योगायोगाने आज व्हॅलेंटाइन डे आहे. विषय तसा बराच खोल आहे. (प्रत्येकाने आपापल्या प्रकृती नुसार आणि झेपेल तसे प्रेम व्यक्त करावे. नंतरच्या परिणामांना लेखक जबाबदार नाही.)
प्रेम कुणावरही करावे. प्रेम व्यक्त करण्याचा असा कोणताही खास दिवस नसतो. मला आठवतंय साधारण १९९७/९८ नंतर १४ फेब्रुवारी या दिवसाला भारतात जरा जास्तच महत्व आले. विशेषतः दिल तो पागल है या चित्रपटानंतर. बॉलीवूडच्या खानावळीतून या पदार्थाला जरा जास्तच लोकप्रियता मिळवून दिली. या माध्यमाचा पगडा एवढा मोठा होता की काही चित्रपट बघून कुणीही सोम्या - गोम्या आपल्या प्रिय व्यक्तीला (विशेषतः मुलींना) बिनधास्त पणे भेटवस्तू, संदेश पत्रे पाठवू लागला.कदाचित या दिवसाचे माहात्म्य एवढे मोठे असावे की प्रेमिकांच्या मनात असलेली प्रेम व्यक्त करण्याची भीती या दिवशी नाहीशी होत असावी. (नुसत्या अंधश्रद्धा हो..) भारतात खूप मोठी बाजारपेठ या निमित्ताने तयार झाली.
तसे बघायला गेले तर जगभरात प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाला प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. चॉकलेट, फुले, केक, भेटवस्तू, संदेश शुभेच्छा पत्रे (ग्रीटिंग कार्ड्स) आणखीन बरेच काही या यादीत समाविष्ट आहे. प्रेमी युगलांसाठी या दिवसाचे प्रचंड अप्रूप आहे की बरेच साखरपुडे, लग्न सोहळे या दिवशी झालेले आपल्याला दिसतील. (तेवढाच दोन दोन दिवस साजरे करण्याचा खर्च वाचतो.)
बऱ्याच लोकांचे प्रेम व्यक्त जरी होत असले तरी प्रेम भंग होण्याचे प्रकार देखील या दिवशी झालेले दिसतात. प्रेमाच्या परीक्षेचा निकाल पचविणे हे काही साधे सोपे प्रकरण नाही. संदीप खरेच्या एका कवितेत म्हणल्या प्रमाणे, "प्रेमात म्हणे जो गडबडतो तो बडबडतो गाणी" किंवा "प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी" असे काहीसे प्रकार आढळतात.
प्रेमयोगात स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रेम ही खूप शक्तिशाली गोष्ट आहे. प्रेम हे निरपेक्ष भक्ती या प्रकारात मोडते. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रेम मनुष्याला अपार सुख देते. काम (वासना) आंधळी असते, ती नरकाच्या वाटेवर नेते. प्रेम विशुद्ध असते, ते मोक्ष मिळवून देते. प्रेम एकमेकांना बांधून ठेवते. प्रेम अद्वैताची अनुभूती देते. कथा, कादंबऱ्यांतून लिखित झालेले प्रेम, नाटक-चित्रपटातून दाखवलेले प्रेम हे बऱ्याचदा आसक्तीच्या वाटेवर जाणारे दिसते. प्रेमयोग समजणे देखील ज्ञानाची आणि योगायोगाचीच गोष्ट आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रेमात पडण्याचे आणि धडपडण्याचे बरेच खास क्षण येतात. बाल्यावस्थेत आणि म्हातारपणात ते खूप सुंदर असतात. पौगंडावस्थेत अन तारुण्यात मात्र या प्रेमाच्या क्षणांना खूप सांभाळून घ्यावे लागते. सर्वांसाठीच हा काळ खूप महत्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा असतो. मनाची अवस्था कोषातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरासारखी असते. भावना व्यक्त करण्यासाठी, समजून घेण्यासाठी कुणीतरी जवळचे माणूस असावे लागते. आपल्या सर्वात जवळच्या नात्यांमध्ये या गोष्टी समजून घेण्यासाठीची मानसिकता असावी लागते. भिल्लासारखं प्रेम करणे जरी साधी गोष्ट असली तरी प्रेमात वणव्यासारखे जळत राहणे चांगले नाही. एकतर्फी प्रेम या नावाखाली कित्येक जीव गेले आहेत. ते देखील ऐन उमेदीच्या काळात. आजकालच्या विकेंद्रित कुटुंब पद्धतीत आई वडिलांनी मुलांचे मित्र बनून राहणे ही काळाची गरज आहे. प्रेमाच्या परिभाषा पौगंडावस्थेतील मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना समजून घेणे हे देखील खूप आवश्यक आहे. शाळा कॉलेजेस मधून या विषयावर मानसिक समुपदेशन होणे गरजेचे आहे.
प्रेमाच्या गावाला जाताना प्रवासाचा आनंद घेणे खूप छान असते. असे म्हणतात की, "क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा". आपल्या जवळच्या माणसाला (विशेषतः जोडीदाराला) प्रेम व्यक्त करायला वेळ काळ बघावा लागत नाही. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी तुम्ही निसंकोच सांगू शकता. याला वयाचे बंधन नाही. एकमेकांसोबत मोठे होणे (Growing old together) ही फार सुंदर गोष्ट आहे. आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबानी वयाची बरीचशी वर्षे संसारात एकत्र घालवलेली असतात. त्या सर्व उत्साही अन मनाने तरुण जोडप्यांचे आयुष्यतील अनुभव कधीतरी विचारून पहा. माझे आजोबा अगदी शेवट पर्यंत आजीच्या औषधाच्या गोळ्या तिला न चुकता द्यायचे. तिच्यासाठी पाणी ठेवायचे, अंथरूण घालून ठेवायचे. बाबांनी आई साठी न सांगता आणलेली साडी किंवा आई ने बाबांसाठी केलेला त्यांच्या आवडीचा पदार्थ अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात.
कोण कुठल्या क्षणी, आपुले बंध जुळले,
काही न बोलता, सारे तुला कळले..
कोणते हे संकेत, कोणती ही भाषा,
मौनातही जुळल्या, हातावरल्या रेषा...
दोघांची ही स्वप्ने, प्रयत्नांची संगत,
पूर्ण होईल सारे, असता तुझी सोबत.. !!
प्रेम व्यक्त करायला काळ, वेळ, वय बघू नका. जगण्याची ही आनंदयात्रा अशीच अखंड चालू दे. सर्वांचे प्रेमाचे क्षण वृद्धिंगत होवोत. प्रेमाच्या गावाचा हा प्रवास सुखाचा होवो या सदिच्छा..!!
- अभिजीत जोशी
१४ फेब्रुवारी २०२१
No comments:
Post a Comment