
प्रसंग १- काही वर्षांपूर्वी मी माझ्या एका शल्य-विशारद (Doctor of Surgery / Surgeon) मित्राच्या घरी गेलो होतो. सोबत माझा ४ वर्षांचा मुलगा देखील सोबत होता. माझ्या मित्राने त्याची सगळी हत्यारे स्वच्छ करून ठेवली होती. त्यात डॉक्टरांच्या कात्र्या, सुऱ्या आणि बाकीची उपकरणे होती. माझ्या मुलाने पटकन त्याला विचारले. "काका, मी एक प्रश्न विचारू का?" माझा मित्र म्हणाला, "विचार की?". काका, तुम्ही केस कापता का? (Are you a barber?)
त्याचा हा प्रश्न ऐकताच मी जागच्या जागी उडालो. मी मुलाला विचारले, "अरे तुला कशावरून वाटले? तर तो म्हणाला, " अरे बाबा, याची सगळी हत्यारे मला केस कापायच्या दुकानात पण दिसतात. म्ह्णून मी हा प्रश्न विचारला. माझा मित्राने देखील हा प्रसंग विशेष मनावर घेतला नाही. उलट मस्करीच्या वाटेने जात त्याने माझ्या मुलाला विचारले. " अरे हो, तुझे केस कापायचे आहेत का? मी लगेच कापून देतो." माझा मुलगा पटकन नाही म्हणाला.
त्यानंतर खूप दिवस आम्ही या प्रसंगावरून बरीच थट्टा मस्करी केली.
प्रसंग २ - यावर्षी जून महिन्यात आम्ही एडीनबर्ग (Edinburgh, Scotland) ला गेलो होतो. तिथे रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (Royal College of Surgeons) हे शल्य-विशारद या विषयाशी संबंधित शिक्षणाचे काम करते. हे महाविद्यालय जगातील पहिल्या मोजक्या शल्य-विशारद या वैद्यकीय शाखेशी संबंधित आहे. इसवी सन १५०५ मध्ये याची स्थापना झाली. तेव्हापासून अगदी आजही इथे शल्य विशारद अभ्यासक्रमाचे धडे दिले जातात. जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये याचा समावेश होतो. माझ्या मित्राला इथे मानद FRCS ही पदवी मिळणार होती. आम्ही सगळे इथे त्यासाठी एकत्र आलो होतो.
इथे एक शल्य-विशारद या संकल्पनेला अनुसरून छान संग्रहालय बनवले आहे. यात वैद्यकीय क्षेत्रात कसे बदल होत गेले त्याचा पूर्ण इतिहास मांडला आहे. आम्ही ते संग्रहालय बघत होतो. आयुर्वेदातील सुश्रुत संहितेचा देखील इथे उल्लेख केला होता. सुश्रुत मुनींनी कशा प्रकारे शरीराचे अवयव त्या काळी जोडले होते याची माहिती होती. इजिप्त मधील लोकांचे देखील वैद्यकीय ज्ञान किती प्रगत होते हे देखील इथे नमूद केले होते. एका दालनात सर्व आयुर्वेदिक वनस्पती आणि औषधांचा समावेश होता. हे संग्रहालय तब्बल ५ मजली आहे. Edinburgh गेलात तर एक वेगळा अनुभव म्हणून हे संग्रहालय नक्की बघा.
तर मूळ विषयाकडे आपले थोडे दुर्लक्ष झाले. केशकर्तनकार की शल्य विशारद? (Barber or Surgeon?) असो. इथे एक उल्लेखनीय गोष्ट अशी समजली की, १५ व्या शतकापासून अगदी १७ व्या शतकापर्यन्त इंग्लंड आणि स्कॉटलंड मध्ये न्हावी आणि शल्य-विशारद यांना एकाच श्रेणी मध्ये समावेश होता. बऱ्याच वेळा युद्धांमध्ये न्हावी, प्रथमोपचार करणे, हाडे जोडणे वैगरे गोष्टी करत होते. किंबहुना आजकाल जी सर्जन्स ची हत्यारांची पेटी सुद्धा न्हाव्याच्या धोपटी वरून प्रेरणा घेऊन बनवली आहे. हा उल्लेख इथे अगदी संग्रहालयाच्या सुरवातीलाच लिहिला आहे. ही माहिती वाचताच आम्ही सगळे अवाक झालो. माझा मुलगा पण सोबत होता. ही माहिती वाचताच आम्हाला पहिल्या प्रसंगाची आठवण झाली. मी मुलाला म्हणालो, " अरे तुझे निरीक्षण खरे होते. आम्हाला त्यात मस्करी वाटली होती." माझा मुलगा शांत पणे म्हणाला, " बाबा, त्यात विशेष काय आहे? मला जे दिसले, ते मी विचारले."
कधी कधी मुलांचा निरागसपणा एकदम महत्वाचं काहीतरी शिकवतो. विशेषतः शिक्षणाने एक प्रकारची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधली जाते. त्या पट्टीला मागे सारून बघितले तर बऱ्याचश्या गोष्टी पटकन लक्षात येतात.
Cognitive bias can create blind spot. It’s a reminder that wisdom isn’t just about accumulating knowledge—it’s also about knowing when to question it.
तुम्हाला काय वाटते?
-- अभिजीत जोशी,
२५ सप्टेंबर २५
No comments:
Post a Comment