Wednesday, 1 October 2025

"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा"

प्रथमतः गदिमा यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. शेटफळे ते पुणे असा जो मराठी भाषेतील आधुनिक वाल्मिकी यांचा प्रवास आहे त्याला शतशः नमन. मीच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्या गदिमांची साहित्यसंपदा वाचून, ऐकून, बघून मराठी भाषेचा आनंद अनुभवतील यात काही शंकाच नाही.


गीतरामायणातील आजचे गाणे आहे. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
"यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ | समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागम: ||" या संस्कृत श्लोकावर आधारित गदिमांनी हे गाणे लिहिले.
या गाण्यात गदिमांनी जे जगण्याचे सार, सूत्र मांडले आहे ते कालातीत सत्य आहे. हे गाणे म्हणजे कोणत्याही दुःखावर हळुवारपणे फुंकर घालून, माणसाला नवीन उमेद, नवीन आशा देणारे आहे. त्याच बरोबरीने माणसाने आपला कर्मयोग कधीही विसरू नये हे देखील सांगते.

दैवजात दुःखें भरतां, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा ।। धृ।।
तसे बघायला गेले तर हे गाणे रामायणातील कथेला पुढे नेण्यासाठी रचलेले आहे. राजा दशरथाच्या निधनानंतर भरत, राम आणि लक्ष्मण यांना ही दुःखद वार्ता देण्यास येतो. त्याचबरोबर आता राज्यकारभार हाती घ्या म्हणून आर्जवे देखील करतो. पण प्रभू श्रीराम आपल्या पित्याला दिलेल्या वचनाशी बांधील असतात.


माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात,
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात,
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।१।।

आयुष्यात प्रत्येक प्रसंगी हा धडा आपण घेतला पाहिजे. माणसांच्या यशात आणि अपयशात बरेच घटक कारणीभूत असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. मनुष्य हा अशा क्षणी हतबल, असहाय असतो. त्यामुळे अपयश जरी आले तरी स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नसतो. त्यापेक्षा परिस्थितीला स्वीकार कर आणि पुढे जात राहा.
म्हणून प्रभू श्रीराम सांगतात की माता कैकयी, पिता दशरथ यांच्यापैकी कुणालाही दोष देता येणार नाही. हा सगळ्या माझ्या नशिबाचा खेळ आहे. त्यांचा राज्याभिषेक ते १४ वर्षे वनवास या नियतीच्या फेऱ्यात कधी कुठे गणित बिघडले आणि सिंहासनाऐवजी जंगलात राहणे आले.

या पुढच्या दोन्ही अंतऱ्यात गदिमा पूर्ण आयुष्याचे तत्वज्ञान सांगतात. माझ्या दृष्टिकोनातून हे दोन्ही अंतरे म्हणजे कमीत कमी शब्दात सांगितलेले वैश्विक सत्य. जगातील कोणत्याही तत्वज्ञानाची पुस्तके किंवा ग्रंथात जे सांगितले आहे ते गदिमांनी फक्त ६ ओळीत लिहिले आहे. आणि इथेच या ओळी रामायणपुरत्या मर्यादित न राहता त्याच्याही पुढे जाऊन कालातीत होतात.

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत,
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत,
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।२।।

जगातील सगळया संस्कृती कधी ना कधी तरी लयाला गेल्याच. देशांचे उदाहरण घ्या. एकेकाळी समृद्ध असणारा हिंदुस्थान पारतंत्र्यात सापडला. युरोपातील अनेक देश म्हणजे फक्त अवशेष जपून ठेवणारी संग्रहालये झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थावर गोष्टींचा माज करू नकोस. कधी ना कधी तरी या गोष्टी लयाला जाणार आहेतच.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात,
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत,
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।३।।

आपल्या जीवनाचे रहाटगाडगे देखील जन्म आणि मृत्युच्या या चक्रात फिरत राहते. त्यामुळे स्वप्न बघत रहा. जरी ती पूर्ण झाली नाहीत तरी त्याचा शोक करू नकोस. आपल्या कर्मयोगावर चालत राहा. मरणाच्या पुढे काय आहे हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे जे माहिती नाही त्याची चिंता करू नकोस.

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत,
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात,
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।४।।

पृथ्वीवरील प्रत्येक जण काही ना काहीतरी दुःखातून जातच असतो. त्यामुळे तू एकटाच दुखी आहेस असे समजू नकोस. कुणी दुःख बोलून दाखवतात, कुणी दाखवत नाहीत. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो.

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?,
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?,
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।५।।

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट,
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ,
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।६।।

या अंतऱ्यात दोन ओंडक्यांचे सुंदर रूपक वापरले आहे. आपल्या सभोवती अशी कितीतरी उदाहरणे असतात.आपण आपल्या आई वडिलांना सोडून दूर देशी येतो, आपली मुले कॉलेज च्या निमित्ताने घराबाहेर पडतात, आपले शेजारी सोडून जातात, मित्र-मैत्रिणी बदलीच्या निमित्ताने, व्हिसाच्या निमित्ताने दुसरीकडे स्थायिक होतात. हे भेटणे आणि एकमेकांपासून दूर जाणे होतंच असते. त्यामुळे जेवढा सहवास आहे तो मस्त आनंदात साजरा करा. 

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस,
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास,
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।७।।

"नको आसू ढाळू आता, पूस लोचनांस," या पहिल्या दोन ओळी बऱ्याच प्रसंगात उपयोगी येतात. प्रेमभंग असो, किंवा एखादी भागीदारी बंद करणार असो, प्रत्येकाचा वेगळा प्रवास आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन पुढे मार्गस्थ व्हा.

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ,
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ,
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।८।।

नवव्या अंतऱ्यात गदिमांनी यमक जुळविताना चौदा वर्षे वनवास ही गोष्ट "दशोत्तरी चार" या पद्धतीने वापरली आहे. विशेष म्हणजे "सत्य हे त्रिवार" ही ओळ बाबूजींनी गाण्यात ३ वेळा गायली आहे. इथेच या दोघांचे आपल्या कलेवरील प्रभुत्व सिद्ध होते. बाकी उरलेल्या अंतऱ्यात कथा पुढे सरकत राहते.

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार,
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार,
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।९।।

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत,
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत,
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।१०।।

आयुष्याचे हे सुंदर तत्वज्ञान स्वरबद्ध करताना बाबूजींनी यमन रागाचा वापर केला आहे. त्यांच्या शब्दोचारात पोटफोड्या "ष" आणि शहामृग "श" हे दोन्ही वेगळे ऐकू येतात. हे गाणे गाताना बाबूजींच्या भावना देखील एका क्षणात ऐकणाऱ्याच्या हृदयात जातात.

हे गाणे फक्त गीत रामायणापुरते न राहता आयुष्याचे सूत्र सांगते. कोणतीही खडतर परिस्थिती असो, कोणालाही दोष न देता सारासार विवेक वापरून, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून कर्मयोग करत राहणे म्हणजेच प्रभू श्रीरामाने दाखवलेल्या मार्गावर चालत राहणे.
-- अभिजीत जोशी,
१ ऑक्टोबर २०२५

No comments:

Post a Comment