Thursday, 3 October 2024

जय शारदे वागीश्वरी..


आज घटस्थापना,  नवरात्राचा पहिला दिवस. या वर्षी नवरात्रीच्या ९ दिवसांत रोज काहीतरी नवीन लिहायचे असं ठरवतो आहे. त्या अनुषंगाने लिहिलेला हा पहिला ब्लॉग.

जय शारदे वागीश्वरी..

मागच्या वर्षी दिवाळीला आम्ही काही हौशी मंडळींनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम केला होता. कोजागिरी नंतर अक्षरश: १० दिवसांत या कार्यक्रमाची तयारी केली होती. त्या कार्यक्रमातील पहिलेच गाणे होते " जय शारदे वागीश्वरी". कवियित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या या कवितेला श्रीधर फडके यांनी संगीत दिले आहे, आणि आशाताई भोसले यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या निवेदनासाठी ४-५ ओळी लिहायच्या होत्या. 

कवियित्री शांता बाईंनी इतकी सुंदर कविता लिहिली आहे की त्याला प्रस्तावनेची गरजच नाही. हे गाणे ऐकताना किंवा कविता वाचताना डोळ्यासमोर देवी सरस्वतीची शांत, धीरगंभीर आणि तेजस्वी मुद्रा आपल्या डोळ्यासमोर येते. वागीश्वरी (वाग्देवी) हे देवी सरस्वतीचे आणखीन एक नाव. सर्व भाषांची देवता म्हणून तिला वागीश्वरी असे म्हणतात. विधीकन्या म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची मुलगी.  

जय शारदे वागीश्वरी,
विधिकन्यके विद्याधरी ।। धृ. ।।

ज्योत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी ।।१।।

वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली
उन्मेष कल्प तरुवरी, बहरून आल्या मंजिरी ।।२।।

ऋतू हिरवा हा गाण्यांचा अल्बम तसा बराच लोकप्रिय आहे. त्यात सरस्वती वंदनेचे हे गाणे देखील माहितीचे होते. नवीन काहीतरी लिहायचे होते आणि काही सुचत नव्हते.  "ऋतू हिरवा" या ध्वनिफितीत हे २ अंतरे आहेत. 

या गाण्याच्या निमित्ताने काही युट्युब व्हिडिओ बघत होतो. त्यात एका कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी या गाण्याचा आणखीन एक अंतरा म्हणला. तो देखील तितकाच सुंदर आहे. 

स्पर्शामुळे, तव देवते, साकारली रुचिरा कृती,

शास्त्रे तुला, वश सर्वही, विद्या, कला वा संस्कृती,

लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वान्तरी ।। ३।।


दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन माहिती तर मिळालीच पण त्याच सोबत एका सुंदर गाण्याचा आणखीन एक पैलू देखील समोर आला. माझे निवेदनाचे काम आणखीनच सोपे झाले.

आपणही देवी सरस्वती कडे आशीर्वाद मागू,  “तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी”. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींची अखंड कृपा राहू दे.


-- अभिजीत जोशी,

३ ऑक्टोबर २०२४

 

No comments:

Post a Comment