट करतात. त्या सदैव आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी झटत असतात. आजकालच्या युगात स्त्रिया आपल्या पायावर उभ्या असल्या तरी काही दशकांपूर्वी तशी स्थिती नव्हती. बऱ्याच वेळी त्यांना आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागत होती. 

स्त्रीला देखील तिचे मुक्त आकाश आहे, तिचे स्वतंत्र विचार आहेत, तिची वेगळी ओळख आहे. स्वकर्तुत्वाने वेगळे जग निर्माण करण्याची हिम्मत तिच्यात असतेच. गरज असते स्वत:ला ओळखण्याची आणि संधीची.    

मिळो विसाव्याचा क्षण, कर थोडे आत्मचिंतन,

हातातील वाळूचे कण, बघता बघता जातील निघून,

मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे, 

जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।१।।


कशाला उद्याची भ्रांत, कशाला कालची टोचणी,

आताच्या या क्षणांत, कर आनंदाची वेचणी,

जय पराजयाची चिंता, दैवावर सोडून दे,

मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे

जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।२।।


थकलेल्या शरीरांना, मायेची उब दे,

भरून आलेल्या डोळ्यांना, मोकळी वाट दे,

साचलेल्या जाणिवांना, उडण्याचे पंख दे,

उरतील अभिव्यक्तीला, फुलण्याचे बळ दे,

मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे

जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।३।।


-- अभिजीत जोशी

१० ऑक्टोबर २०२४



Wednesday, 9 October 2024

फंबल, जंबल अणि विडंबन


फंबल, जंबल अणि विडंबन हे तिन्ही प्रकार म्हणले तर एकमेकांशी निगडित आहेत. रंगमंचावर काम केलेल्या किंवा करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला विचारा. त्याच्या आयुष्यात किमान एकदा तरी फंबल आणि जंबल हे झालेले असतातच. त्यात आपली मराठी भाषा म्हणजे तुम्ही म्हणाल तशी ती वळते. याच भाषेचा आधार घेऊन दादा कोंडक्यांनी अनेक विनोदी चित्रपट गाजवले. 

फंबल म्हणजे शब्दांचा गोंधळ. कधी कधी वाक्ये मोठी असतात. कधी शब्द अवघड असतात. कधी ऐनवेळी शब्द आठवत नाही. आणि त्याजागी कुठला तरी वेगळाच शब्द कलाकार म्हणतो. त्यातून बऱ्याचदा हास्यनिर्मिती होत असली तरी सादर करणाऱ्याला मात्र ती मोठी चूक वाटते. मी देखील एका कार्यक्रमात गाण्याचे काही शब्द विसरलो होतो आणि त्याची सल पुढे २-३ दिवस होती. 

एकदा एका लहान मुलांच्या नाटकात शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग होता. सगळी छोटी मुले काम करत होती.  त्यात संवाद असा होता, " मातोश्री, आम्ही शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला लाल महालातून पळवून लावले." त्या छोट्या मुलाला शाहिस्तेखान हा शब्द आठवला नाही. तिथे न अडखळता म्हणाला, " मातोश्री, आम्ही शाहरुख खानाची बोटे छाटून त्याला लाल महालातून पळवून लावले." एकदम प्रेक्षकांमध्ये हास्याची लहर उठली. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या छोट्या कलाकारासाठी जोरात टाळ्या देखील वाजवल्या. 

गाणी म्हणताना तर असे खूप प्रकार होतात. एकदा एक गायक "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो " हे गाणे म्हणत होता. त्याला निरंतर हा शब्द आठवला नाही तर त्याने चक्क "मानसीचा चित्रकार तो, तुझे मी नंतर चित्र काढतो" असे गाणे म्हणले. 
अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमात "धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना" या शब्दांऐवजी "बुंदी तळाना, लाडू वळाना" असे शब्द म्हणले गेले. गायक बहुतेक आचारी असावा. 

मराठी मध्ये विडंबन प्रकार खूप आढळतात. काही लोकप्रिय कवितांची विडंबने तर खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य अत्रे यांनी तर चक्क विडंबन कवितांचा झेंडूची फुले नावाचा कविता संग्रह लिहिला. प्रसाद शिरगावकर हे तर विडंबनावर आधारित गाणी आणि कवितांचा विशेष कार्यक्रम करतात. 

आजकाल तर कोणत्याही गाण्याची सर्रास विडंबन गाणी (Parody Songs) बनवली जातात. निवडणुकांमध्ये, महत्वाच्या राजकीय, क्रीडा सामन्यात तर लोकांच्या सृजनशीलतेला (Creativity) बहार येते. "Spoofs", "Parody", "Meems" हे social media वर खूप लोकप्रिय आहेत. यशराज मुखाते, अथर्व सुदामे अशी कितीतरी नावे आजच्या घडीला त्यांच्या अशा सृजनशील निर्माण (Creative Content) मुळे प्रसिद्ध झाली आहेत. 

असेच एका लोकप्रिय मराठी गाण्याचे केलेले विडंबन. मूळ गाणे - नसतेस घरी तू जेव्हा 

असतेस घरी तू जेव्हा, जीव कावरा बावरा होतो,
वाघाचा होतो बोका, अन कोपऱ्यात जाऊन बसतो,

मी निवांत क्षणी असताना, कर्कश आवाज आदळतो, 
मेंदूचा होतो भुगा अन कानात भोंगा वाजतो

येतात मित्र दाराशी, हिरमुसूनी परतुनी जाती,
खिडकीशी चोरून बघता, सुटकेचा मार्ग न उरतो,

तव दिठीत लखलखणाऱ्या, मज दिसती ठिणग्या लाखो वेळा, 
घशाला पडते कोरड, अन पोटात गोळा येतो,

तू अशी मज बघतेस काय, मी काही नाही केले,
मित्रांचा जीव उदास, माझ्यासाठी तीळतीळ तुटतो,

ना अजून झालो शूर, ना स्मार्ट अजुनी झालो,
तू नसता उमगत जाते, जीव शांत शांत का होतो...

तुम्हाला कोणत्या गाण्याचे विडंबन आठवत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. 

-- अभिजीत जोशी 
९ ऑक्टोबर २०२४

Tuesday, 8 October 2024

Viking च्या देशात Hiking - भाग - २

जेथे सागरा हिमनदी मिळते..

आइसलँड च्या डायमंड बीच बद्दल बरंच काही ऐकले होते. "Vatnajokull" या यूरोपातील सगळ्यात मोठ्या हिमनदीतून बर्फाचे तुकडे सरळ समुद्रात जातात. या पाण्याचा वेग देखील बराच असतो. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पांढरा शुभ्र बर्फ, निळेशार पाणी आणि त्यात तरंगणारे मोठे मोठे बर्फाचे तुकडे. ऊन सावलीच्या खेळात या जागेत तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतात. दिवसाच्या प्रत्येक प्रहराला बर्फाच्या शुभ्र कॅनव्हास वर निसर्गाची जादू तुम्हाला अनुभवायला मिळते. 


या बीचला "डायमंड बीच" हे नाव या वाहत जाणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांमुळे मिळाले. सूर्याच्या किरणांमुळे हे तुकडे हिऱ्यासारखे लकाकत असतात. ज्यांना कुणाला आपल्या प्रिय व्यक्तीला डायमंड भेट द्यायचे असतील त्यांनी इथे घेऊन हवे तेवढे डायमंड गोळा करावेत. :P 

इथल्या अतिशय थंड आणि बर्फाळ वातावरणाचा विचार करता रस्ते ठीकठाक आहेत. आम्हाला बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असलेली आढळली. महत्वाची शहरे वगळता दूरदूरपर्यंत कोणतीही वस्ती नाही. दोन पेट्रोल पंपामध्ये किमान ५० ते १०० किलोमीटर चे अंतर आहे. इथल्या पेट्रोल पंपावर किराणा सामान, दूध, काही खाण्याच्या गोष्टी खूप छान मिळतात.  हा देश इथल्या मांसाहारी पदार्थांसाठी ओळखला जातो. तरी देखील आमच्या पूर्ण प्रवासात अतिशय वेगळ्या शाकाहारी गोष्टी खायला मिळाल्या. पेट्रोल पंपावर मिळणारे फणसापासून बनवलेले बर्गर आता पर्यंत खाल्लेले सर्वात रुचकर बर्गर होते. 

रेनिसफारा बीच (Reynisfjara beach)

हा बीच म्हणजे एखादी सुंदर तरुणी आपल्याला आवडावी आणि नेमकी ती विषकन्या निघावी असा प्रकारचा आहे. एक प्रकारचे शापित सौंदर्य या जागेला लाभले आहे. जगातील अत्यंत धोकादायक आणि तितकाच सुंदर म्हणून हा बीच ओळखला जातो. इथे पाण्यात जायला मनाई आहे. धोकादायक लाटा आणि Sneaker currents मुळे हा बीच बऱ्याच पर्यटकांचे अंतिमस्थान देखील बनला आहे. 

 

ज्वालामुखीच्या राखेतून तयार झालेली काळीभोर वाळू आणि त्यात मधून निघालेले सुळके. वाऱ्याच्या वेगामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे इथला दगड अगदी काटकोनात कापल्यासारखा दिसतो. "Game of Thrones" मध्ये या दगडांचे आणि इथल्या गुहेचे चित्रीकरण झाले आहे. काळ्याभोर पार्श्वभूमीवर समुद्राचे खूप सुंदर फोटो येतात. आमच्या सौभाग्यवतींना या जागेवर रील करायचे होते. त्यामुळे मला कुडकुडणाऱ्या थंडीत, बोचऱ्या वाऱ्यात कॅमेरा पकडून मन भरेपर्यंत चित्रण करायचे होते. एकंदरीत हा बीच आइसलँड मधील सगळ्यात विलक्षण होता. 

खळखळत वाहणारे धबधबे (Foss)

इथले धबधबे अतिशय सुंदर आहेत. थंडीत ते गोठलेले असतात. उन्हाळ्यात त्यांचा प्रपात पाहण्यासारखा असतो. पाणी अतिशय असते. मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे तुम्ही कोणत्याही झऱ्याचे, धबधब्याचे पाणी कुठल्याही फिल्टरशिवाय पिऊ शकता. 

इथल्या भाषेत "Foss" म्हणजे धबधबा. आम्ही इकडे "Seljalandsfoss", "Skogafoss", "Kirkjufellsfoss", "Gulfoss (सोनेरी पाणी) असे वेगवेगळे धबधबे बघितले. "Gulfoss" नावाची सोनेरी फेसाची वारुणी देखील इकडे प्रसिद्ध आहे. हे धबधबे उन्हाळ्यात सुंदर दिसतातच पण हिवाळ्यात Northern lights मध्ये त्यांची शोभा आणखीनच वाढते. 



या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी बरेच चालावे लागते. इथे हायकिंग करताना खूप धमाल आली. 

गरम पाण्याचे झरे (Geysir)

निसर्गाची आणखीन एक किमया म्हणजे इथले गरम पाण्याचे झरे. आइसलँड मध्ये तुम्हाला बरेच Geothermal Power Plants दिसतील. "Strokurr" नावाचा एक गरम पाण्याचा झरा दर २-३ मिनीटांनी ३० मीटर पर्यंत उंच उसळी घेतो. Yellowstone मधल्या "Old faithful" सारखाच हा देखील तितकाच प्रसिद्ध आहे. पाण्याचे तापमान जवळपास १०२ डिग्री असते. मजेशीर गोष्ट म्हणजे कडाक्याच्या थंडीत देखील हा झरा उसळ्या मारतच राहतो. 

इथे काही नैसर्गिकरित्या बनलेले "lagoon" आहेत. इथल्या "Blue Lagoon", "Secret Lagoon" मध्ये तर लोक पैसे मोजून गरम पाण्यात डुंबत राहतात. "Blue Lagoon" तर निळ्याशार गरम पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
 

मध्यरात्रीचा सूर्य (Midnight Sun)

शाळेत असताना नॉर्वे या देशाबद्दल ऐकले होते की उन्हाळ्यात तिकडे सूर्य मावळतच नाही. त्यावेळी खूप आश्चर्य वाटले होते. पण आइसलँड मध्ये देखील उन्हाळ्यातील काही महिने दिवस मावळतच नाही. खाली घेतलेला फोटो हा पहाटे ३ वाजता काढला आहे. दुपारी असतो तसाच सूर्यप्रकाश होता. रेकविक मध्ये तर २१ जूनला "Midnight Marathon" आयोजित करतात. जगातील बरेच लोक या आगळ्यावेगळ्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होतात. 

पहाटे ३ वाजता असलेला सूर्यप्रकाश 

आमचे परतीचे विमान नेमके २० जून ला होते. त्यामुळे या स्पर्धेचा अनुभव घेणे जमले नाही. आइसलँड सारखा वैविध्यपूर्ण देश उन्हाळ्यात आणि थंडीत अत्यंत वेगळा असतो. पुढच्या वेळी ध्रुवीय प्रकाश (Northern Lights) बघण्याचा विचार मनात घेऊन आम्ही परत निघालो. (समाप्त)

-- अभिजीत जोशी 

८ ऑक्टोबर २०२४