Friday, 12 June 2015

जूनचा पहिला आठवडा...!!!

जूनचा पहिला आठवडा अगदी लक्षात राहण्याजोगा. शाळा  आठवडा. साधारण ७-१०  जूनच्या आसपास शाळा सुरु व्हायची.  या आठवड्यात नवीन वर्षाची सगळी खरेदी व्हायची. हा आठवडा म्हणजे नवीन दप्तर, वह्या, क्रमिक पुस्तके, कंपास पेटी इत्यादी गोष्टी ठरविण्याचा कालावधी. कधी एकदा मित्र भेटतात, सुटीत केलेल्या धमाल गोष्टी, आजोळी, मामाकडे किंवा इतर पाहुण्यांच्या घरी केलेला दंगा, या सर्व गोष्टींचा कधी एकदा वृत्तांत सांगतो आणि ऐकतो असे होऊन जायचे. नवीन वर्ग शिक्षक, तासिका, वेळापत्रक या गोष्टींची तयारी. नुसती लगबग असायची.
शाळेच्या सुरवातीलाच म्हणजे साधारण ७ जूनला मृग नक्षत्र लागायचे असे म्हणतात. पाउस आमचा शाळेचा नवीन वर्षाचा सोबती असायचा. पहिल्या पावसातील मातीचा उरात भरून घेतलेला सुगंध अजूनही तसाच मनात घर करून आहे. नवीन पुस्तकांचा, अन नवीन वहीच्या पानांचा देखील…
पाउस सुरु झाला की खताच्या पोत्याची खोपी करायची असा रिवाज. खोपी, सपाता (स्लीपरला) मागे जाड रबर ब्यांड लावून, चिखल काठी खेळत शाळा सुरु व्हायची. कौलारू घरात, कौलारू शाळेत पाउस आमच्या सोबत अभ्यास करायचा, खेळायचा.
रेनकोट, गमबूट, फ्लोटर इ. गोष्टी शाळेतील दिवसात कधी लागल्याच नाहीत. साचलेल्या डबक्यात बुडूक करून पाय मारून पाणी उडवायला धमाल यायची. घरातील एखादे जास्तीचे पोते दप्तरात घालून खोपी नसलेल्या मित्राला देताना खूप भारी वाटायचे.
पाउस सुरु झाला की रोज एखादी चक्कर अनवडीच्या बाजूला व्हायची. अनवडी फुटली का, पाण्याला किती धार आहे, वाडीच्या पुलापाशी किती पाणी आलंय या सर्व गप्पांना उत यायचा. अनवडी फुटली की सायकल धुवायला मित्रांची गर्दी असायची. हौसे, गौसे, नवसे मासे पकडायला गळ लावायचे. मला त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीचं अजूनही कौतुक अन कुतूहल आहे. उकिडवे बसून पाण्यात नजर लावून बसायचे म्हणजे सोपे काम नाही.
हा आमचा मित्र पाऊस, कधी कधी रौद्र रूप धारण करायचा. पंचगंगा, कृष्णा पात्राबाहेर यायच्या. वर्तमानपत्रात बातमी यायची, संततधार. अमुक इतक्या गावांचा संपर्क तुटला. दळणवळण ठप्प. जनजीवन विस्कळीत. इत्यादी, इत्यादी. आमच्या गावात देखील नदीला फुग यायची. नदीपात्राजवळ राहणारी लोके मग शाळेत, देवळात, इत्यादी मध्ये राहायला यायची. आमच्यावर त्यांच्यासाठी शिधा, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू गोळा करायचे काम यायचे. आमच्या शाळेतील गुरुजी अन वरिष्ठ विद्यार्थ्यांसोबत आम्हीही घरोघरी हिंडायचो.
नदीवर पुरात पोहायची स्पर्धा लागायची. पाण्याचा भोवरा कसा फोडायचा, धारेत लागले की कसे पोहायचे, कसा तिरपा हात मारायचा याचे जमिनीवर प्रात्यक्षिक व्हायचे. पोहण अर्थात पोहायला शिकणे अन पोहायला येण हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न असायचा.
नैऋत्य मौसमी पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत मनातील असंख्य आठवणींना प्रवाहित करणाऱ्या पावसाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा. यावर्षी भरपूर पाउस येवो आणि चिंब भिजायला मिळो….

2 comments:

  1. मस्तच की रे...सुरेख!

    ReplyDelete
  2. खरच, आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete