काल अचानक Spotify वर "सेतू बांधा रे" हे गीत रामायणातील गाणे लागले. माझा मुलगा माझ्यासोबत गाडीत होता. गाणे ऐकता ऐकता त्याने अचानक प्रश्न विचारला. "बाबा, Will you please pause this song for a minute? I have a question. What is this song about?" त्याला रामायणातील काही गोष्टी माहिती आहेत. त्याला मी सांगितले की रामाला समुद्र ओलांडून लंकेत जायचे होते. वाटेत समुद्र होता आणि त्या वेळी आपल्या सारखे पूल नव्हते. म्हणून श्रीरामाने "नळ" नावाच्या त्याच्या वानर मित्राला सोबत घेऊन पूल बांधायचे ठरवले. आणि त्याला मदत करायला सगळी वानरसेना पुढे आली. त्यांनी मोठे मोठे दगड समुद्रात टाकले आणि पूल बांधला. हीच गोष्ट त्या गाण्यात सांगितली आहे.
आता ही माहिती मिळाल्यावर त्याचे आणखीन प्रश्न सुरु झाले. मला वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा प्रश्नांचा भडीमार झाला असेल. कधी कधी ही मुले जुदाई मधल्या परेश रावल सारखी सतत प्रश्न विचारत राहतात.
इंग्रजी मातृभाषा असलेल्या मुलाला या गाण्यातून किती प्रश्न पडतात? त्याचे कुतूहल जागे होत होते. "बाबा, Do they have cranes, construction vehicles? How can they bring all the big stones on the shoulder? Why Hanuman is so powerful? Why Ram want to fight with Raavan? Why this song tells story?" त्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना मला मजा येत होती. मी त्याला सांगितले की आपण दूरदर्शन वरील रामायण मालिका बघू.
प्रश्नोत्तरे संपल्यावर आम्ही पूर्ण गाणे ऐकले. कोरस मध्ये "सेतू बांधा रे, सेतू बांधा रे" ऐकताना तो पण त्याच्या typical accent मध्ये गात होता. हा सगळाच वेळ खूप सुंदर होता. घरी आल्यानंतर देखील त्याला पुन्हा हे गाणे ऐकायचे होते. भाषेचे बंधन न राहता एक वर्तुळ पूर्ण होत होते.
"Your dreams are YOUR dreams. It is wrong to expect that other people share them. If they do, you are lucky." आजकाल मुले वाढवताना हे पदोपदी लक्षात ठेवावे लागते. आपल्या मुलांची स्वप्ने वेगळी असू शकतात हे सत्य समंजसपणे तुम्हालाही स्वीकारता आले पाहिजे आणि त्यांना हवा असणारा अवकाश तुम्हाला देता आला पाहिजे.
माझे आजोबा कायम म्हणायचे, " एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे पैसे, जमीन, स्थावर मालमत्ता हस्तांतर होतेच. परंपरा आणि संस्कार यांची मात्र ओळख करून द्यावी लागते.
पुढच्या पिढीला आपण फक्त परंपरांची ओळख करून द्यायची. त्या परंपरा त्यांच्यावर लादायच्या नाहीत. त्यांना जर परंपरा आवडली तर ते पुढे नेतीलच. आपण फक्त त्या सेतू चे काम करायचे."
-- अभिजीत जोशी,
४ ऑक्टोबर २०२४
No comments:
Post a Comment