Friday, 24 December 2010

एक वेगळी वाट...

आमच्या कार्यालयात विज्ञान जागृती महिना (Science Awareness Month) जोरात सुरु होता...आम्हाला एका आगळ्या वेगळ्या शाळेची माहिती मिळाली..रायरेश्वर किल्ल्यावरील जिल्हा परिषदेची शाळा...आम्ही ६ फेब्रुवारी २०१० रोजी शाळेत जायचे ठरवले..हा सगळा भेट आराखडा माझा १ सहकारी मित्र निखील नाईक, राजू शेळके आणि गोपाळ जंगम यांच्या सहकार्याने ठरविण्यात आला...बहुतेक वेळेला दुर्ग भ्रमंतीच्या निमित्ताने किल्ल्यांवर येणे जाणे व्हायचे..पण या वेळेला थोडेसे वेगळे करायचे ठरविले.रायरेश्वर किल्ला हा समुद्रसपाटीपासून १३९८ मीटर उंचीवर आहे..


आम्ही म्हणजे मी आणि स्वप्नील दोघांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता कोथरूड पुणे इथून सुरुवात केली..आधी आम्ही ४ जण जाणार होतो, पण ऐनवेळेला २ जण रद्द झाली..मग आम्ही दुचाकीवरून जायचे ठरविले...स्वप्नील ने २ पाठपिशव्या घेतल्या..१ कपड्यांची आणि दुसरी वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रात्यक्षिकांची...राष्ट्रीय महामार्ग ४ खूपच सुंदर वाटत होता..हवेत मस्त गारवा होता आणि सुदैवाने रहदारी पण कमी होती..जाताना आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो..खेड शिवापूर ओलांडल्यानंतर पहिली विश्रांती घ्यायची असे ठरविले. आम्ही वरवे बुद्रुक जवळ चहा घेण्यासाठी थांबलो. भोर फक्त २० किमी अंतरावर होते...
आम्ही रात्रीच्या मुक्कामाची सोय रावडी इथल्या शाळेतील वसतिगृहामध्ये केली होती..आमच्या कार्यालयाने मागील वर्षी इथे संगणक प्रयोगशाळा उभी करून दिली होती..तिथले मुख्याध्यापक ओळखीचे होते..आणि आमच्याजवळ त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक होता..मला भोर पर्यंतचा रस्ता माहित होता..पण पुढे रावडी पर्यंत कसे जायचे ते माहित नव्हते. आम्ही १०.१५ वाजता भोर मध्ये पोचलो..ती रात्र चांदण्यांनी भरलेली होती..त्यामुळे खुपदा दुचाकीचा पुढील दिवा बंद करून नैसर्गिक प्रकाशी मजा घेत पुढे जात होतो..हा रात्रीचा शांततामय प्रवास खूपच सुंदर होता..भोर पासून महाडला खूप वेळा गेलो असल्यामुळे आंबेघर इथून डावीकडे जायचे हे माहित होते..
आंबेघर - अंबवडे - नाझरे - कार्नावडे आणि रावडी. हा रस्ता खूपच शांत होता..लोड शेडींग मुळे ही शांतता जास्तच सुंदर भासत होती...एवढ्यात समोरून २ डोळे चकाकताना दिसले..एकदम जंगली जनावर असल्याचा भास झाला..नंतर दिसले की तो रानटी जंगली कुत्रा होता..काही क्षणासाठी माझ्या मनात खूप सारे विचार येऊन गेले...
आम्ही रावडीच्या शाळेत रात्री ११ वाजता पोहोचलो..तिथले शिक्षक आमची वाट बघत होते. या शाळेला भले मोठे क्रीडांगण आहे. तिथून स्वच्छ आकाश, गार वारा आणि ताऱ्यांच्या प्रकाशात आम्ही खूप वेळ क्रीडांगणात फिरत होतो..बालपणीच्या शाळेनंतर एवढे विस्तीर्ण क्रीडांगण खूप वर्षांनी अनुभवत होतो...ती शांतता भारावून टाकणारी होती..


आमचा शनिवार सकाळी ५.३० वाजता सुरु झाला..भ्रमणध्वनी मधील गजराने वेळेवर जागे केले...आम्हाला लवकर सुरुवात करायची होती..किल्ल्यावरून दिसणारा सूर्योदय आम्हाला चुकवायचा नव्हता...तिथल्या १ शिक्षकांकडे गरम गरम मसाला चहा घेऊन आम्ही आमची पुढील वाटचाल सुरु केली..आम्हाला अजून १५ किमी अंतर कापायचे होते..कोर्ले हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे...सकाळी ६.१५ वाजता आम्हाला कोर्ले गावातून भोर ला जाणारी पहिली बस दिसली...आम्ही कोर्ल्यात ७ वाजता पोहोचलो..गाव जागे होत होते...गावातील माणसे दुग्धालयात दूध जमा करण्यासाठी लगबगीने येत होती..बायका विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाऊ लागल्या होत्या..म्हातारी मंडळी शेकोटी पेटवून थंडीचा आनंद घेत होती...


कोर्ले गावातून आम्हाला साधारण ७ किमी अंतर चालत पूर्ण करायचे होते...तिकडून १ दुसरा रस्ता पण गडाच्या लोखंडी शिडीजवळ जात होता...पण आम्हाला तो गडावर पोचल्यावर कळला...आम्ही गाडी घेऊन पुढे जाऊ लागलो..चढाचा रस्ता आणि काम सुरु असल्यामुळे एक चतुर्थांश अंतरापर्यंत गाडीने साथ दिली...पुढचा रस्ता पूर्ण दगडांनी भरलेला होता..त्यामुळे सावलीत गाडी लावून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली..सकाळचे ७.१५ झाले होते...सुर्योदयापुर्वीचे दृश्य खूपच रमणीय होते...निसर्गाच्या त्या रंगांना कशाशीच तोड नाही...
सूर्योदयाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे...केंजळगडाच्या मागील बाजूनी पहिल्यांदा किरणांचा ओघ सुरु झाला...आणि पुढच्या २० मिनिटामध्ये सूर्याने आपली दिवसाची कलाकारी पूर्ण केली...


दोन्ही बाजूने गच्च झाडांनी वेढलेल्या वाटेतून जाताना खूप छान वाटत होते...माणसाने सगळी दु:खे आणि काळज्या विसरून जाव्यात असाच तो रस्ता आहे...
हळू हळू लोखंडी शिडी खूपच जवळ दिसू लागली..सकाळचे ७.५० झाले होते...आम्ही सिमेंट च्या पायऱ्या चढू लागलो...गुडघ्यातून वेदना होतात या पायऱ्या चढताना


आम्ही आमचा पहिला टप्पा पूर्ण केला होता..आणि बरोबर सकाळी ८ वाजता आम्ही शाळेजवळ पोहोचलो होतो...मी गोपाळ जंगम यांना फोन केला..त्यांना पण आमच्या चालण्याच्या वेगाचे कौतुक वाटले..आम्ही बरोबर वेळेत पोचलो होतो..On Time Performance...
गायमुखाजवळ पाण्याचा हौद आहे..तिथून आम्ही देवळाकडे निघालो..


हा किल्ला, हे देऊळ खूपच प्रेरणादायी आहे...छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ इथेच घेतली होती...देवळासमोर शाळेची १ खोली आहे...


रायरेश्वरावरील शाळा शनिवार असल्यामुळे सकाळी ८ वाजता सुरु होते..पण अजून शाळा सुरु व्हायची होती...तेवढ्यात गोपाळ जंगम देवाची पूजा आटोपून प्रसाद घेऊन आले..बोलता बोलता त्यांनी गडाची १ चक्कर मारून येऊ, तोपर्यंत शाळा सुरु होईल असे सुचविले...त्यांच्या घरी पण आम्हाला गरम वाफाळता चहा मिळाला..चहा बरोबर आमच्या बाकीच्या गप्पा पण सुरु होत्या..
-- गडावर जवळपास ४५० लोकवस्ती आहे.. पुरुष - स्त्री ५०% प्रमाण आहे...गडावरील बहुतेक लोक हे एकतर म्हातारी माणसे किंवा लहान मुले आहेत..तरुण पिढी रोजगारासाठी कधीच गड सोडून शहराकडे गेली आहे...शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे...शाळा सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे..जे लोक १०वी पर्यंत शिकले, ते सध्या रोजगारासाठी पुणे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये आहेत...कदाचित येत्या काही वर्षांमध्ये तुम्हाला इथे फक्त म्हातारी माणसेच दिसतील... :(
-- गडावरील जमीन ही शिवाजी महाराजांनी रायरेश्वर देवळाला इनाम स्वरुपात दिली आहे..सुदैवाने गडावर पाण्याची आणि जनावरांची खूप चांगली सोय आहे..शुद्ध हवेमुळे लोक क्वचित आजारी पडतात...मात्र जर एखादी वैद्यकीय आणीबाणी आली तर किमान ५ ते ७ किमी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही...आरोग्य केंद्र कोर्ले गावात किंवा वेळे गावात आहे...


-- भ्रमणध्वनी तंत्रामुळे इथे तुम्हाला प्रत्येक घरटी १ तरी संच आढळेल...संभाषण दळणवळणाचा हा एकमेव पर्याय आहे...आणि हा खूप प्रभावी आहे असे गडावरील लोकांशी बोलताना जाणवले..


-- गडाचे क्षेत्रफळ पाचगणी पठारापेक्षा थोडे कमी आहे...गडाच्या पश्चिमेला राजगड आणि तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो...उत्तरेला भाटघर आणि दक्षिणेला धोम धरण दिसते...महाबळेश्वर आणि पाचगणी हे गडाच्या आग्नेयेला दिसतात...
-- केंजळगड हा पूर्वेला आहे...सकाळच्या वेळी ही सर्व दृश्ये निव्वळ अप्रतिम ...


आम्ही शाळेकडे परत आलो..सकाळचे वाजले ८.४५ वाजले होते...मुलांनी प्रार्थना संपवून योगासने करण्यास सुरुवात केली होती...ही सर्व मुले शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील कट्ट्यावर बसली होती..
-- या शाळेला २ रहिवासी शिक्षक आहेत...जवळपास २० विद्यार्थी इथे शिक्षण घेतात...बालवाडी पासून ५ वी पर्यंतचे शिक्षण इथे होते..मात्र या पुढे शिकायचे असेल तर कोर्ले गावात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.. ( रोज किमान १० किमी चालणे...) किंवा मग घरातील गाई म्हशी सांभाळणे...


-- आम्ही आमच्या प्रयोगांची सुरुवात इंजेक्शन पासून केली..हवेचा दाब कसा तयार होतो आणि त्यामुळे इंजेक्शनची बंदूक कशी चालते हे आम्ही सांगितले...इथली मुले पण खूप उत्सुक आणि धाडसी आहेत..आम्हाला खूप प्रश्न त्यांनी विचारले...आम्ही पुढचा प्रयोग सुरु केला..

-- रबरी फुग्यामध्ये ५० पैशाचे नाणे टाकून जर फिरवले तर मध्योन्सरी (centrifuge) तयार होते... इथल्या काही मुलांनी जत्रेत मौत का कुआ बघितला होता. त्यांनी बरोबर त्याचे तत्व सांगितले...फुग्यात जर भोक पडलेले नाणे टाकले तर जास्त जोरात आवाज येतो...याचे कारण पण हवेचे घर्षण होय...


-- याच फुगा व सुईच्या सहाय्याने पृष्ठीय दाब (Surface Tension) आणि त्याचा लंब दाबाने ( perpendicular/ tangencial force) होणारा परिणाम स्वप्नील ने समजावून सांगितला..
-- फुगा आणि पोकळ प्लास्टिक नळी च्या सहाय्याने हेलीकॉप्टर, हवेवर चालणारी गाडी आम्ही बनवून दाखविली...आणि मुलांना पण बनवायला दिली...


-- सगळ्यात जास्त मज्जा आली ती फुगा, रिकामी बाटली यांच्या सहाय्याने केलेल्या वजनाची हालचाल.. (mass displacement by volume)...आम्ही बाटलीतील पाणी कमी जास्त करून विस्थापित कराव्या लागणाऱ्या दाबावर काय फरक पडतो ते समजावून सांगितले...


या प्रयोगांमुळे मुलांच्या मनातील शंका पटकन दूर झाल्या ...


-- हवेच्या दाबाने चालणारी लिफ्ट पण खूप काही शिकवून गेली...या मुलांच्या डोळ्यातील चमक पाहून खूप बरे वाटले...


-- २ रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांच्या मदतीने पाण्यात भोवरा कसा तयार होतो आणि त्याचे तत्व खूप सोप्या पद्धतीने स्वप्नील ने समजावून सांगितले...तिथल्या शिक्षकांना देखील हे सोपे आणि घरातील वस्तूंपासून तयार करता येणारे प्रयोग बघून खूप उत्सुकता जाणविली...


-- या सगळ्या काळात आम्ही घड्याळाकडे बघायचे विसरून गेलो..एव्हाना ११.४५ झाले होते...म्हणता म्हणता आमचे हे प्रयोग 2 तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होते..त्यानंतर मुलांनी कविता, प्रार्थना म्हणली..


-- रायरेश्वरावरील शंकराचे दर्शन घेऊन खूप स्फूर्ती मिळाली...इथेच महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती...


-- आम्ही १२.१५ वाजता गड उतरण्यास सुरुवात केली... मला आणि स्वप्नीलला टाटा करायला ही मुले दूरपर्यंत चालत आली...
-- उतरताना पण खूप सुंदर नागमोडी रस्ता दिसत होता...लाल मातीचा रस्ता...


-- येताना वाटेत खूप सारी वेगवेगळी फुलपाखरे दिसली...आम्ही १.३० वाजता कोर्ले गावात पोहोचलो..
-- वाटेत अंबवडे गावामध्ये १९१० साली भोर संस्थान काळातील झुलता पूल लागला...अजूनही सुस्थितीत आहे हा...मी नकळत भूतकाळात हरवून गेलो...१९९६ साली एका शिबिरासाठी मी इथे आलो होतो...


-- इथल्या पाझर तलावाच्या काठावर आम्ही बेस बॉल खेळलो होतो...जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या...ही जागा तशीच आहे...फक्त माझे वय वाढले आहे..


-- आम्ही रावडीच्या शाळेत जेवण केले..तिथल्या मुलांनी पण वैज्ञानिक प्रयोगांचे सत्र घ्या म्हणून आग्रह केला...पण आम्ही आमच्याकडचे साहित्य गडावरील शाळेला भेट देऊन आलो होतो.. रावडी इथल्या शाळेत आम्ही लवकरच परत येऊ असे सांगून निरोप घेतला...
-- परतताना खूपच बरे वाटत होते...एक नवीन प्रयोग आम्ही केला होता...दुर्गभ्रमंती आणि विज्ञान ... काम फत्ते झाले होते...जवळपास महिनाभर रेंगाळत होते...
-- परतीच्या वाटेवर लक्षात राहिले ती या मुलांची जिद्द, प्रेरणा आणि डोळ्यांमधील शिक्षणाची स्वप्ने....


( प्रकाशचित्रे - नोकिया ३५०० - अभिजीत आणि एन ७२ - स्वप्नील ...)
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडतील...

2 comments:

  1. It feels like almost there while going through this blog. One of memorable days.

    ReplyDelete