२०२० साल उजाडले तेच मुळी कोवीडचे सावट घेऊन. कुणालाही या गंभीर आजाराची तसूभर देखील कल्पना नव्हती. किंबहुना, एकूणच जगाला थांबविणारे असे काहीतरी अचानक प्रकट होईल, असा कुणालाच अंदाज बांधता आला नाही. साधारण फेब्रूवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून याची भीषण कल्पना यायला सुरुवात झाली. इटली मध्ये तर या रोगाने हाहाकार माजवला. तेथील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना इहलोकीची यात्रा समाप्त करावी लागली. आम्ही देखील भारत दौऱ्यासाठी गेलो होतो. सुदैवाने आम्ही फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात परत आलो. अगदी वेळेत इकडे पोचलो असे म्हणता येईल. आमचे विमान देखील पॅरिस मार्गे होते. युरोप मध्ये हा रोग वणव्या सारखा पसरत चालला होता. इंग्लंड, फ्रांस, इटली, जर्मनी इत्यादी देशांत अतिशय वाईट अवस्था होती. अमेरिकेत देखील न्यूयॉर्क, न्यूजर्सी मध्ये खूपच संक्रमण झाले होते. सगळी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. दवाखान्यात जागा शिल्लक नव्हत्या, कितीतरी लोकांना निव्वळ या कारणामुळे प्राण गमवावे लागले. एकंदरीतच नुसता सावळा गोंधळ सुरु होता.
जगाचे काय होणार? हा विषाणू मानव जात संपवणार की काय अशी भीती वाटत होती.कोण कुठल्या देशात वटवाघळे खातो आणि सगळ्या जगाला अडचणीत आणतो. अमेरिकेत तर इतकी वाईट स्थिती की ज्या देशाच्या हलगर्जी पणामुळे हे सगळे सुरु झाले, त्यावर प्राथमिक उपाय म्हणून मास्क देखील त्यांच्याच देशात तयार झालेले. इकडे ९० टक्के वस्तू तिकडूनच आयात होतात. इतके सगळे होऊन देखील, बाजारपेठेत यांचीच चलती. हे कुठेतरी थांबायला हवे. आपणच यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. आर्थिक नाकेबंदी करायची तर या देशात तयार होणाऱ्या वस्तूंचा कमीत कमी वापर करायचा. पुढील काही वर्षात जगभर हे नक्कीच होईल असं सध्यातरी वाटतंय. प्रत्येकानं या काळात बरेच काही भोगले आहे. बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह बंद पडला. ही स्थिती अजूनही काही प्रमाणात जगभर आहे. कित्येक लोकांचा रोजगार गेला. आर्थिक परिणाम तर भयंकर आहेत. जगभरातील शेअर बाजार कोसळले. विमान सेवा, पर्यंटन सेवा ठप्प झाल्या. सामाजिक परिणाम म्हणजे लोकांचे एकत्र येणे कमी झाले. लहान मुलांना अन वयस्कर लोकांना तर घराबाहेर पडायची देखील बंदी. तोंडाला मास्क, sanitizer, सतत हात धुणे. अक्षरश:जीव मुठीत धरून जगण्याची पाळी २०२० च्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत होती.
कोणतेही संकट नवीन संधी घेