Friday, 31 March 2023

गंपूची दातदुखी

नमस्कार बालमित्रांनो, कसे  आहात तुम्ही? आज मी तुम्हाला गंपूची गोष्ट सांगणार आहे. 
गंपू तुमच्यासारखाच एक छोटा मुलगा होता. त्याला वेगवेगळे पदार्थ खायची आवड होती. तो आईला रोज नवनवीन पदार्थ करायला सांगायचा. कधी पोळीभाजी, कधी भाकरी, कधी पिझ्झा तर कधी पास्ता. त्याची आई त्याला हे पदार्थ करून खायला द्यायची. 
गेले काही दिवस गंपूला दात घासायला आवडत नव्हते. रोज काही ना काही कारण काढून तो दात घासायचे टाळायचा. तो म्हणायचा, "दात कशाला घासायचे? सारखे खात राहिले की दात आपोआप स्वच्छ होतात." असे २-३ आठवडे त्याने दात घासलेच नाहीत. काही खाल्ल्यावर चूळ देखील भरली नाही. गंपूच्या दातांना आता काळजी वाटायला लागली. ते म्हणाले, "गंपू जर असेच करत राहिला, तर आपल्यावर किडे होतील, ते आपल्याला  खाऊन टाकतील". आणि असेच झाले. 

एके दिवशी गंपू सकाळी उठला ते दात दुखतो आहे म्हणूनच. त्याने अंथरूणातूनच आईला हाक मारली. "आई ग, माझा दात खूप दुखतो आहे. तू बघशील का जरा? मला खाता येईल ना? त्या दाताला सांग ना दुखू नको म्हणून." गंपू अगदी रडवेला झाला होता. आई आली आणि म्हणाली, " गंपू, आ कर बघू. कुठं दुखते आहे सांगशील का? " गंपूने आईला कुठं दुखते आहे ते सांगितले. गंपूच्या दाताला कीड लागली होती. त्याच्या तोंडाला घाण वास येत होता. आईने विचारले, " गंपू, तू दात घासत नाहीस का?" गंपू म्हणाला, "दात कशाला घासायचे? सारखे खात राहिले की दात आपोआप स्वच्छ होतात." आई म्हणाली, चल तुला आता दाताच्या दवाखान्यात घेऊन जाते. आईने लगेच दवाखान्यात फोन केला आणि दंतवैद्याची वेळ (अपॉइंटमेंट) घेतली.  

गंपू आईसोबत कार मध्ये बसून दवाखान्यात आला. दात अजूनही दुखत होता. दवाखान्यात दातांची वेगवेगळी कार्टून्स होती. काही हसणारे दात होते. काही दातांवर छोटे छोटे किडे बसलेले होते. ते पाहून त्या दाताचे तोंड रडवेले झाले होते. गंपूला ही कार्टून्स खूपच वेगळी वाटली. हसणाऱ्या दाताचे चित्र गंपूला खूपच आवडले. थोड्या वेळाने डॉक्टरांनी गंपूला आत बोलावले. 

गंपू आईसोबत आत गेला. त्या डॉक्टरांचे नाव होते डॉ. ईशा. आत गेल्यावर डॉक्टरांनी गंपूला विचारले," कसा आहेस गंपू? दात काय म्हणत आहेत? "

गंपू रडवेल्या आवाजात म्हणाला, " डॉक्टर, माझा दात खूप दुखतोय. त्यामुळे मला काही खाता येत नाहीये."
डॉ. ईशा म्हणाल्या," ठीक आहे. आपण तुझ्या दात तपासुया. आपण तुझ्या दाताला पटकन बरे करू. तू काळजी करू नकोस. तू त्या समोरच्या खुर्चीत बसशील का?" 

समोरची खुर्ची खूप वेगळी होती. गंपू त्यावर मस्त पाय पसरून आडवा झाला. समोरच एक टीव्ही होता. डॉक्टरांनी त्याला त्याच्या आवडत्या कार्टून बद्दल विचारले. गंपू एकदम खुश झाला. तो म्हणाला मला कोकोमेलन (Cocomelon) खूप आवडते. मग डॉक्टरांनी त्या टीव्ही वर कोकोमेलन सुरु केले. गंपूला एरवी डॉक्टरकडे जायला भीती वाटायची. इथे मात्र आडवे पसरून टीव्ही बघायला मिळतोय हे बघितल्यावर गंपूची स्वारी आनंदली. तेवढ्यात डॉ. ईशा त्यांचा गॉगल आणि त्यावरचा दिवा चालू करून आल्या. त्यांनी खुर्चीची बटणे दाबून त्यांना हवी तशी उंच केली. गंपूला तर हवेत वर खाली होणाऱ्या खुर्चीची गंमत वाटत होती. त्याला विमानात बसल्यासारखे वाटत होते. 

तेवढ्यात डॉ. ईशा यांनी गंपूला आ करायला सांगितले आणि दात तपासायला सुरुवात केली. गंपूच्या तोंडाला खूप विचित्र वास येत होता. त्याच्या दातावर खूप घाण होती. डॉक्टरांनी त्याच्या दाताचे काही फोटो काढले. त्यांनी गंपूला विचारले, "गंपू, तुला तुझे दात बघायचे आहेत का कसे दिसतात ते?" गंपू हो म्हणाला. त्यांनी कोकोमेलन थांबवले आणि गंपूच्या दातांचे फोटो मोठे करून समोरच्या टीव्ही वर त्याला दाखवले. 

"ई..." गंपू किंचाळला. "माझे दात एवढे पिवळे, काळे का दिसत आहेत?" 
डॉ. ईशा म्हणाल्या, " अरे गंपू, तुझ्या दातांना तू घासलेच नाहीस. म्हणून त्याच्यावर किटण चढले आहे. त्यामुळे तुझ्या तोंडाला वास येतोय आणि दात देखील दुखतो आहे."

"आता काय करायचे? मला माझे दात परत पूर्वीसारखे स्वच्छ हवे आहेत. माझ्या दातांना किड्यानी खायला नको. तुम्ही काहीतरी करा ना डॉक्टर." गंपू अगदी अजीजीच्या स्वरात म्हणाला. 

डॉ. ईशा म्हणाल्या, " अरे गंपू, आज आपण तुझे दात स्वच्छ करू आणि या किड्याना पळवून लावू. पण ते जर परत यायला नको असतील तर तुला रोज २ वेळा दात घासले पाहिजेत. एवढेच नव्हे तर तू जेव्हा काहीतरी खाशील, तेव्हा खाऊन झाल्यावर खुळखुळून चूळ भरली पाहिजेस. तू हे करशील का?"

गंपू हो म्हणाला. त्याला त्याचे दात परत पाहिल्यासारखे स्वच्छ आणि सुंदर हवे होते.
 
गंपू हो म्हणाला आणि त्याच्या दातांना खूप आनंद झाला. डॉ. ईशा यांनी गंपूला परत आ करायला सांगितले. त्या म्हणाल्या, "आता मी पाण्याचा वेगवान फवारा (Spray) वापरून तुझ्या दातांना अंघोळ घालणार आहे." त्यांनी पाण्याचा फवारा सुरु केला. गंपूच्या दातांना आता गुदगुल्या होत होत्या. ते खूप खुश होते. खूप दिवसांनी त्यांना अंघोळ करायला मिळाली होती. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दातातले किटण थोडे कमी झाले. 

मग डॉ. ईशा यांनी गंपूला त्याच्या आवडत्या चवीबद्दल विचारले. "गंपू, तुला कोणती पेस्ट आवडते? स्ट्रॉबेरी, वॅनिला, फ्रेश मिंट का फ्रुट पंच?" गंपू म्हणाला, "मला फ्रेश मिंट आवडते." मग डॉक्टरांनी फ्रेश मिंट पेस्ट एका छोट्या ब्रश वर घेतली. तो ब्रश देखील आपोआप चालायचा. गंपूच्या दातांना परत गुदगुल्या झाल्या. पेस्ट च्या फेसामुळे दातातील अगदी बारीक बारीक घाण, किटण निघून गेले. नंतर परत पाण्याचा फवारा वापरून गंपूला चूळ भरायला लावली. गंपूचे दात एकदम स्वच्छ झाले होते. दात दुखी थोडी कमी झाली होती. नंतर डॉ. ईशा यांनी त्याला काही गोळ्या दिल्या आणि पुढचे ३ दिवस घ्यायला सांगितल्या. 

परत जाताना त्यांनी गंपूला एक छोटी पेस्ट, ब्रश आणि फ्लॉस दिला. त्याला रोज न चुकता दात घासायला सांगितले. गंपू म्हणाला, "थँक यु डॉक्टर ईशा. मी आता माझ्या दातांची नीट काळजी घेईन." गंपू त्याच्या आई सोबत गाडीत बसून घरी गेला. गंपू खुश होताच पण त्याचे दात त्याच्या पेक्षा जास्त खुश होते. 

आता मात्र गंपूच्या पोटाला भूक लागली होती. पोटाने दातांना सांगितले की तुम्ही काहीतरी खावा म्हणजे ते माझ्यापर्यंत पोचेल. गंपूच्या मेंदूने त्याला सांगितले. गंपूने लगेच आईला हाक मारली. "आई, मला काहीतरी खायला दे ना. मला खूप भूक लागली आहे." आईने पटकन गंपूला आंबा चिरून दिला. गंपूने मटकन खाल्ला आणि आईने न सांगताच हात स्वच्छ धुवून चूळ देखील भरली. 

गंपूला त्याची चूक कळली होती. त्याने डॉ. ईशा यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या दातांची काळजी आणि निगा राखायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे दात कधीही दुखले नाहीत. 

माझ्या छोट्या दोस्तांनो, तुम्हाला गोष्ट आवडली का?  तुम्ही रोज दात घासता का? मला नक्की सांगा. 

-- अभिजीत जोशी 
३१ मार्च २०२३

No comments:

Post a Comment