"लेकिन" या चित्रपटातील "सुरमयी शाम इस तरह आये" हे गाणे आपण सगळ्यांनी ऐकले असेल. पण त्याच्या मागील एक गंमत आज मी तुम्हाला सांगणार आहे.
या गाण्याची चाल आधी एका मराठी चित्रपटासाठी केली होती. त्या चित्रपटाचे नाव होते आघात. पण हा सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही.
तर शांताबाईंनी लिहिलेली कविता अशी आहे,
स्पर्श सांगेल सारी कहाणी,
शब्द बोलू नकोस आज राणी,
संथ सागराच्या लाटा किनाऱ्यास येती,
फेनफुले वाळूवर अंथरून जाती,
धुंद हृदयातुनी आर्त गाणी
हाती गुंफिलेले हाती, फुले लाज गाली,
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली,
जन्म-जन्मांतरीची ही विराणी
-- कवियित्री शांताबाई शेळके
कदाचित हे गाणे एका प्रणय (रोमँटिक) प्रसंगासाठी लिहिले गेलं असावे. याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम चाल लावली आहे.
"लेकिन" चित्रपटासाठी गाणे लिहिले आहे कवी गुलजार यांनी. त्याचे शब्द देखील खूप समर्पक आहेत.
"सुरमयी शाम इस तरह आए, साँस लेते हैं जिस तरह साये"
सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे गाणे गायलेले आहे. तुम्हाला या गाण्याचे व्हिडिओस युट्युब वर मिळतील. सुरेशजी त्यांच्या कार्यक्रमात देखील कधी कधी "स्पर्श सांगेल" या मराठी गाण्यातून सुरवात करतात आणि "सुरमयी शाम" या गाण्याने शेवट करतात. या गाण्याची चाल इतकी लडिवाळ आहे की गाणे ऐकल्यावर बराच वेळ ती गुणगुणावीशी वाटते.
- अभिजीत जोशी,
७ फेब्रुवारी २०२५
No comments:
Post a Comment