Wednesday, 6 October 2021

देवाचिये द्वारी..!! (The DIY temple making experience)

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणें मुक्ति चारी साधियेल्या !! असे संत ज्ञानेश्वरांनी एका अभंगात लिहिले आहे. देवासमोर काही क्षण बसले की एक असीम शांतता अनुभवायला येते. इतके दिवस घरातील देव बिचारे एका टेबल वर विराजमान होते. खूप दिवसांपासून देवघर बनवावे असे मनात होते. त्या गोष्टीला योग येत नव्हता. आमच्या सौभाग्यवतींनी गणपतीच्या आधी देवघर बनवा अशी कालमर्यादा आखून दिली होती. गृहमंत्रालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर काय हाल होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. या वर्षी वेळ काढला. गणपती उत्सवाच्या आधी देवघर बनवावे असे ठरवले. 

युट्युब वर असलेल्या बऱ्याच चित्रफिती बघितल्या. काही ब्लॉग्स वाचले. त्यानुसार काही रेखाचित्रे काढली. त्यामधून अशा प्रकारचे देवघर बनवायचे ठरले.  काही महत्वाचे निर्देश 

१) देवघर सहज उचलता यायला हवे 

२) रुंबा (cleaning robot) देवघराच्या खालून स्वच्छ करू शकेल इतकी त्याची उंची असावी 

३) पूजेचे सामान ठेवण्यासाठी एखादा कप्पा असावा 

४) घराच्या रंगाला साजेसा रंग असावा 

मिळालेल्या सूचनांनुसार खालील रेखाचित्र बनवले. त्यानुसार पुढील काम सुरु केले. 

बऱ्याच दिवसांनी अभियांत्रिकी शिक्षणाचा घरातील वस्तू बनवण्यासाठी उपयोग झाला. आमच्या शाळेत तांत्रिक शिक्षणाचे काही विषय होते. सुतारकाम हा एक विषय होता. तेंव्हा रंधा मारणे, लाकडाला भोके पाडणे असे काहीतरी उद्योग शाळेत असताना केले होते. त्याचा थोडासा फायदा यावेळी झाला. 

आता पुढील काम होते सगळे सामान आणणे. इकडे Lowes नावाचे एक दुकान आहे. तिकडे अशा प्रकारच्या कामासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात. 


माझ्या मित्राने त्याच्याकडील सुतारकामासाठी लागणारी सगळी यंत्रे दिली. त्याचा खूप उपयोग झाला. खालील यंत्रे या कामासाठी वापरली. 
1) Cordless Drill
2) Cordless Circular Saw
3) Miter Saw
लाकूड कापणे (Wood Cutting into planks)
लाकडाची फळी बरीच मोठी होती. मला त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या फळ्या कापायच्या होत्या. माझ्या कडे आरी (Cordless Circular Saw) होती. पण जर तुमच्याकडे आरी नसेल तर Lowes मध्ये तुम्हाला हव्या त्या आकाराच्या फळ्या कापून मिळतात. मी खालील आकाराच्या फळ्या कापल्या. 
  • Plank A - 16in X 24in - 3 Nos
  • Plank B - 12in X 24in - 2 Nos
  • Plank C - 11.5inX 11.5in - 2 Nos - For doors
सजावटीच्या लाकडाचे २ प्रकार आणले होते. त्याचा उपयोग देवळाच्या छताची सजावट करण्यासाठी झाला.  सजावटीसाठी लाकूड ४५ अंशाच्या कोनात कापावे लागते. त्याची आरी वेगळी असते (Miter Saw). हे लाकूड कापताना खूप चुका झाल्या. खूप शिकायला देखील मिळाले. 

कापलेल्या फळ्यांची जुळवणी (Temple Assembly)
सगळ्यात आधी प्रत्येकी २ Plank A आणि Plank B वापरून सामान ठेवण्यासाठी पेटी बनवली. लाकूड एकमेकांना चिकटवण्यासाठी गोरिला डिंक (Gorilla Glue) वापरला. लाकूड चिकटवून झाल्यावर त्यांना स्क्रूने जोडले. पेटीच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर ३ स्क्रू वापरले. पेटीला खालील बाजूला लाकडी पाय लावले. पेटीच्या वरील बाजूला देवळाचे खांब लावले. खांब लावल्यानंतर त्याला तिसरी Plank A स्क्रू ने जोडली.  

 
हा आतापर्यंतचा सगळ्यात सोपा टप्पा होता. खरी गमंत तर पुढे होती. दरवाजा बनवण्यासाठी दोन्ही Plank C ला बिजागरी (Door Hinges) लावल्या. हे काम करताना तुमच्या भूमितीच्या ज्ञानाचा कस लागतो. हे करताना देखील बऱ्याच चुका झाल्या. काहीही केल्या दरवाजाच्या फळ्या एकमेकांना संलग्न (alignment) येत नव्हत्या. कधी डावी बाजू वर जायची. कधी दरवाजा झाकल्यानंतर मोठी फट दिसायची. कधी दरवाजा बंदच व्हायचा नाही. अशा खूप गंमती-जमती झाल्या. एकदा तर मी इतका वैतागलो की दरवाजा ऐवजी सरकणारा कप्पा (Drawer) बनवावा असा देखील विचार आला. "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, बसव दार देवा आता, बसव दार देवा" असे मजेशीर गाणे सुचत होते. सरते शेवटी संपूर्ण ८ तास अथक प्रयत्न करून दरवाजा नीट लागला आणि मी सुटकेचा निःश्वास घेतला. 

