Saturday, 27 February 2021

माय मराठी (५/५२)

आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना नमस्कार. आज राजभाषा दिनाच्या निमित्ताने बरेच व्यंगचित्र, अर्कचित्र, छायाचित्र फिरत होते. त्यातलाच एक सर्वांचा आवडता चिंटू. त्यात त्यांनी दाखवले आहे की चिंटू आणि त्याचे मित्र म्हणत असतात "मराठी बोलू", "मराठी वाचू", "मराठीत लिहू", "मराठीत भांडू" आणि "मराठी टिकवू". खरेच भाषा टिकली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. चिंटू च्या चित्राबरोबर पु. लं. चे देखील अर्कचित्र होते. "आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे."  

भाषेची ही चळवळ आजच्याच दिवशी एवढी का व्यक्त होते? कारणे काहीही असली तरी गेल्या काही वर्षात रोडावत जात असलेल्या मराठी शाळांकडे कुणाचे लक्ष नाही. गावोगावी इंग्रजी/सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या गतीने वाढत आहेत ते पाहता पुढील काही वर्षांत मराठी हा विषय ऐच्छिक होईल की काय असे वाटत आहे. अर्थात या शाळांच्या संख्येमागे आर्थिक गणित आणि राजकारण देखील असावे. हा वादाचा मुद्दा आहे. मला त्यात काही भाष्य करायचे नाही. महाराष्ट्रातच जर ही स्थिती असेल तर भारतात आणि जगात काय? 

परदेशात आजकाल मराठी कुटुंबांची संख्या बरीच वाढत आहे. येणाऱ्या नवीन पिढीवर किमान आपल्या मातृभाषेचे संस्कार व्हावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. इकडे बालरोग तज्ज्ञ (Pediatrian) सांगत असतात की मुलांशी तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोला. त्यामुळे त्यांच्या कानावर निदान या भाषेचे संस्कार होतील. इंग्रजी काय किंवा बाकीची कोणतीही भाषा ते इकडील शाळेत शिकतीलच. आठवड्यातून एकदाच भरणाऱ्या इकडच्या मराठी शाळांमध्ये थोडीतरी गर्दी दिसते. किमानपक्षी आजी -आजोबांसोबत, नातलगांसमवेत मराठी बोलता यावेत म्हणून बरेच पालक मुलांना या शाळेत घालतात. एकंदरीतच भाषा जिवंत राहील किंवा पुढील पिढीला निदान बोलता येईल इतपत तरी मराठी शिकण्याचे अन शिकवण्याचे काम सुरु आहे. मराठी स्वरमाला, व्यंजने , बाराखडी , बडबडगीते, छोटी छोटी वाक्ये, इसापनीती मधील गोष्टी वैगरे असाच काहीसा इथला अभ्यासक्रम आहे.

बोलीभाषेनंतर येते ते वाचन आणि लेखन. मराठी वाचन हे अत्यंत प्रगल्भ आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिल्या प्रमाणे "माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविण" खरोखरच या भाषेत अत्यंत गोडवा आहे. माझ्या बऱ्याच अन्य भाषिक मित्रांना देखील या भाषेचे अप्रूप वाटते. तसे बघायला गेले तर भारतातील बऱ्याचशा भाषा या "संस्कृत" भाषेतून जन्मलेल्या आहेत. मराठी काय, हिंदी काय किंवा तामिळ, तेलगू काय. त्या त्या प्रांतांनी या भाषा अंगिकारल्या म्हणून तशी राज्ये निर्माण झाली. असे म्हणतात की दर १०-१५ किलोमीटर मागे भाषा बदलत जाते. कोंकणी, आगरी, मालवणी, बाणकोटी,कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी, अहिराणी, वऱ्हाडी, नागपुरी, झाडीबोली, खान्देशी, मुम्बैय्या असे असे जवळपास ४२ उपप्रकार किंवा पोटभाषा (dialect) या मराठीच्या कक्षेत येतात. तुम्ही त्या त्या भागात गेलात तर हा फरक नक्कीच जाणवतो. खूप लेखकांनी या भाषा वैविध्यावर बरेच लेखन केले आहे. पु. लं. च्या एका लेखात (तुम्ही कोण? "मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर") त्यांनी हे वेगळेपण अत्यंत मार्मिक रीतीने मांडले आहे. आजकाल महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत या वेगवेगळ्या भाषांमधील विनोदी प्रहसने अनुभवायला खूप धमाल येते. या वेगवेगळ्या पोटभाषेतील शिव्या समजणे/ ऐकणे हे तर आणखीन सुंदर प्रकरण आहे. 

