Friday, 26 September 2025

देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव


देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव,
दिशाहीन पांथस्था, उद्या कोणता गाव?

मनाला वाटे ही कोणती परीक्षा,
अनुभवातून उमजून घे तू दीक्षा,
आयुष्याच्या अडचणींचा कुठे असतो सराव?
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।१।।

कधी कातळाचा कठीण चढ, कधी झऱ्याचा उतार, 
कधी रणरणते ऊन, कधी सावली ती गार,
चल पुढे सतत ठेवुनी मनी भक्तिभाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।२।।

प्रयत्नांना मिळेल योग्य दिशेचा आधार, 
यश येई सामोरे, सर्व स्वप्ने साकार,
जिंकशील तू आयुष्याचा डाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।३।।

कळेल तुला या प्रवासातील गंमत, 
दुःखाशिवाय असे का सुखाला किंमत?
ध्येय प्रवास थोर हे सत्य त्रिवार,
दैवाचे देणे आहे अपरंपार,
नको देऊ थारा, शंकेला वाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।४।।

-- अभिजीत जोशी,
२६ सप्टेंबर २०२५

No comments:

Post a Comment