२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिवस..सर्व वाचकांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!! या वर्षात देखील खूप सारे वाचन होवो आणि नवनवीन विश्वाची सफर घडो.
मागील पानावरुन पुढे..मागील भागाचा दुवा (LINK)
पुस्तकाची दुनिया..
कधीकाळी तुझे एक पान उलगडले, अनोखे जग सापडले,
अनुभवांचा खजिना, आठवणींचा कॅलिडोस्कोप तू एका क्षणात उभा केलास,
कवितांचे अर्थ, वाक्यांचे संदर्भ, महाकाव्याचा अर्क आणि अनंत काळाचा इतिहास,
मागील शतके, पुढील दशके, किती बिंदू तू जोडतोस,
वाचलेल्या प्रत्येक क्षणांना तू समृद्ध करतोस,
बसल्या ठिकाणी तू नवे जग उभारतोस,
अरे माझ्या मित्रा, तुझ्या जादुई दुनियेत,
कोणताही भेदभाव न ठेवता, सर्वांना सामावतोस..
भारतातील एक थोर आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे कै. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. डॉ. कलाम यांनी प्रत्येक भारतीयाला स्वप्ने बघायला, जगायला शिकविली. २००० साली शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते आले होते. त्यांच्या भाषणाची कात्रणे मी माझ्या संग्रही ठेवली आहेत. त्या नंतर मिळेल तसे त्यांचे लेख, भाषणे ऐकू लागलो. "अग्निपंख" हे पुस्तक मला अभियांत्रिकी शिकताना वाचायला मिळाले. हे पुस्तक ऊर्जेचा स्रोत आहे. एकंदरीतच शालेय अभ्यासक्रमात याचा संदर्भ असायलाच हवा. तरुण मनाला योग्य दिशा आणि विचार देण्याचे काम हे आत्मचरित्र नक्कीच करते. अग्निपंख नंतर "भारत - २०२०" हे पुस्तक वाचले. बदलत्या भारताची संकल्प चित्रे त्यांनी त्या पुस्तकात मांडली आहेत. किमान एक संदर्भ म्हणून आज देखील ते पुस्तक वाचायला आवडते.
असे म्हणतात की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तुम्हाला जर एखादी नवीन सवय अंगवळणी करायची असेल किंवा एखादी वाईट सवय बंद करायची असेल तर काय कराल? नुकतेच "ऍटॉमिक हॅबिटस (Atomic Habits)" नावाचे पुस्तक वाचले. जेम्स क्लीअर या लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून सवयी कशा बदलायच्या याचा अभ्यासपूर्वक विचार करून हे पुस्तक लिहिले आहे. एखादा नवीन प्रकार म्हणून हे वाचायला छान आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील आला आहे.
ऐकायचे पुस्तक (ऑडिओ बुक) हा नवीन प्रकार तंत्रज्ञानातील बदलामुळे सर्व सामान्य लोकांना सहज उपलब्ध आहे. पूर्वी आकाशवाणी वर श्रुतिका असायच्या. अनेक पुस्तकांचे अभिवाचन ऐकायला मिळायचे. माझ्या लहानपणी आकाशवाणीवर "कहाणी लंडनच्या आजीबाईंची" या पुस्तकाचे अभिवाचन खूप प्रसिद्द होते. श्री. विश्वास पाटील यांचे "रणांगण" देखील ऐकले होते. मला वाटते "नीता केळकर" यांनी ते वाचले होते. आकाशवाणीने या सर्व रेकॉर्ड्स विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात. मराठीतील बरीच पुस्तके सध्या ऑडिओ बुक प्रकारात उपलब्ध आहेत. ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी ही सुविधा नक्कीच उपयोगी पडते. खूप वर्षांपूर्वी ज्येष्ठ लेखक कै. गो. नी. दांडेकर यांच्या पुस्तकांचा भावानुवाद ऐकायचा योग आला. पवनाकाठचा धोंडी, पडघवली, जैत रे जैत ऐकताना सगळी गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते. पवनाकाठचा धोंडी ऐकताना नकळत डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात इतके प्रभावी हे अभिवाचन आहे. काही दिवसांपूर्वी "ऑडिबल" या संकेतस्थळावर रारंगढांग हे पुस्तक ऐकले. प्रभाकर पेंढारकर यांच्या प्रत्ययकारी लेखणीचा श्रवणानंद पुन्हा एकदा अनुभवता आला.
कागदी पुस्तक ते डिजिटल पुस्तक हा प्रवास थक्क करणारा आहे. अर्थात वाचकांसाठी कोणताही प्रकार तेवढाच आनंद देतो. कागदी पुस्तकांचा अनुभव हा सुखावणारा आहेच. स्वतःच्या संग्रहातील जुनी पुस्तके चाळताना अधोरेखित केलेली ओळ सापडावी, एखादे पिंपळाचे पान फक्त त्याच्या जाळीनिशी मिळावे किंवा एखादे मोरपीस आठवणींसकट सामोरे यावे याचा आनंद अवर्णनीय असतो.
- अभिजीत जोशी,
तुम्ही जागतिक पुस्तक दिवस कसा साजरा केलात? कोणती नवीन पुस्तके वाचली?तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील.
No comments:
Post a Comment