मराठी साहित्य हा खूप खोल विषय आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक शतकांचा याला इतिहास आहे. शिलालेखांवरून, भूर्जपत्रावरून सुरु झालेल्या या प्रकाराला दैदिप्यमान सुवर्ण परंपरा आहे. महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय यांनी या भाषेला खूप पुढे नेले.  संत ज्ञानेश्वर, कवी मुकुंदराज, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, संत जनाबाई यांचे ग्रंथ म्हणजे साक्षात दैवी प्रकार आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, भारुडे, लीळाचरित्र, विवेकसिंधु, दासबोध. हे शब्द लिहिताना देखील अंगावर शहारा येतो. अभंग, कीर्तन, भजन, प्रवचन, ओव्या  हे देवाच्या भक्तीचे प्रकार असोत किंवा पोवाडा, गण-गवळण, लावण्या, संगीत नाटक, नाटक, काव्यलेखन, चित्रपट लेखन असे मनोरंजन करणारे प्रकार असोत. मराठी साहित्यातील या प्रत्येक प्रकारात अनेक साहित्यिकांनी अजरामर कलाकृती निर्माण केल्या आहेत. मराठी व्याकरण, त्यातील संकल्पना, त्यातील वेगवेगळी वृत्ते हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. 

अकराव्या शतकापासून सुरु झालेल्या या मराठी भाषेला वेगवेगळ्या इतिहास कालखंडात नवनवीन भाषेतील शब्दांची भर पडत गेली. संस्कृत, प्राकृत, पर्शियन, इंग्रजी असे वेगवेगळे भाषेतील शब्द मराठीत मिसळत गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीर सावरकर यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे खूप प्रयत्न केले. इंग्रजाळलेल्या बऱ्याच शब्दांचे त्यांनी मराठीत पर्यायी शब्द तयार केले. 

काही दिवसांपूर्वीच विश्वास नांगरे पाटील यांचे "मन में है विश्वास" हे पुस्तक वाचले. त्यांनी "भारतीय प्रशासकीय सेवा" परीक्षेत मुलाखतीसाठी मराठी ही भाषा निवडली होती. त्यांनीच नाही तर मला आठवतंय त्याप्रमाणे श्री. ज्ञानेश्वर मुळे यांनी देखील मराठी भाषेतून मुलाखत दिली होती आणि "भारतीय परराष्ट्र सेवेत" त्यांची निवड झाली होती. ही दोन नावे प्रातिनिधीक आहेत. आजकाल बरेच मराठी युवक या स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत निवड झालेले दिसतात. 

गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे बऱ्याच भाषा या मिसळीसारख्या झाल्या आहेत. त्यातल्या त्यात सुखावणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मराठीच काय, कोणतीही प्रांतिक/विदेशी भाषा आपल्या भ्रमणध्वनी वर उपलब्ध आहे. भाषांतर करण्यासाठी खूप पर्याय आहेत. दरवेळी शब्दकोश हुडकायची गरज नाही. आजकाल तर अलेक्सा, सिरी, गुगल हे जादूच्या दिव्यातील राक्षसारखे झाले आहेत. दिवा (भ्रमणध्वनी) घासायाची पण गरज नाही, नुसती एक हाक मारा, हे आज्ञाधारी राक्षस क्षणात म्हणतात, "बोला मालक, काय आज्ञा आहे?" त्यांना सांगितले "भाषांतर करा" की तुमचा दुभाषा हजर. याचा फायदा बऱ्याच ठिकाणी होतो. मध्यंतरी गुगलची एक जाहिरात बघितली होती, ज्यात अनोळखी देशात गेल्यावर भ्रमणध्वनीतील भाषांतर पर्याय वापरून एक पर्यटक कुशलतेने ती विदेशी भाषा बोलतो आणि त्याचा प्रवास सुखकर होतो. 

शेवटी भाषा म्हणजे तुमचे आमचे व्यक्त होण्याचे साधन. आपल्या भाषेचा न्यूनगंड बाळगण्याचे कोणतेही कारण नसते. आपल्या बोलीभाषेत आपण चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. आपण जेवढे बोलू, वाचू, लिहू तेवढी ती भाषा समृद्ध होईल. 
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्वांना मराठीभाषा दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा..!!

अभिजीत जोशी 
- २७ फेब्रुवारी २०२१

1 comment:

  1. Khup sundar ani mafak vichar.aapali bhasha Japan aplyach Shasta ashe...ani suruvat pratyekachya gharatun hotel....

    ReplyDelete