अर्धवर्तुळाकार प्रभावळ (Semi Circular Arch)
देवळाच्या मागील बाजूला आम्ही प्लायवूड वापरणार होतो. पण सजावटीचे सामान घेण्यासाठी Hobby Lobby नावाच्या दुकानात गेलो असताना एक लाकडी खिडकी दिसली. तिचा वरील भाग अर्धवर्तुळाकार होता. मी तेवढा भाग कापला आणि देवघराच्या मागील बाजूला चिकटवला. 
त्यानंतर छतावर नक्षीकामाचे लाकूड गोरिला डिंक वापरून चिकटवले. छतावर गोपुराचे आकार चिकटवले. छताच्या मध्यभागी शिखरासारखे ३ आकार चिकटवले. दरवाजाला देखील चौकट बसविली. सजावटीचे सगळे सामान Hobby Lobby दुकानातून आणले. आता देवघराला एक चांगला आकार आला होता. 

रंगरंगोटी आणि इतर सजावट 
रंगरंगोटी हा खूप वेळखाऊ प्रकार आहे. आम्ही नैसर्गिक लाकडाचा आभास यावा म्हणून Wood Stain वापरायचे ठरवले. ते लावण्यासाठी कुंचला (Brush), जुन्या कापडांच्या चिंध्या आणि कागद असे तिन्ही प्रकार वापरले. जुन्या चिंध्या अगदी उपयोगी आल्या. त्यांच्यामुळे एकसंध रंग लावता आला. Wood Stain कसा लावावा हे दाखवणाऱ्या बऱ्याच चित्रफिती यूट्यूब वर उपलब्ध आहेत. तुम्ही ते बघून ठरवू शकता की कोणता प्रकार वापरावा. हा रंग वाळायला बराच वेळ लागतो. त्याचा एक प्रकारचा विशिष्ट वास असतो. तो जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे Stain करून २ दिवस तरी उन्हात ठेवा. 
महत्वाची सूचना - रंग लावताना देव्हारा एखाद्या पोत्यावर किंवा जुन्या सतरंजी/प्लास्टिक कागदावर ठेवावा. रंग लावताना बऱ्याचदा तो इकडे तिकडे पडतो. त्याचे डाग स्वच्छ करणे खूप अवघड असते. अगदीच जमले तर लाकडी पाय आणि खांब आधीच Stain करून ठेवा. त्याचा तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. 
रंगरंगोटी झाल्यावर आम्ही छतावर छोट्या छोट्या घंटा अडकवण्यासाठी आकड्या (Hooks) लावल्या. समोरील बाजूला ४ आणि उजव्या, डाव्या बाजूला प्रत्येकी २ असे आकडे लावले. त्या नंतर त्यात घंटा लावल्या. हे सर्व करून झाल्यानंतर देवघर अतिशय सुंदर दिसत होते. त्याला एक वेगळाच साज चढला होता. 
 

हे सगळे झाल्यावर देवघराच्या छताला आतून LED Strip लावली. त्यामुळे संध्याळकाळच्या वेळी देवघरात छान प्रकाशाची सोय झाली. गणेश चतुर्थी दिवशी आम्ही विधिवत देवघरात देव ठेवून पूजन केले. मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. 
कोणतीही नवनिर्मिती करताना खूप धमाल येते. ही प्रक्रिया खूप काही शिकविते. अनेकदा बऱ्याच अडचणी येतात. त्या समजून, त्यावर उपाय शोधून काढणे हे आव्हानात्मक आहेच. त्याबरोबरीने सृजनात्मक विचार करता येणे हे देखील महत्वाचे आहे. 
हे देवघर बनवण्यात घरातील सर्व जणांचा सहभाग होता. माझ्या ३ वर्षाच्या मुलाने देखील त्याला जमेल तशी मदत केली. त्याला प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघण्याचा प्रचंड उत्साह होता. आमच्या सौभाग्यवतींनी सजावटीचे सर्व सामान आणले. ते व्यवस्थित चिकटवले. देवघर रंगवण्यात देखील तिने बरीच मदत केली. सुरवातीला संकल्पना आणि रेखाचित्रे बनविण्यात देखील तिचा महत्वाचा सहभाग होता. पंकज, जाई आणि इतर मित्र मंडळींचा देखील या निर्मितीत वाटा होता.अशा प्रकारे सर्वांच्या सहभागातून आमचे देवघर तयार झाले. रोज देवासमोर दिवा लावताना, शुभंकरोती म्हणताना एक वेगळीच अनुभूती येते. 
गणपती बाप्पा मोरया..!! मंगल मूर्ती मोरया..!! 

 
-- अभिजीत जोशी 

(तुमच्या प्रतिक्रिया/सूचना/अभिप्राय नक्की कळवा.)










No comments:

Post a Comment