
फार पूर्वी, दिवसाची सुरुवात देवाच्या देवळात भूपाळीने व्हायची. भूपाळी म्हणून देव जागे झाल्यावर गावातून वासुदेव फिरायचा. डोक्यावर मोरपिसे लावलेला टोप, हातात चिपळ्या किंवा टाळ घेऊन गावभर तो हिंडायचा. प्रत्येक गल्लीतून, रस्त्यावरून त्याची वेगवेगळी गाणी म्हणत तो जायचा. मराठी चित्रपटात देखील काही अशी गाणी आहेत बर का..
उजळून आलं आभाळ, रामाच्या पारी,
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी..
एकेकाळी वासुदेव प्रत्येक गावाच्या अलार्म चे काम करायचा. काळाच्या ओघात हा वासुदेव काय, किंवा भूपाळी काय, फक्त नावापुरते उरले आहे. कधीतरी जुन्या चित्रपटात किंवा एखाद्या गाण्यापुरता यांची आठवण येते.
महाराष्ट्राच्या लोकधारेतील भूपाळी आणि वासुदेवाची गाणी म्हणजे संस्कृतीतील अनमोल ठेवाच जणू.
त्यानंतर आई / आजी घरी जात्यावर बसून ओव्या म्हणायच्या.
बहिणाबाईंच्या ओव्या जसा की "अरे संसार संसार , जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.."
मग सकाळची न्याहारी करून लोक शेतावर जायचे. पेरणी करताना, निसर्गाच्या संगतीत त्यांची गाणी खुलून यायची.
आता हेच बघा ना, दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटात अशी बरीचशी घेतली आहेत. त्यांनी बरीचशी गाणी लिहिली देखील आहेत.
"चल र शिरपा, देवाची किरपा,झालीये औंदा छान र छान, गाऊ मोटेवरच गाणं" हे असेल किंवा, "माळ्याच्या मळ्यात कोण ग उभी?"
दिवसाच्या प्रत्येक प्रहरात अशी लोकगीते आपल्याला आढळतील. ऊन, वारा, पाऊस, थंडी असे वातावरणातील बदल असोत किंवा बदलणारे ऋतू असोत, किंवा नाट्य शास्त्रातील नवरस असोत, मराठी लोकसंगीतात या सगळ्या गोष्टींचा छान वापर झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्राची लोकधारा हा विषय या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आम्ही निवडला होता. त्यासाठी लिहिलेल्या काही ओळी..
भूपाळीच्या धुपाचा प्रसन्न वास,
वासुदेवाच्या गाण्यातील संगीताचा श्वास, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा
देवळातील आरतीचा घंटानाद,
अभंग कीर्तनातील भक्तीची साद, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा
दारापुढील सडा-रांगोळीची नाजूक कला,
जात्यावरील ओवीचा गोड़ गळा, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा
लावणीतील ढोलकीच्या तालावर थिरकणारा,
घुंगरांच्या बोलावर डोलणारा, दर्दी रसिकांचा मेळा, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा
राजांच्या पोवाड्यावर जीव लावणारा,
शाहिराच्या डफ, टिमकी, दिमडी, हलगीवर भाळणारा,
छक्कड, भारुडाच्या लोक जागरावर शहाणा होणारा समाज, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा
महाराष्ट्रातील अठरा पगड जाती आणि त्यांच्या परंपरा जपणारा,
रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारा,
कलेचे वेगवेगळे अविष्कार सादर होणारा प्रकार, म्हणजेच महाराष्ट्राची लोकधारा.
-- अभिजीत जोशी,
२३ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment