Saturday, 8 May 2021

अरे माणसा माणसा (९/५२)

अरे माणसा माणसा, तुला किती रे ही हाव,

साहाय्याने विज्ञानाच्या, कसा खेळतोस डाव ।।१।।

तुझी वाढली प्रजा, केला निसर्गावर वार,

प्रगतीच्या उगा बाता, सर्वत्र नुसता हाहाकार ।।२।।

नातीगोती दूरदेशी, केवळ आभासी ठाव,

चित्त सारे पिलांपाशी, भ्रमणध्वनी तो साव ।।३।।

हतबल आप्त, फुटती टाहो, अकाल हरता, मोक्ष लाभो, 

झुंझार कोविड लढवय्यांना, प्रभो, उदंड आयुष्य दे हो ।।४।।

ना जातपात ना धर्म, सोबत उरते आपले कर्म,

उमजून घे रे मर्त्य मानवा, माणुसकीचे खरे मर्म ।।५।।

अनंत आपुली स्वप्ने, उरी अनंत आशा,

एकमेकां साहाय्य करुनी, सावरू आपल्या देशा ।।६।।

लस घेण्या कोणता सल? मास्क लावण्यात कसला त्रास?

सुरक्षित नियम पाळून, वाढव आयुष्याचे तास ।।७।।

काय मागणे मागू देवा, सर्वे सन्तु निरामय:,

रोगराईच्या कठीण काळा, धीर देई रे गणराया ।।८।।

कोव्हिडच्या या कठीण प्रसंगी सर्वांचेच हाल होत आहेत. हतबल, अगतिक वाटणे साहजिक आहे. थोडा धीर धरा, मन स्थिर ठेवा. सार्वजनिक सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा. आपण सर्वजण या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडू..

-- अभिजीत जोशी,

८ मे २०२१

No comments:

Post a Comment