काही आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. काही किरकोळ सामान आणायच्या निमित्ताने भार्गवला किराणा दुकानात जायचे होते. भार्गव आणि त्याचे कुटुंब गाडीतून बाहेर निघाले. थोड्या वेळात तो दुकानापर्यंत पोचला. जास्त काही घ्यायचे नव्हते त्यामुळे कुटुंबीय गाडीत बसले होते. भार्गवने गाडी दुकानाच्या समोर लावली आणि सामान आणायला दुकानात गेला.
दुकानात आत जाण्यासाठी सरकता दरवाजा होता. भार्गव पायऱ्या चढून दुकानाच्या दरवाजासमोर गेला. दरवाजा सरकला आणि तो आत शिरला. तेवढ्यात त्याच्या समोरून एक माणूस दोन मोठी खोकी घेऊन गेला. भार्गवला वाटले की तो माणूस पैसे देऊन बाहेर पडेल. पण तो सरकणाऱ्या दरवाजातून पैसे न देता बाहेर पडला. चिंधीचोर असावा बहुतेक. तिथे काम करणाऱ्या माणसाने त्याला अडवायचा प्रयत्न केला. तिथल्या धक्का-बुक्की मध्ये एकाने बंदूक काढली आणि गोळ्या झाडल्याचा आवाज आला.
भार्गवचे कुटुंबीय गाडीतून हे सर्व बघत होते. त्यांनी भार्गवला आत जाताना बघितले होते. त्यानंतर त्यांनी फक्त बंदुकीचा आवाज ऐकला.
भार्गवची बायको माधवी पॅनिक झाली आणि तिने लगेच पोलिसांना फोन लावला. तिची मनस्थिती अतिशय दोलायमान झाली होती. विहान, त्यांचा मुलगा तर सतत रडत होता. गाडीत ते दोघेही लपून बसले होते. विहानच्या शाळेत असे मॉक ड्रील होत असल्यामुळे त्याला तशी सवय होती. पण शाळेतले प्रसंग काही खरे नसतात. इकडे मात्र हा खरा खुरा प्रसंग होता.
भार्गव माधवीला फोन करत होता पण तिचा फोन व्यस्त होता. दोघांना एकमेकांचे फोन लागत नव्हते. ती भार्गवला फोन करत होती आणि तो माधवीला. अचानक तिला आठवले की जर त्याचा फोन चुकून वाजला तर काहीतरी गडबड होईल. ती गाडीत बसून फक्त देवाचा धावा करत होती.
इकडे भार्गवने दुकानाच्या आत देखील गोळीचा आवाज ऐकला आणि तो लपण्यासाठी पळू लागला. त्याच्या सोबत दुकानात आणखी काही लोक होते. ते पण सैरावैरा पळत होते. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे. गोळ्यांच्या आवाजाचा वेध घेता घेता भार्गव लपत छपत दुकानाच्या मागच्या बाजूला पोचला. दुकानात काम करणारे लोक देखील त्याच्यासोबत होते. बाहेर पडायचे का लपून राहायचे हा विचार चालू होता. तेवढ्यात दुकानात काम करणारा माणूस म्हणाला की बाहेर पडा. हा दुकानाच्या मागचा दरवाजा बऱ्याच लोकांना माहिती नाही. तुम्ही सुरक्षितपणे बाहेर पडा. पळत पळत भार्गव गाडीपर्यंत पोचला. तोपर्यंत पोलीस गाडीचा सायरन ऐकायला मिळाला. आता जरा सगळ्यांनाच धीर आला.
भार्गव पटकन गाडीत बसला आणि स्टार्टर मारून गाडी सुरु केली. त्याला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचे होते. ३० सेकंदाच्या आत तो त्या परिसराच्या बाहेर पडला देखील. गाडीत नुसती रडारड आणि भीतीचे वातावरण होते. ७-८ किलोमीटर गेल्यानंतर एके ठिकाणी गाडी थांबवली. भार्गव , माधवी आणि विहान या तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ते अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. विहानची रडारड चालूच होती.
भार्गवने त्यांना सांगितले की आता काळजीचे कारण नाही. आपण सगळे एकत्र आहोत. एकमेकांसोबत आहोत. २० मिनिटापूर्वी जे काही झाले ते एक वाईट स्वप्न होते असे समजा. सगळेजण शांत झाल्यावर त्याने गाडी सुरु केली आणि पुढील प्रवासाला लागले.
भार्गवने अशा घटनांबद्दल ऐकले होते पण प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदा आला. दुकानात गोळ्या बिस्कीट विकत घ्यावे तसे इकडे बंदुका मिळतात. आई वडील मुलांच्या १७-१८ व्या वाढदिवसाला भेट म्हणून देतात. इथल्या मुलांना काय मोठ्या माणसांना देखील सारासार विचार करायची वृत्ती नाही.
त्याच्या मनात कितीतरी वेळ हाच विचार चालू होता की आज काहीही होऊ शकले असते. देवाची कृपा आणि वाडवडिलांची पुण्याई यांच्या जोरावर आपण सर्व कठीण प्रसंगातून बाहेर पडलो.
"घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे" या गाण्याचा ओळी त्याला गाडी चालवताना आठवत होत्या.
एकंदरीतच अमेरिकेत राहताना त्याला सतत वाटत होते, "भय इथले संपत नाही...!!" आणि आता पुढे काय करायचे या विचारात त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला.
---------------------------------------------------------------------
या नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांच्या मनातील भीती दूर होवो, संपूर्ण जगात शांतता नांदो एवढीच त्या दुर्गादेवी कडे प्रार्थना.
-- अभिजीत जोशी,२८ सप्टेंबर २०२५
This blog is all abt my views and thoughts...My Travel experiences across the globe...!!!
Sunday, 28 September 2025
भय इथले संपत नाही (लघुकथा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment