ब्लॉग ६ - स्वयंवर झाले सीतेचे

"सीता स्वयंवर" हा बहुतेक सर्व लेखकांसाठी, नाटकांसाठी अत्यंत आवडता विषय. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी याच विषयावर आधारित नाटकाने मराठी नाट्यसृष्टीची सुरुवात केली होती. हा विषयच एवढा नाट्यपूर्ण आहे. राजा जनकाचे शंकराने दिलेले धनुष्य, त्याने सीतेच्या स्वयंवरासाठी ठेवलेली अट आणि शेवटी राम सीतेचे लग्न. या प्रत्येक प्रसंगात नाट्यमयता भरलेली आहे.
गदिमांनी देखील या काव्यात ते नाट्य पूर्णपणे उतरवले आहे. १० अंतरे असलेल्या या गाण्यात गदिमा, पूर्ण कथा त्यातील छोट्या छोट्या बारकाव्यांसकट आपल्यासमोर उभी करतात जणू काही ते स्वत: त्या प्रसंगी उपस्थित आहेत. सीता माता ही धरणाची कन्या म्हणून देखील ओळखली जाते. तर प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार. म्हणूनच पहिल्याच ओळीत गदिमा लिहितात,
इथून पुढे सगळी गोष्ट काव्य स्वरूपात येते. मराठी भाषेत असलेले समानार्थी शब्द या पूर्ण काव्यात आपल्याला दिसतील. राजा, नृप, कन्या, दुहिता असे शब्द तर आहेतच पण सीतेला ज्या काही नावांनी ओळखले जाते ती देखील इथे वापरली आहेत. जसे की, जानकी, मैथिली, भूमिकन्या,रामांगी इत्यादी.
"मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी,
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी,
फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे,
स्वयंवर झालें सीतेचे"
हा अंतरा म्हणजे ४ ओळीत लिहिलेली हळू हळू फुलत जाणारी प्रेमकथा. सीता स्वतः स्वयंवराच्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभू श्रीरामांकडे ती बघतच राहते. प्रभू रामचंद्रांनी पिनाक धनुष्य उचलताच सीतेच्या मनात आनंद उत्पन्न होतो. "फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे" या ओळीत वापरलेला अनुप्रास/शब्द श्लेष अलंकारामुळे गाण्यात आणखीनच गंमत येते.
"अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे,
मुक्त हासता, भूमिकन्या मनोमनी लाजे,
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे
स्वयंवर झालें सीतेचे"
"तृप्त जाहले सचिंत लोचन" या ओळीत गदिमांनी वधुपित्याच्या मनाची अवस्था सांगितली आहे. सचिंत या शब्दाचे तसे दोन अर्थ होतात. मनाला चिंता असणे आणि आनंदाने डोळे पाणवणे. एकाच शब्दात किती खोल अर्थ दडला आहे याचे उत्तम उदाहरण इथे दिसते.
"पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला,
अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातीची माला,
गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे,
स्वयंवर झालें सीतेचे"
"अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातीची माला" या ओळीत अधीर या शब्दाचा केलेला अनुप्रास अलंकार म्हणजे गदिमांच्या प्रतिभेला साष्टांग नमस्कार आहे. नववधूच्या मनातील अधीरता आणि वरमाला घालताना सौख्याचे मंदिर म्हणजेच सुखी संसाराची स्वप्ने इथे उमटली आहेत.
"अंश विष्णूचा राम, धरेची दुहिता ती सीता,
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता,
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे,
स्वयंवर झालें सीतेचे"
या शेवटच्या अंतऱ्यात गदिमांनी आणि बाबूजींनी कमाल केली आहे. तुम्ही जर गाणे नीट ऐकले तर पहिल्यांदा बाबूजी "आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे " असे गातात तर दुसऱ्यांदा गाताना "आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे" असे शब्द वापरतात. ऐकताना त्यात गंमत येते आणि आता लग्न झाले आहे ही गोष्ट स्पष्ट अधोरेखित होते.
तुम्हाला हे गाणे ऐकल्यावर काय वाटते?
-- अभिजीत जोशी,
२७ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment