"Books are the quietest and most constant of the friends; they are most accessible and wisest of counselors, and the most patient of teachers" - Charles W. Eliot
"वाचाल तर वाचाल" अशा बऱ्याचशा म्हणी तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात बरीच परिणामकारक, वाचनीय पुस्तके असतात. (अभ्यासाची सोडून). हा ब्लॉग असाच काहीसा मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल आहे. मला वाचनाची आवड लागण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई आणि बाबांना जाते. या दोघांनी मला अगदी लहानपणापासून बरीच वेगवेगळी पुस्तके वाचायची सवय लावली. चांदोबा, चंपक, ठकठक, गंमत जंमत, किशोर, साने गुरुजी कथामाला (जवळपास सगळेच भाग), भारत-भारती ची सगळी पुस्तके (साधारण खिशात मावतील अशी पुस्तके होती ही) अशी अनेक पुस्तके ते मला आणून द्यायचे.
लहान असताना अकबर बिरबल, इसापनीती, पंचतंत्र या गोष्टी खूप आवडायच्या. शाळेच्या वाढत्या इयत्तेनुसार वाचनही वाढत गेले. फास्टर फेणे, बोक्या सातबंडे ही पुस्तके अजूनही वाचायला आवडतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जवळपास सगळीच पुस्तके खूप जवळची आहेत. त्यातल्या त्यात श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले "राजा शिवछत्रपती"(पूर्वार्ध आणि उत्तरार्ध), श्री. रणजित देसाई यांनी लिहिलेले "श्रीमान योगी" ही दोन खूपच वाचनीय पुस्तके आहेत. विशेष म्हणजे न्यूयॉर्क आणि कॅरी इथल्या वाचनालयात देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत.
महारथी कर्णाच्या जीवनावर आधारित असलेली "मृत्युंजय" ही कादंबरी मला खूप आवडली होती. रोज नदीवर अंघोळ करताना कर्ण सूर्याला अर्घ्य देत असतो. हा प्रसंग खूप लक्षात राहिला होता. त्यानंतर कृष्णा नदीत पोहताना सूर्याकडे बघून अर्घ्य देणे खूप जवळचे वाटत होते. अर्थात कर्णाच्या जीवनावर अनेक कादंबऱ्या निघाल्या "राधेय", "कौंतेय","महारथी कर्ण" वैगरे वैगरे. पण श्री. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली "मृत्युंजय" ही अतिशय वेगळी कादंबरी आहे. यात पहिल्यांदाच मी प्रत्येक पात्राने लिहिलेले स्वगत हा प्रकार वाचला. कुंती, दुर्योधन, शोण (कर्णाचा भाऊ), वृषाली (पत्नी) आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या तोंडून कथा उलगडत नेण्याचा प्रकार खूप उत्कृष्ट आहे.
त्यानंतर शाळेत असताना ययाती, युगंधर, पानिपत, छावा, स्वामी, राऊ, पावनखिंड, झुंज, १८५७ चे स्वातंत्र्य समर, सात सोनेरी पाने अशी भरपूर पुस्तके वाचली. ही पुस्तके इतिहास आणि मराठी या विषयांशी संबंधित अवांतर वाचन म्हणून वाचली होती. परीक्षेत निबंध लिहिताना या सगळ्या पुस्तकांचा खूप उपयोग झाला. भारतात बऱ्याच व्यक्तींची चरित्रे खूपच प्रेरणादायी आहेत. इतिहासाचे दाखले द्यायचे म्हणले तर अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील, पहिले बाजीराव पेशवे असतील, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य लढयातील बरेच क्रांतिवीर असतील. त्यांची चरित्रे आपण इतिहासाच्या अभ्यासक्रमात वाचली असतील.
"आत्मचरित्रे" हा प्रकार साधारण नववी/दहावीत असताना वाचनात आला. "निवडुंग आणि गुलाब"(शंतनुराव किर्लोस्कर) हे मला आवडलेले आत्मचरित्र. कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी ज्या परिस्थितीत उद्योग उभा केला, त्या उद्योगाचे एका उत्तुंग उद्योगसमूहात रूपांतर करणे ही सोपी गोष्ट नव्हती. कै. शंतनुराव किर्लोस्करांनी कसा उद्योग विस्तार केला आणि भारताचे नाव जगभरात मोठे केले. "कुंडल रोड" या आडगावात फोंड्या माळावर "किर्लोस्करवाडी" सारखे आधुनिक आणि योजनाबद्ध शहर उभे करणे हे प्रचंड मेहनतीचे काम होते. या पुस्तकातील काही गोष्टी नंतरच्या व्यावसायिक आयुष्यात खूप उपयोगी पडल्या. विशेषतः मूल्यवर्धन (value addition) ही संकल्पना (concept) त्या वयात पहिल्यांदा उदाहरणासकट समजली. कोणतेही काम करताना त्यात कशी सुधारणा करता येईल, कमीत कमी वेळात ते काम कसे होईल असे वेगळे विचार या पुस्तकाने नक्कीच निर्माण केले. महाराष्ट्रात यंत्र उद्योगाची गंगा उभी करण्याचे श्रेय नक्कीच किर्लोस्कर समूह आणि शंतनुराव किर्लोस्कर यांच्या दूरदृष्टीला आहे. सध्या हे पुस्तक किर्लोस्कर समूहाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
"श्यामची आई" हे साने गुरुजींचे आत्मचरित्र मला खूप आवडले होते. करुणामय आणि निकोप भावनांचे अतिशय सुंदर रेखन या पुस्तकात आहे. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडणारी आई, परिस्थिती सावरणारी आई अशी आईची अनेक रूपे या पुस्तकात वाचायला मिळतात. आई वडिलांविषयी असलेली ममत्वाची भावना या पुस्तकाद्वारे वृद्धिंगत होते. पालकत्व (Parenting) समजावून सांगणारे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
एकदा शाळेत श्री. ज्ञानेश्वर मुळे सर एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर "माती, पंख आणि आकाश" हे पुस्तक वाचले. एका बैठकीत हे पुस्तक वाचून काढले होते. अब्दुल लाट सारख्या खेड्यातील एक मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतो, आणि नंतर भारतीय राजदूत म्हणून जगभर काम करतो. प्रत्येक देशात आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवतो. शाळकरी वयात हे पुस्तक वाचताना कधी वाटले नव्हते की आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ म्हणून. पण जग हिंडायचे स्वप्न जरूर निर्माण झाले होते. स्वप्ने बघायला काय पैसे थोडेच पडतात? त्यावेळी अशी परिस्थिती देखील नव्हती. हे पुस्तक वाचताना डोळ्यात एक आशेची चमक येते. अमेरिकेत आल्यानंतर त्यांना भेटता आले. त्यावेळी ते न्यूयॉर्क येथे प्रमुख अधिकारी होते. मी त्यांना सहज ई-मेल केली होती आणि शाळेतील या प्रसंगाचा उल्लेख केला होता. मला वाटले नव्हते की ते आपल्या कामाच्या व्यापातून माझ्या ई-मेल ला उत्तर देतील म्हणून. पण त्यांचा ई-मेल आला आणि चक्क त्यांना भेटायची संधी मला मिळाली. आयुष्यात असे प्रसंग खूप कमी वेळा येतात.
नुकतेच "मन में है विश्वास" नावाचे पुस्तक वाचले. तडफदार पोलीस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. त्यांचे लघु आत्मचरित्र असे आपण म्हणू शकतो. अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे. विशेषतः जे सरकारी परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयोगी आहे. ज्या लोकांना आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे त्यांच्यासाठी देखील बरेच काही देणारे आहे. आयुष्यातील अडीअडचणी, मोहाचे क्षण, निराशेचे आणि आनंदाचे क्षण, प्रतिकूल परिस्थितीशी केलेले दोन हात या सर्वांचे उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात आहे. ग्रामीण भागातील मुलांना एक प्रकारचा न्यूनगंड असतो. विशेषतः ते जेव्हा शहरी भागातील मुलांशी स्वतःची तुलना करतात, किंवा त्यांच्याशी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सामोरे जातात त्या वेळी हे नक्कीच जाणवते. केंद्रीय लोकसेवा आयोग असेल (UPSC), किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा इतर कोणतीही परीक्षा असेल, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल.
(क्रमश:)
टीप - हा ब्लॉग बराच मोठा झाला आहे. या ब्लॉग मध्ये उल्लेख केलेली बरीच पुस्तके सध्या "किंडल" किंवा "pdf" या प्रकारात उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान प्रेमी (technosavy) लोकांना याचा फायदा नक्कीच घेता येईल.
तुम्हाला आवडलेली पुस्तके कोणती आहेत? तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील.
No comments:
Post a Comment