Thursday, 27 July 2023

आदरणीय डॉ. कलाम सर

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, 
चांदणे ज्यातून फाके, शुभ्र पाऱ्यासारखे,
देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, 
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा..
- कवी बा. भ. बोरकर


आज २७ जुलै, भारतरत्न डॉ. कलाम यांची पुण्यतिथी. तरुणाईला ध्येयवादी स्वप्ने बघायला सांगणारा एक अधुनिक संत. काही लोक जगाच्या कल्याणासाठी जन्माला येत असतात. कितीही संकटे आली तरी त्यांच्या तत्वांना घट्ट चिकटून राहतात. कितीही सत्ता मिळाली तरी त्याचा साधू प्रमाणे वापर करतात. स्थितप्रज्ञ वृत्तीने मोहमाया सोडून स्वतःच्या आवडत्या कार्यात झोकून देतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील विद्यार्थ्यांना शिकवत असताना देह सोडून जातात. याला संत म्हणावे नाहीतर दुसरे काय. मला डॉ. कलाम तसेच वाटतात. हा एकमेव मनुष्य ज्याने करोडो भारतीय युवा वर्गाला ध्येयवादी  स्वप्ने बघायला शिकवली. ही स्वप्ने जगायला शिकवली. विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टींना अध्यात्माची जोड देऊन भव्य दिव्य साध्य साकार करायला प्रेरणा दिली.  आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली.

आदरणीय डॉ. कलाम सर,
सविनय साष्टांग प्रणाम. 
आज तुम्हाला ईश्वराकडे जाऊन ८ वर्षे झाली. आजही तुम्ही तिकडच्या लोकांना नक्कीच काहीतरी वेगळे शिकवत असाल. त्यांना देखील नवनवीन स्वप्ने बघायला सांगत असाल. आजचे हे पत्र तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी लिहिले आहे. 
आयुष्यभर तुम्ही एक तपस्वी आयुष्य जगलात. आजच्या युगात देखील माणूस तत्वाला चिकटून राहू शकतो, काहीतरी वेगळे करू शकतो. हे तुम्ही करून दाखवले. भारतातील असंख्य युवकांना, तरुण पिढीला तुम्ही वेगळी दिशा दाखविली. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता स्वकर्तुत्वाने सिद्ध होण्याला प्राधान्य दिले. तुम्ही स्वतः ही वाट शोधली आणि मगच लोकांना सांगितली. संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" तुम्ही जगलात. 
रामेश्वर सारख्या ठिकाणी राहून, सर्वसामान्य आयुष्य जगत असताना, निव्वळ गुणवत्ता आणि कर्तृत्व यांच्या बळावर तुम्ही उच्चशिक्षण पूर्ण केले. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. राजा रामण्णा यांच्या सोबत तुम्ही भारताचा अंतराळ विकास आणि संशोधनात मोलाची भर टाकली. भारताच्या सामरिक शक्तीचा अग्निबाण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. पोखरण अणू चाचणीनंतर तर या यशात आणखीन भर पडली. देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी तुम्ही सदैव प्रयत्न केलेत. "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी सन्मानाने तुह्माला गौरवण्यात आले. 
आयुष्यातील संकटांना धीराने सामोरे कसे जावे याचे वर्णन तुमच्या जगण्यात आहेच. "अग्निपंख" हे तुमचे आत्मचरित्र एखाद्या दीपस्तंभासारखे सदैव योग्य दिशा दाखवते. मला सर्वात जास्त भावतो तो तुमचा साधेपणा आणि साधू वृत्ती. भारताच्या राष्ट्रपती पदावर तुम्ही विराजमान झालात. त्या पदाची शान, गौरव, गरिमा एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवली. ती कक्षा ओलांडायला कोणत्याही राजकारणी माणसाला अग्निबाणासारखे परिश्रम करावे  लागतील. 
मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा होती. तुमच्या अचानक जाण्याने ही  इच्छा या जन्मी तरी तशीच राहील. पण तुमच्या राष्ट्रपती पदाच्या कालावधीत तुम्ही सर्वांसाठी सहज उपलब्ध होतात. मी त्यावेळी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. त्यावेळी मी तुम्हाला एक ई-मेल पाठविली होती. मला वाटले नव्हते की त्याचे काही उत्तर मिळेल. पण एवढ्या व्यापातून तुम्ही ई-मेल वाचली होती आणि त्याला उत्तर दिले होते. हा तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत सदैव आहे. 

तुमच्या प्रत्यक्ष भेटीत आभार व्यक्त करणे इतके व्यवस्थित जमले नसते. खरेतर मला काही शब्दच सुचले नसते. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर, तत्वांवर चालण्याची प्रेरणा मिळत राहो इतकीच अपेक्षा.  

तुमचा विद्यार्थी,
अभिजीत   

No comments:

Post a Comment