नवरात्री २०२५ - ब्लॉग १ - स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती

बरेच दिवस झाले, गीत रामायणावर काहीतरी लिहायचा विचार मनात होता. ग. दि. मा. आणि सुधीर फडके यांचे किती उपकार आहेत आपल्यावर. नुसती गाणी जरी ऐकली तरी पूर्ण रामायण वाचल्याचा अनुभव मिळणारी ही अद्भुत कलाकृती. मराठी माध्यमातील प्रज्ञा परीक्षेच्या वेळी याचे वाचन केले असते तर अजूनही छान लिहिता आले असते. कदाचित जास्त गुण देखील मिळाले असते.
मला गदिमा आणि बाबूजी या दोघांचेच नव्हे तर त्यांच्या संघातील सगळ्यांचे कौतुक करावेसे वाटते. दर आठवड्याला अशी ओघवती भाषा, त्यातील काव्य, प्रसंग शब्दांत गुंफणे. त्याला तितकीच सुंदर आणि सदैव गुणगुणावीशी वाटेल अशी चाल लावणे आणि हा सगळा व्याप प्रत्येक आठवड्याला न चुकता सलग ५६ आठवडे करणे सोपे नाही. मला वाटतं प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनीच हे माडगूळकर आणि बाबूंजींच्या कडून घडवले असेल. दैवी प्रतिभेची देणगी या दोघांनाही होती.
कोणत्याही लेखकाला किंवा कवीला असं भव्य दिव्य लिहिता येणं म्हणजे इतकं प्रतिभा संपन्न काव्य आणि त्याला तितकीच उत्तम चाल म्हणजे खायचं काम नाही. बर, यात कुठेही पाट्या टाकण्याचं किंवा तोच तोच पणा देखील नाही.
जे केलं, त्यात कर्मयोग आहे, स्वत:च्या कामावर असलेली निष्ठा आहे. प्रभू रामचंद्राविषयी श्रद्धा आणि भक्तिभाव आहे. मराठी भाषेवरील प्रेम आहे. आणि मुख्य म्हणजे आकाशवाणी माध्यम असल्यामुळे कडव्यांचे किंवा ओळींचे बंधन नाही.गीतरामायणातील गाणी अजूनही लोकांना आवडतात. सर्व स्थरातील श्रोत्यांचे अपार प्रेम या कलाकृतीला मिळाले. यातील काही गाण्यांवर मी पुढचे काही दिवस लिहणार आहे.
आजचे गाणे आहे कुश लव रामायण गाती.
या गाण्यात गदिमांनी त्यांच्या पटकथा लेखनाचा एक सुंदर अनुभव आपल्याला दिला आहे. प्रभू श्रीरामांनी भद्राच्या ऐकण्यावरून सीतेचा त्याग केला. महर्षी वाल्मिकींनी नंतर सीतेसह कुश आणि लव यांचा १२ वर्षे सांभाळ करून त्यांना सर्व शिक्षण दिले. प्रभू श्रीरामांनी राजसूय यज्ञ केला आणि त्या वेळी महर्षी वाल्मिकींनी १२ वर्षे वयाच्या या बटूंना यज्ञाच्या ठिकाणी आणले आणि प्रभू श्रीरामांचा जीवनपट हे दोघे बटू गात आहेत असा प्रसंग. हा पूर्ण प्रसंग आठ अंतऱ्यात लिहिला आहे.
"स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती" हे ध्रुवपद आणि नंतर प्रत्येक अंतऱ्यात एक एक शब्द मोत्यासारखा गुंफला आहे.
"पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती" असे म्हणत पहिले कडवे संपते.
याच्या तिसऱ्या अंतऱ्यात "ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकीळ, बालस्वरांनी करुनी किलबिल, गायने ऋतुराज भारती" हे वसंत ऋतूचे वर्णन अगदी चपखलपणे गदिमा करतात.
पाचव्या अंतऱ्यात गदिमा मैफिलीचे वर्णन करतात, " सात स्वरांच्या स्वर्गामधूनी, नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी, यज्ञ मंडपी आल्या उतरूनी, संगमी श्रोतेजन नाहती".
गीत रामायणात हे सप्तसूर आणि नाट्यशास्त्रातील नऊ रस असे एकत्र येतात. श्रोत्यांना वेगवेगळे अनुभव देत मैफिल रंगत जाते.
मला स्वत:ला आवडलेल्या ओळी या सहाव्या अंतऱ्यात आहेत. "पुरुषार्थाची चारी चौकट, त्यांत पाहता निजजीवनपट, प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट, प्रभूचे लोचन पाणावती"
प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. स्वतः आखलेली धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची चौकट, राजा म्हणून अंगावर असलेली जबाबदारी, वडील आणि कुळाचा नाव लौकिक वाढवताना जपलेली तत्वे या सर्वांचा एक उत्तम मिलाफ रामायणात आढळतो. आपल्याच आयुष्याचे सिंहावलोकन करताना काही आठवणी मनात खोलवर कोरलेल्या असतात. त्यांची आठवण जरी झाली तरी डोळ्यात पटकन पाणी येते. राजा असूनही त्याच्या आत एक माणूस देखील लपला आहे. हे इतके सुंदर वर्णन गदिमांनी या ओळींमधून केले आहे.
सातव्या अंतऱ्यात मैफिलीचे वर्णन आहे. रामायणातील कथा एका मागोमाग सादर होत आहेत. त्यातील असलेल्या नाट्यमयतेमुळे लोक त्याला माना डोलावून दाद देत आहेत. काही रसिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत.
आणि आठव्या अंतऱ्यात गदिमा परत उत्कंठा वाढवतात. "सोडूनि आसन, उठले राघव, उठून कवळीती आपले शैशव, पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी तो उभया नच माहिती" या ओळींवर हे गाणे संपते.
खरंतर प्रभू रामचंद्रांना आणि त्यांच्या मुलांना माहितीच नाही आहे की त्यांच्यात काही नाते आहे ते.
या गीत रामायणातील पहिल्याच गाण्यात "आता पुढे काय होणार?" याची उत्सुकता आपसूकच निर्माण होते. कोणत्याही चित्रपट/ नाटक/ कथा यातील हा मूलभूत घटक. श्रोत्यांची उत्सुकता जागरूक ठेवणे. म्हणूनच आज ७० वर्षे झाली तरीही गीत रामायण अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे.
उद्या कुठले गाणे असेल?
--- अभिजीत जोशी,
२२ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment