![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6ujKlBy-9UA4Vz3MSw4oORWGwJVvYxJiCET7_aJZDUKDm7Vmw9fjHnz1FCiV8PfAcVXUyqM6pTGp188oj2PKQBxfv5tkTmjnhPQSUYpg_M1c6n-fgu6NrlJNRDEdPEYaRT-0qZ8AH4qxslndwY38DtqsqxAFfHsSab-9FoQ3NS83x_ncXI9FPZ0uM39Qg/w400-h235/Tabla%20Navaaj.jpg)
आज पदमविभूषण श्री. झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मला उस्ताद झाकीरजी यांची पहिली ओळख ही ताजमहाल चहा च्या जाहिरातीमुळे झाली. त्या वेळी खूप वेगळेपण वाटले होते. कारण साधारण १९८८-१९९५ या वर्षांत जाहिरातीमध्ये प्रामुख्याने क्रिकेटपटू किंवा हिंदी सिनेमातील नायक नायिका असायचे. त्यावेळी दूरदर्शन वर रविवारी दुपारी आकाशवाणी संगीत संमेलन असा कार्यक्रम लागायचा. त्यात प्रामुख्याने शास्त्रीय गायकांचे गायन व्हायचे. सोबतीला कधी कधी झाकीरजी असायचे. त्यांच्या तबल्याची जादू नंतर कळायला लागली.
१९९८ साली त्यांचा साज नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात एक अप्रतिम गाणे होते," क्या तुम ने ये कह दिया". हे गाणे एकदम भन्नाट होते. तबला, बेस गिटार आणि बरीच वेगळी वाद्ये त्यात होती. झाकीरभाईंनी स्वतः या गाण्याला संगीत दिले होते. इंडो-वेस्टर्न फ्युजन असा काहीसा प्रकार होता. त्यात त्यांचे वेगळेपण उठून दिसले होते.
त्यांचा मी बघितलेला पहिला जाहीर कार्यक्रम पुण्यात गणेश कला क्रीडा मंच मध्ये. त्यानंतर बऱ्याचदा सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांच्या तबला वादनाची जादू अनुभवली. शक्ती, Remembering शक्ती वैगरे बरेचसे कार्यक्रम इकडे प्रत्यक्ष बघायला मिळाले. २०१५ मध्ये न्यूयॉर्क मधल्या कार्नेजी हॉल मध्ये त्यांचा "Celtic Connections" नावाचा अप्रतिम कार्यक्रम बघितला. त्यांना जगातील कोणत्याही प्रकारच्या संगीताचे अफाट ज्ञान होते. जॅझ फेस्टिवल मधील तबलावादन देखील खूप गाजले.
तबला या साथसंगतीच्या वाद्याला त्यांनी रंगमंचावर मानाचे स्थान दिले. पंडित रविशंकर आणि उस्ताद झाकीर हुसैन या दोघांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर ओळखच नव्हे तर महत्वाचे स्थान मिळवून दिले.
त्यांच्या तबला tune करण्यात देखील नजाकत होती. नवीन पिढीला ते कायमच प्राधान्य द्यायचे. अमेरिकेत एका कार्यक्रमात तर त्यांनी तरुण मुलांना अगदी स्टेज वरील सगळ्यात जवळची जागा दिली होती. इतका मोठा कलाकार असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यातील विनम्रता शिकण्यासारखी होती. साथ संगत असो किंवा सोलो वादन असो, त्यांचा रंगमंचावरील वावर अद्भुत होता.
झाकीर भाई त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करायचे. ते ऐकून पुढील कार्यक्रमात काय सुधारणा करता येईल यावर त्यांचा विचार सुरु असायचा. तबल्यावरील थिरकणारी त्यांची बोटे दैवी संगीत निर्माण करायची. त्याच्या पाठीमागे त्यांची इतक्या वर्षांपासूनची मेहनत दिसायची. त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो..!! ओम शांती...!!
तबल्यावर बरसे, बोटातील जादू, श्रोते सुखावती, नादब्रह्मी।।
असो साथ संगत, वा एकल वादन, तालाचा तो नाद, गुंजी कानी ।।
नव्या पिढीला, प्रोत्साहित करी, संगीत साधना, आयुष्यभरी ।।
तबला नवाज, गेला निघोनि आज, धिनक धिन बोलांची, पसरे स्वर्गातही गाज ।।
-- अभिजीत जोशी,
१६ डिसेंबर २०२४
No comments:
Post a Comment