जून २०२० पर्यंत असे वाटत होते की कोविड बरेच काही नुकसान करेल. सगळ्याच बाबतीत. लसीचे संशोधन सुरु होते. त्यावर बरेच वाद विवाद, चर्चा, मतभेद होते. अमेरिकेत निवडणुकीची धामधूम सुरु झाली होती. तात्या बरेच फॉर्मात होते. टिवटिवाट जोरात सुरु होता. त्यात अध्यक्षीय निवडणूक. त्यामुळे गोंधळ शिगेला पोचला होता. मधेच लोकांना नवीन विषय मिळत होतेच. अचानक राजकीय चळवळ सुरु झाली. तसे बघायला गेले तर एक माणूस चोरी करताना पकडला गेला होता. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आणि वणवा पेटत गेला. राजकारणात काय, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायला नेत्यांना हवेच असते. इकडे देखील त्याचा एवढा गवगवा केला गेला की प्रत्येक शहरामध्ये मोर्चे निघाले, दुकानांची लूटमार झाली. नेमके तात्यांनी तोंडावर ताबा ठेवला नाही आणि सगळी हवा फिरत गेली. लसीवरील ट्विट्स चांगलेच गाजले.
आम्ही देखील रोज कोविडची आकडेवारी बघतच होतो. नोबर्ट इलेकस नावाचा एक माणूस रोज आकडेवारीचे ट्विट करायचा. त्याला तर बऱ्याच लोकांनी चित्रगुप्ताची/यमदूताची उपमा दिली होती. त्याची आकडेवारी बघून उरात धडकी भरायचीच. कवितेच्या भाषेत सांगायचे तर "भय इथले संपत नाही" अशी अवस्था झाली होती. न्यूयॉर्क, जर्सी इकडचे लोक तर मृत्यूच्या सावटाखालीच जगत होते. या वर्षीचा उन्हाळा निव्वळ घरी बसून शिट्ट्या वाजवल्या.
जुलै ऑगस्ट मध्ये थोडासा दिलासा देणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. लसीवरील संशोधन बरेच पुढे गेलेलं होते. युरोपातील बऱ्याच देशात मृत्यू आणि बाधितांचा आलेख खाली झुकत होता. लोकांना लॉक डाऊन ची एवढी सवय झाली होती की नियंत्रित आयुष्य कसे जगावे याचा वस्तुपाठ घातला गेला. एकाच खेपेत बाहेरील सगळी कामे कशी करता येतील असा विचार होत गेला. यादी (लिस्ट) करायची छान सवय या काळात लागली. लहानपणी शिकवलेल्या स्वच्छ्तेच्या गोष्टींची अंमलबजावणी न चुकता व्हायला लागली. हातपाय धुणे, बाहेर जाऊन आले की अंघोळ करणे, ताजे अन्न खाणे, व्यायाम अशा आरोग्यदायी सवयी देखील लागल्या.
खूप वर्षानंतर बरीच कुटुंबे एकत्र आली. घरात आजी आजोबा आणि नातवंडांचे प्रेम संवाद ऐकू यायला लागले. माणसांची माणसांवरील, नात्यांवरील श्रद्धा वाढायला/ टिकायला या कोविड ने बरीच मदत केली. भलेही मित्र परिचित लोकांचे एकमेकांकडे येणे जाणे कमी झाले, किंबहुना प्रकृती स्वास्थ्यासाठी लोकांनी असे येणे जाणे टाळले. त्या ऐवजी आभासी भेटण्यात प्राधान्य आले. विवाह समारंभ, जत्रा, यात्रा वैगरे प्रकार कमी झाले. परदेशी राहणाऱ्या काही मित्र परिचितांना मात्र या काळात काही खूप वाईट अनुभव आले. विशेषतः एम्बसी लॉक डाऊन असल्यामुळे अगदी जवळच्या नातेवाईकांच्या (आई किंवा वडिलांच्या) अंतिम संस्काराला देखील जाता आले नाही. अशा बऱ्याच दुर्दैवी मित्रांच्या दुःखाच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. अगदी भारतात राहून देखील बऱ्याच लोकांना जाता आले नाही. हे असे प्रकार खूपच वेदनादायक होते.
गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण अगदीच आपल्या कुटुंबापुरते साजरे करावे लागले. तेवढ्यात बातमी आली की कोरोना चा नवीन प्रकार निघाला आहे आणि तो ६० ते ७० टक्के अधिक वेगात पसरतो. हे ऐकल्यावर तर आणखीनच भीती वाढली. आगीतून फुफाट्यात म्हणतात तसे होते का काय असे वाटू लागले. तेवढ्यातच या रोगावर लस निर्माण झाली आहे अशी बातमी आली. त्याचे चांगले परिणाम देखील दिसू लागले. २०२० सरता सरता आशेचे नवीन किरण घेऊन आले.
या वर्षाने बरेच काही हिरावून घेतले. अनेक रोजगार, संसार उध्वस्त झाले. अनेक स्वप्ने अर्धवट राहिली. काही देशांत एक पूर्ण पिढी या महामारीने नाहीशी केली. मानवाने किती जरी प्रगती केली तरी निसर्गापुढे त्याचा काही इलाज नाही आहे हे पुनश्च सिद्ध झाले. औषध वैज्ञानिक प्रक्रियेत आपण किती मागे आहोत हे या वर्षाने आणि कोरोनाने दाखवून दिले. सामाजिक जाणिवा सुधारण्यास अजूनही खूप वेळ लागेल हे देखील दिसून आले.
असे म्हणतात की "आशेवर ही दुनिया तग धरून आहे". तुम्ही आम्ही देखील याच विश्वासावर हे वर्ष पार केले. आधुनिक जगाच्या इतिहासात २०२० हे वर्ष विघटनकारी (disruptive) म्हणून नोंदले जाईल. तुमच्या आयुष्यात २०२० या वर्षाने काय दिले आणि काय घेतले? नक्की कळवा.
सर्वांना २०२१ हे वर्ष सुख, समाधान आणि आरोग्य घेऊन येवो..!!!
No comments:
Post a Comment