Saturday, 25 February 2012

मार्सेलिस...


आज मी मार्सेलिस मध्ये आहे...हा भाग फ्रान्सच्या दक्षिणेस आहे..कान्स चित्रपट महोत्सव जिथे होतो तिथून ही जागा साधारणपणे दोन तासाच्या अंतरावर आहे...झुरिक मधून जिनिव्हा मार्गे मी इकडे आलो...मार्सेलिस हे पुरातन काळापासून फ्रान्स चे एक महत्वाचे बंदर आहे...बरीचशी सागरी वाहतूक अजूनही या मार्गाने होते...
खरेतर निस, कान्स,मोनाको हा भाग म्हणजे भटक्यांसाठी पर्वणी आहे...प्रचंड सुंदर समुद्र, त्याला लागून डोंगर आणि आजूबाजूचा भाग...
मार्सेलीसचा समुद्र...टेकडीवरील येशूचा भव्य पुतळा...त्याच टेकडीवरून मार्सेलिस चा दिसणारा आकाशी नजारा..

मार्सेलिस हे पेरीस नंतरचे सगळ्यात मोठे शहर आहे....अजूनही इथे जुने बंदर दिमाखात उभे आहे...फोर्ट सेंट निकोलस आणि फोर्ट सेंट जीन्स यांच्या बरोबर मधून एक चिंचोळी खाडी जाते...

हा समुद्री किल्ला बघून मला पटकन सिंधुदुर्गची आठवण झाली...
मला खरोखर फ्रान्स मधील रसिक लोकांचे खूप कौतुक वाटते.. सुंदर, आखीव आणि रेखीव इमारती...सेंट चार्ल्स रेल्वे स्टेशन...
 साधा खांब जरी उभा करायचा तरी त्यावर इतकी सुंदर कलाकुसर की बस्स...
ही रसिकता इथे मला वाटते रक्तातच असावी...

मी इथे निव्वळ भ्रमंती साठी आलो नाही...या शहराने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आहे..

हे मार्सेलिस बंदर...या भिंतीच्या आत सुरक्षित पणे असलेले...मी पाण्यात हात टाकला...प्रचंड गार पाणी लागले...काही क्षणातच हात गोठतो की काय असे वाटले...

इथे सावरकरांनी ८ जुलै १९१० मध्ये मोरिया बोटीतून समुद्रात उडी टाकली होती वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी अशा थंडगार पाण्यात बिनदिक्कत पणे उडी टाकली...आणि पोहत पोहत ते या किनाऱ्यावर आले होते...
हीच ती भिंत असावी..या भिंतीवरून पळत पळत त्यांनी फ्रांसची भूमी गाठली असेल ...
ही भिंत बघून अंगात पटकन एक वेगळीच जाणीव होऊन गेली...या समुद्राने, या लाटांनी किती इतिहास बघितला असेल...
त्यांच्या या ऐतिहासिक उडीमुळे जागतिक राजकारण वेगळ्याच वळणावर गेले...असे पण ऐकिवात आहे की फ्रान्स च्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष त्यांना देखील लोकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले होते..
मी पण २८ व्या वर्षी या जागेला भेट देतोय...मी त्यांच्या तुलनेत कणभर पण नाही...
खूप दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात या जागेसंबंधी एक बातमी वाचली...सावरकरांचे स्मृती स्मारक मार्सेलिस मध्ये बनविणार आहेत ..पण दुर्दैवाने अजूनही भारत सरकार, स्मारकासंबंधी लागणारी कागदपत्रे आणि सावरकर यांच्या विषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे...थोडेसे वैषम्य वाटले...साहजिक आहे...
भारतात महात्मा गांधी सोडले तर बाकी कुठल्याही नेत्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही... भारतीय स्वतंत्रता संग्रामातील सर्वच नेते आणि कार्यकर्ते एकाच ध्येयासाठी लढले...
उदात्तीकरण मात्र फक्त गांधीजींचे करण्यात आले...अजूनही केले जात आहे..गांधींचे विचार आणि आचार कुठलाही पक्ष, कुठलाही नेता आचरणात आणत नाही ही गोष्ट वेगळी...
या उदात्तीकरणाच्या नादात नकळत गांधीजींना छोटे केले जाते...सकाळी प्रचार सभेत वेगळेच गांधी आणि बाकीच्या वेळी दुसरेच...
मला कधी कधी या गोष्टीचे खूप मस्त वाटते...बरे झाले की सावरकरांचे असे उदात्तीकरण नाही झाले...त्यांच्या सारख्या प्रखर देशभक्ताला मृत्यू पश्चात अशी अवहेलना कदापि सहन झाली नसती...

व्यक्तीपेक्षा देश मोठा...आणि देशासाठी काहीही करण्यास तयार...विज्ञाननिष्ठ भारत बनविण्याचे त्यांचे स्वप्न आता कुठे साकार होताना दिसत आहे...
पुढील आठवड्यात जागतिक मराठी दिवस आहे...मराठी विषयी असणारी त्यांची ओढ आणि मराठी भाषेचे केलेले शुद्धीकरण त्यांनी अनुवाद केलेल्या मराठी शब्दांच्या सामार्थ्यावरून दिसून येते...महापौर,दूरदर्शन, दूरध्वनी,तारयंत्र असे अनेक शब्द आज सापडतील....
हा पहिला राजकीय कैदी ज्याचे परकीय कैदेतून सुटून जाण्याचे धाडस...मार्सेलिस ऐतिहासिक उडी व अटक.. त्यावेळी म्हणजेच १९१० मध्ये बऱ्याच जागतिक न्याय यंत्रणेवर चर्चेत होते...अजूनही गुगल केले तर त्या संदर्भातील बरीचशी माहिती मिळेल...

माझ्या माहितीतील एकमेव कवी, लेखक ज्याने त्याच्या कविता आणि लेख, तुरुंगाच्या भिंतींवर लिहिल्या आहेत... आपल्या साहित्य कृतीच्या हजाराहून अधिक ओळी जश्याच्या तश्या लक्षात ठेवणे अन तुरुंगातून बाहेर आल्यावर त्या प्रतिलिपीत करणे...प्रचंड विद्वत्ता आणि गुणवत्ता लागते त्यासाठी..
म्हणूनच "जयोस्तुते.." किंवा "सागरा प्राण तळमळला.." ऐकताना अंगावर शहारे येतात..."शत जन्म शोधताना.." किंवा शिवरायांची आरती देखील अशीच प्रेरणादायी आहे..
एकाच जन्मात सावरकर अनेक जन्म जगले होते...सावरकरांनी ऐच्छिक आत्म समर्पण केले...त्याला देखील उद्या म्हणजेच २६ फेब्रुवारीला ५६ वर्षे पूर्ण होतील...
आज भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आणखी एक महत्वाचे शहर बघताना खूप भरून आले...
   या लाटांना आणि त्या फेसाला बघून सावरकरांच्या या ओळी आठवल्या..

या फेनमिषे, हसशी निर्दया कैसा...का वचन भंगिसी ऐसा...
मार्सेलिस च्या या लाटांना देखील असेच वाटत असेल...
वीर सावरकरांना भावपूर्ण आदरांजली...

3 comments: