आजकाल मुलासोबत मराठी गाणी म्हणताना खूप धमाल येते. "मामाच्या गावाला जाऊया" गाणे शिकवताना नकळत लहानपणीच्या आठवणी नजरेसमोर आल्या. शाळेची वार्षिक परीक्षा संपली की सुट्टीचे वेध लागायचे. सुट्टीत काय काय करायचे याची यादी तयार असायची. मित्रांसोबत गप्पा सुरु व्हायच्या. कुणी मामाकडे, कुणी मावशीकडे, कुणी आत्या कडे तर कुणी काका काकू कडे जायचा. कुणाच्या घरी त्याचे सगळे आते, मामे, मावस, चुलत भावंडे येणार असायची. मार्च च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणारी सुट्टी पार जून मध्ये शाळा सुरु होईपर्यंत असायची.
स्वत:चे घर/गाव सोडून जाताना सुरवातीला मजा वाटायची. पण काही दिवस गेले की घरच्या आठवणी यायला सुरुवात व्हायची. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळेचा निकाल लागायचा. निकालाच्या आधी काही दिवस खूप धाकधूक असायची. आपला भोपळा फुटला की काय होणार याचे आडाखे बांधायचे. चांगले गुण मिळाले तर सुट्टीत खूप धमाल यायची. आंबे, कैऱ्या, वाळवणी (पापड, धान्य इत्यादी), पोहायला जाणे, सायकल चालविणे, गावभर उनाड भटकणे असे खूप उद्योग चालायचे. कधीतरी चुकून एखादा सिनेमा बघायला मिळायचा. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लपंडाव, गोट्या, सापशिडी, पत्ते कुटणे, नवा व्यापार, विटी- दांडू असे अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. कधीतरी कुल्फी, आईसक्रीम खायला मिळायची. एकंदरीतच सुट्टी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असायचा.
आपला गाव/ घर सोडून थोडे दिवस बाहेर राहिले की बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. बाहेर गेले की कसे राहायचे, कसे वागायचे, सगळ्या नवीन वातावरणात कसे जुळवून घ्यायचे, स्वयंशिस्त, स्वावलंबन आणि थोडीशी दुनियादारीची जाणीव यायची. संस्कारांची, विचारांची देवाण घेवाण व्हायची. आजच्या भाषेत सांगायचे तर क्रॉस-स्किल्स/ क्रॉस कल्चर आपोआप घडायचे. या सर्व गोष्टी व्यक्तिमत्व विकसन होण्यासाठी आवश्यक आहेत. किंबहुना सुट्टीतील या सर्व गोष्टी पूरक ठरायच्या. गेल्या काही वर्षांमध्ये विभक्त कुटुंब पद्धत वाढली आहे. त्यामुळे सुट्टीत सर्व भावंडांनी एकत्र येणे हा प्रकार बराच दुर्मिळ झाला आहे. करोनाच्या काळात तर याला खीळ बसली आहे. प्रत्येक जण नोकरी व्यवसाय निमित्त बरेच लांब लांब असतात. मित्र देखील आजच्या काळात "extended फॅमिली" प्रमाणे झाले आहेत. बदलत्या काळात आपल्याला देखील बदलावे लागते. सुट्टीचे हे दिवस देखील त्याला अपवाद नाहीत. कालाय तस्मे: नमः!!
या सर्व बदलात बालगीते मात्र तशीच आहेत. बालगीतांच्या या जगात अजूनही आगगाडीत बसून मामाच्या/काकाच्या गावाला जाता येते, मामीच्या/ काकीच्या हातचे चमचमीत पदार्थ खाता येतात. मावशी, आत्या कडून लाड करून घेता येतात, सगळी भावंडे मिळून खूप दंगा करता येतो. केवळ चांदोबाच नाही तर गाई, म्हशी,कुत्री, मांजरी, इतर पाळीव प्राणी आपल्या सोबत जेवायला येतात. चॉकोलेटच्या बंगल्यात राहायला मिळते, गोष्टीतील आजी आजोबांसोबत खूप दंगा मस्ती करता येते. शेतात जाऊन बैलगाडीत बसता येते, झाडावरच्या कैऱ्या, चिंचा, बोरे खाता येतात, नदीतील माशांसोबत पोहायला येते, जादूच्या गोष्टीतील काठीने अशक्य त्या गोष्टी शक्य करता येतात. बालगीते आणि बालगोष्टीं मधून आभासी का होईना पण सर्व गोष्टी पुन्हा एकदा अनुभवायला मिळतात. "लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा" असे संत तुकाराम महाराजांनी यासाठीच तर लिहून ठेवले असावे.
कोरोना गेल्यानंतर मग मामाच्या गावाला जाऊ, प्रत्यक्ष भेटू आणि खूप खूप धमाल करू..!! आपण सगळे मिळून देवाकडे अशी प्रार्थना करू की करोनाचे हे संकट लवकर दूर होवो, प्रत्येकाचे लसीकरण होवो आणि हे जग परत पूर्वीसारखे सुरळीत होवो. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा आणि सर्व नियम पाळा..!!
चांदोबा चांदोबा भागलास का?
ढगांच्या मागे लपलास का?
चांदोबा चांदोबा काळजी घे,
बाहेर जावे लागले तर लवकर ये,
जाताना मास्क लावून जा,
sanitizer सोबत घेऊन जा,
जास्त वेळ बाहेर थांबू नको,
६ फूट अंतर ठेवून बोल..
चांदोबा, चांदोबा, घरी आलास ना
आल्यावर हात स्वच्छ धुतलेस ना (२० सेकंद, साबण लावून)
आता आपण खूप गप्पा मारू,
शिस्त आणि नियम सदैव पाळू,
एकमेकांना सहकार्य करू,
करोनाला पळवून लावू..
-- अभिजीत जोशी,
१८ एप्रिल २०२१
- तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील.
No comments:
Post a Comment