आजकाल बरेचसे चित्रपट बघण्याच्या लायकीचे निघत नाहीत असे आपण खूप वेळा म्हणतो. मध्यंतरी कोविड च्या काळात या चित्रपट सृष्टीला ग्रहण लागले होते. सुदैवाने गेल्या काही आठवड्यात खूप मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आजच, म्हणजे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने "पावनखिंड" चित्रपट बघण्याचा योग आला. येथील मराठी मंडळाने चोख व्यवस्था केली होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने एकाच्या ऐवजी दोन खेळ आयोजित करावे लागले. मला तर अजूनही असे वाटते की कदाचित आणखीही काही खेळ आयोजित करावे लागतील. असो. तेलगू किंवा तामिळ चित्रपटांसारखे मराठी चित्रपट देखील इकडे प्रदर्शित व्हावेत ही अपेक्षा. आता वळू पावनखिंड या चित्रपटाकडे.
वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पन्हाळगडावरील पुतळा |
वीर
बाजीप्रभू देशपांडे म्हणले की कुसुमाग्रज यांनी लिहिलेले, हृदयनाथ मंगेशकर
यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गायलेले "सरणार कधी रण" हे अजरामर गाणे आठवते.
"पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता घरी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी"
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी विषयाची उत्तम मांडणी केली आहे. स्वत: छत्रपती शिवराय गोष्ट सांगत आहेत ही संकल्पना छान वाटली. माझ्या किंवा माझ्या आधीच्या पिढीने हा इतिहास वाचलेला आहे. त्यामुळे कथा चटकन समजली. इथे जन्मलेल्या मुलांना किंवा अमराठी लोकांना हा चित्रपट समजण्यासाठी थोडी पूर्वतयारी करावी लागेल. हे माझे वैयक्तिक मत आहे. युद्धाचे प्रसंग छान झाले आहेत. विशेष परिणामकारक (Special Effects) तंत्रज्ञान अजूनही चांगले वापरण्यासाठी वाव आहे. ही कथा अमर बलिदानाची, स्वामी निष्ठेची आणि अफाट साहसाची आहे. त्यामुळे शेवट कसा असेल याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो.
अंकित मोहन, हरीश दाढे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, क्षिती जोग आणि सर्व कलाकारांच्या भूमिका चोख झाल्या आहेतच. मला सर्वात जास्त आवडलेली भूमिका मात्र या चित्रपटाचे मुख्य पात्र वीर बाजीप्रभू देशपांडे यांची. अजय पुरकर यांनी ही भूमिका उत्कृष्ट साकारलेली आहे. त्यांनी घेतलेली शारीरिक मेहनत, अभिनयातील सहजपणा आणि युद्ध प्रसंगातील आवेश अवर्णनीय. पन्हाळगडावरील वीर बाजीप्रभूंचा पुतळा जिवंत झाला आहे की काय इतकी अस्सल वेशभूषा जमली आहे. त्यांनी या भूमिकेचे सोने केले आहे. त्यांचे रणांगणावरील संवाद शौर्य जागवतातच अन प्राणाहुती देताना डोळ्याच्या कडा आपोआप पाणावतात.
चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत उल्लेखनीय आहे. देवदत्त मनीषा बाजी या तरुण संगीतकाराने खूपच मेहनत घेऊन सुंदर संगीत दिले आहे. "युगत मांडली", "राजे आलं", "श्वासात राजे, ध्यासात राजे", "रणी निघता शुर" आणि बेला शेंडे यांनी गायलेले अंगाईच्या धाटणीचे शेवटचे गाणे. काही काही गाणी अगदी चित्रपट संपल्यानंतरही मनात गुंजत राहतात. काही प्रसंगांत पार्श्वसंगीत खूप जास्त झाले आहे असे वाटते पण चित्रपटाच्या एकंदर आवेशात कुठेही कमतरता नाही.
छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरील आठ चित्रपटांच्या मालिकेतील "पावनखिंड" हे पुष्प चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा. मराठी इतिहासातील बांदल सेना, वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद आणि इतर शूरवीर यांना मानाचा मुजरा. तुम्हा सर्व वाचकांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
- अभिजीत जोशी, २७ फेब्रुवारी २०२२
No comments:
Post a Comment