Sunday, 10 July 2016

तब्येतीला पाव


सूचना- या प्रसंगातील सर्व घटना अन व्यक्ती काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कधी कधी काही प्रसंग एकदम कुठल्याशा कारणाने अचानक आठवतात अन आपसूक हसू येते. परवा असाच एक चित्रपट बघताना हा किस्सा आठवला.
माझा नवीन रूम पार्टनर तसा थोडा वयाने मोठा होता. साधारण चाळीशी गाठलेला. त्याला आम्ही सर्व मित्र आदराने काका म्हणायचो. तर काका तसे टापटीप. वय वाढत असल्यामुळे तब्येतीविषयी जरा जास्तच जागरूक होते. ते त्या देशात तसे नवीनच होते. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस मला त्यांच्या सोबत बऱ्याचदा खरेदीसाठी जावे लागे.
काका प्रत्येक वस्तू घेताना अगदी निरखून पारखून घेत असत. पहिल्यांदा मला थोडेसे आश्चर्य वाटले. मी त्यांना सहज म्हणून विचारले की काय एवढे बघताय? तर त्यांनी मला त्या पदार्थातील जीवनसत्वे (व्हिटॅमिन), प्रथिने(प्रोटिन्स), उष्मांक(कॅलरीज) यांचा पूर्ण इतिहास सांगितला.इतकेच नव्हे तर त्यातील घटक तब्येतीसाठी कसे आहेत हे देखील सांगितले. एका पदार्थाचा नव्हे तर नंतर त्यांनी जे जे पदार्थ घेतले त्या सर्वांचा. मला नंतर असे वाटले की हा प्रश्न मी का विचारला? भली मोठी कॅसेट लावली त्यांनी.  त्यांच्या बरोबर खरेदी साठी जाणे अन मेडिकल दुकानात काम करणे एकसारखेच आहे. एकदा असा अनुभव आल्यावर मी कानाला खडा लावला. या प्रसंगानंतर मी त्यांच्या बरोबर दुकानात जाणे टाळू लागलो.

काही दिवसांनी काकांनी दुकानातून खूप शोधाशोध करून एक नवीन प्रकारचा पाव आणला. पंच धान्यांचा पाव (Five Grain Bread) आणला. काका आल्या आल्या त्याचे कौतुक सांगू लागले. तसा त्यांचा आणि माझा संवाद आंग्ल (english) भाषेतूनच व्हायचा. (वाचकांनी आपला कोणताही हेल काढून बोलणारा दाक्षिणात्य मित्र नजरेसमोर आणून त्याची भाषा कशी असते ते समजून घ्यावे. वाचनाचा आणखीन आनंद मिळेल). "अभिजीत आय टेल यु, दिस ब्रेड ईज्ज वेरी वेरी हेल्दी. यु नो दिस....." काकांनी त्यांची रेकॉर्ड सुरू केली. मग त्यातील गहू, बार्ली, नाचणी आणि इतर धान्याचे विश्लेषण ऐकून मला परत ७ वीच्या वर्गात गेल्यासारखे वाटले. नेहमी प्रमाणे आमचे जेवण झाले. काकांनी त्यांचा पौष्टिक ब्रेड खाल्ला. मी आपली पोळी भाजी खाल्ली. जेवताना परत त्या ब्रेड मधील पदार्थांचे विच्छेदन झाले. त्यात किती तंतुमय पदार्थ असतात आणि ते आरोग्यासाठी किती चांगले असतात वैगरे वैगरे...
दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकर ऑफिस मध्ये निघायचे होते. मी माझी अंघोळ वैगरे करून ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो. काका माझ्या खोलीत आले. एकदम त्रासिक चेहऱ्याने. मला म्हणाले, "अभिजीत माय ऍस्स्स ईज्ज ज्याम..." मी ओरडलो,"काय?" क्षणभर स्तब्ध... मला पटकन कळेना काका काय म्हणत आहेत. माझ्या बाळबोध मराठी मध्ये पटकन काही अर्थ लागेना. काकांचे xxx जाम झाले आहे म्हणजे काय? काहीतरी कंबर दुखणे किंवा पाठीचा स्नायू लचकणे समजू शकत होतो. पण हा भलताच प्रकार होता. मग काका जमेल त्या इंग्रजी शब्दांची जुळवाजुळव करत त्रासिक चेहऱ्याने मला सांगत होते. मला पटकन ट्यूब पेटली. "काका, तुम्हाला Constipation म्हणायचे आहे का?
"हो." काका सुटकेचा निःश्वास सोडलं पोटावर हात धरून म्हणाले.
"अहो काका, मग आधी सांगायचे ना?" उगीच आपले इकडून Gas जात नाही... तिकडून ते होत नाही...काही सुचत नसल्यामुळे कदाचित योग्य शब्द सापडत नसतील.
गाडी जाम झाली की तिला वंगण घालतात.. इकडे काय? मी स्वयंपाकघरात शोधाशोध सुरू केली...इनो सापडले. काही केळी सापडली. काकांना मधुमेह असल्यामुळे त्यांनी लगेचच ज्ञान द्यायला सुरुवात केली. मी थोडा वैतागूनच म्हणालो," अहो काका आधी तुमचा प्रश्न सोडवा. पोट धरून बसला आहात आणि ज्ञान कसले देताय?"काकांची समजूत काढता काढता मला ऑफिसला जायला उशीर होत होता.
इनो घेतल्यावर काकांच्या इंजिन मध्ये थोडा दम आला आणि गाडी फट फूट करत का होईना सुरू झाली.
मी निश्चिन्त मनाने, मनात आलेले हास्याचे कारंजे आवरत ऑफिसला गेलो...
------------------------------------------
- अभिजीत जोशी (१० जुलै २०१६)
(तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.)  

2 comments:

  1. Mast Abhijit 👍 asach lihit raha ...Tuze experience share karat raha

    ReplyDelete