Wednesday, 24 September 2025

राम जन्मला ग सखी

ब्लॉग ३ - राम जन्मला ग सखी

गीत रामायणातील आजचे गाणे आहे राम जन्मला ग सखी.. 

गीतरामायणातील प्रत्येक गाण्यात मराठी भाषेचे अलंकार (शब्दालंकार जसे "अनुप्रास, यमक, श्लेष" आणि अर्थालंकार जसे की "उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत, विरोधाभास, स्वभावोक्ती") अतिशय सुंदर पद्धतीने वापरले आहेत. 

 "शरयू तीरावर अयोध्या" असेल जिथे गदिमांनी अयोध्येचे वर्णन करताना शेवटच्या अंतऱ्यात राजा दशरथाला वारस नसल्याची गोष्ट विरोधाभास अलंकार वापरून सांगितली आहे. उदा. "कल्पतरूला फुल नसे का वसंत सरला तरी". 

त्यानंतरच्या गाण्यांत कौसल्येला वेलीवरची फुले बघून झालेले दुःख सांगितले आहे. "उगा का काळीज माझे उले? पाहुनी वेलीवरची फुले". याच काव्यात वेली, हरिणीचे पाडस, गोशाळेतील गाय वासरू, पक्षी एवढेच नव्हे तर दगडातूनही मूर्ती निर्माण होते पण माझी वंशवेल का वाढत नाही हा कौसल्येला पडलेला प्रश्न, तिच्या मनातील मातृत्वाविषयीचे मत अतिशय सुंदर पणे मांडला आहे. 

तेवढ्यातच दशरथाला झालेला दृष्टांत, यज्ञ पुरुषाने दिलेले वरदान, पायसदानाच्या पुण्याईने दशरथाचा वंशवेल आता विस्तारतो आहे आणि रामाचा जन्म होतोय. 

"राम जन्मला ग सखी" या काव्यातही गदिमांनी मराठी भाषेचे अलंकार इतक्या छान पद्धतीने वापरले आहेत की त्यात आपोआपच नाद माधुर्यता येते. 


"चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी तिथी, 
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती?
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

अगदी पहिल्या कडव्यातच चैत्रातील दुपारच्या उन्हाचे वर्णन उपमा आणि यमक या दोन्ही अलंकारांनी सजवले आहे. "राम जन्मला ग सखी राम जन्मला" हे ध्रुवपद किंवा आजच्या भाषेत "hook line" अगदी ठळक पणे बाबूजींनी पूर्ण गाण्यात वापरली आहे. 

पुढच्या अंतऱ्यात गदिमा, नुकतेच मातृत्व प्राप्त झालेल्या कौसल्या राणीच्या मनीचे भाव व्यक्त करताना लिहितात, 

"कौसल्याराणी हळू उघडी लोचने, 
दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, 
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

प्रसव वेदना सहन करून जेव्हा मातृत्व प्राप्त होते त्यावेळी मनात एकाच वेळी खूप भाव निर्माण होतात. कौसल्या मातेच्या स्थितीचे इथे उत्तम वर्णन केले आहे. पुढच्या अंतऱ्यात देखील "पान्हावून हंबरल्या धेनु अंगणी" या ओळी देखील मातृत्व साजऱ्या करणाऱ्या आहेत.  

"राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, 
पान्हावून हंबरल्या धेनु अंगणी,
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंडला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

याच्या पुढच्या अंतऱ्यात गदिमांनी गावगप्पा करणाऱ्या समूहाला कळ्यांची उपमा देऊन गंमत केली आहे. 

"पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या,
काय काय करित पुन्हा उमलल्या खुळ्या,
उच्चरवे वायू त्यांस हसून बोलला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

काही मैत्रिणी जेव्हा अशी आतल्या गोटातली बातमी कळते तेव्हा, " अगं तुला कळलं का?" असे विचारत बातम्या पुढे वाढवतात त्यांचा उल्लेख इथे केला आहे. शब्दश: अर्थ असा आहे की उन्हामुळे कळ्या पेंगुळल्या आहेत. अचानक त्यांना रामजन्माची आनंदाची बातमी कळते आणि मग काय झालं, काय झालं करत त्या एकमेकांना विचारतात, तेव्हा वारा त्यांना ही बातमी ओरडून सांगतो. 

याच्या पुढच्या तीनही अंतऱ्यात आनंद सोहळ्याचे वर्णन आहे. सगळ्या प्रजेला आनंद झाला आहे. संपूर्ण अयोध्येत ढोल, ताशे, नगारे वाजवून ही बातमी पसरली आहे. (फ्लेक्स वगळता) संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव साजरा होतो आहे. 

शेवटचे दोन अंतरे एकदम विशेष आहेत. 

"दिग्गजही हलून जरा चित्र पाहती,
गगनातुन आज नवे रंग पोहती,
मोत्यांचा चूर नभीं भरून राहिला, 
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

इथे दिग्गजही म्हणजे पृथ्वी च्या आठही दिशांना आठ हत्ती आहेत अशी एक कल्पना आहे. दिग आणि गज या दोन शब्दांपासून दिग्गज हा शब्द बनला आहे. ज्यांच्या खांद्यावर अशी पृथ्वीचा तोल सांभाळण्याची जबाबदारी आहे असे दिग्गज, त्यांनाही राम जन्मामुळे आनंद झाला आहे. सूर्यास्ताच्या वेळेचे आकाश जरा अधिक रंगांनी खुलून आले आहे आणि असं वाटतंय की मोत्यांचा चुरा आकाशात पसरला आहे.

"बुडुनि जाय नगर सर्व नृत्य गायनी,
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी,
डोलतसे तीही, जरा, शेष डोलला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला"

इथे देखील फक्त अयोध्या नव्हे तर पूर्ण पृथ्वीला आनंद झाला आहे. पृथ्वीसोबत शेष देखील डोलतो आहे. या ओळीत अतिशयोक्ती अलंकाराचा चपखल वापर करून आनंदाचे प्रमाण किती मोठे आहे हे सांगितले आहे. 

तुम्हाला "राम जन्मला ग सखी" हे गाणे ऐकल्यावर काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. 

अभिजीत जोशी
२४ सप्टेंबर २०२५

No comments:

Post a Comment