कोविड मुळे गेल्या २-३ वर्षात खूप व्यक्तींना अचानक पणे या जगाचा निरोप घ्यावा लागला. या असाध्य आजारामुळे प्राण गमवाव्या लागलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. माझे पूर्ण मॅरेथॉन हे त्यांना समर्पित आहे. कोविड सारख्या रोगातून बोध घेऊन सर्वांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी अशी मनापासून सदिच्छा. सर्वे सन्तु निरामय:!!
मला २०२२ मध्ये संपूर्ण मॅरेथॉन (२६.२ मैल किंवा ४२ किलोमीटर) धावायची होती. मी ऑक्टोबर २०२२ मध्ये मारिन कॉर्प मॅरेथॉन धावणार होतो. त्यासाठी जून २०२२ पासून तयारी सुरु केली होती. पण ऑगस्ट मध्ये कोविडची बाधा झाली आणि ३ आठवडे माझा सराव थांबला. मी परत धावायला सुरुवात केली आणि जाणवले की धावायची क्षमता खूप कमी झाली आहे. कोविड व्हायच्या आधी मी सलग १०-१२ मैल न दमता धावू शकत होतो. पण कोविड नंतर २ मैल धावले तरी प्रचंड दम लागायचा. सुदैवाने मी लवकर बरा झालो पण ऑक्टोबर मधली मॅरेथॉन धावायची संधी हुकली. त्यानंतर १९ मार्च २०२३ ला आमच्याच गावात पूर्ण मॅरेथॉन होती. मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून सराव सुरु केला. इकडच्या थंडीच्या दिवसात सराव करताना शारीरिक तसेच मानसिक क्षमतेचा कस लागणार होता.
मी शाळेत असताना सगळे खेळ जरी खेळत होतो तरी त्यात विशेष प्राविण्य नव्हते. मध्यमवर्गीय संस्काराप्रमाणे सर्व लक्ष अभ्यासावर आणि परिक्षेत चांगले गुण मिळवण्यावर होते. सुट्टीत सातारच्या अजिंक्यताऱ्यावर जाणे किंवा कुरुंदवाड, सदलगा या ठिकाणी भरपूर सायकल चालवण्या व्यतिरिक्त कधी जास्त व्यायाम केल्याचे मला आठवत नाही. इचलकरंजीत बोरिंग वरून घरापर्यंत पाण्याच्या खेपा करताना जेवढा व्यायाम व्हायचा तेवढाच. अगदीच कधी कधी योगासने किंवा सकाळी फिरायला जाणे व्हायचे. पुढे कामाला लागल्यानंतर रोज भरपूर सायकल चालवायला लागायची. घर ते बस स्थानक, मग सटर फटर कामासाठी देखील सायकल लागायची. फौंड्रीत काम करताना क्यूपोला भट्टीतून साचे भरताना हात भरून यायचे. उकळता लोखंडाचा रस लोखंडाच्या जाड बादलीत घेऊन वाळूच्या साच्यात ओतत असताना मजा यायची. पुढे टाटा मोटर्स मध्ये मुख्य गेट पासून सुमो, सफारी विभागात जाताना भरपूर चालणे व्हायचे. आयटी मध्ये आल्यापासून व्यायाम कमी होत गेला आणि वजनाचा काटा वाढायला लागला.
परदेशी आल्यावर जरा सुखवस्तू झालो होतो. २०१४ साली न्यूयॉर्क मध्ये NYRR सोबत धावायला सुरुवात केली. सुरुवातीला मला सलग २ मिनिटे देखील धावता यायचे नाही. कालांतराने २, ५ १०, २० मिनिटे असे करता करता ५ किलोमीटर, १० किलोमीटर धावणे जमायला लागले. २०१७ साली पहिली अर्ध मॅरेथॉन धावलो. त्याला देखील ३ तास लागले. २०२१ मध्ये इकडच्या मराठी मंडळाचा धावणारा चमू (RTPMM Running Group) बद्दल माहिती मिळाली. त्या चमू सोबत पळण्याच्या सरावामध्ये सातत्य आले. या सातत्यामुळे वजनकाटा हळू हळू कमी वजन दाखवू लागला. धावण्याबद्दल आत्मविश्वास आला. मग बरेच बदल दिसू लागले. अर्ध मॅरेथॉन ३ तासावरून २.३० तास आणि आता तर त्याच्या पेक्षा कमी वेळात धावू लागलो होतो. २०२२ मध्ये पूर्ण मॅरेथॉन धावायचा विचार केला आणि मारिन कॉर्प स्पर्धेत नाव नोंदणी केली. (क्रमशः)
No comments:
Post a Comment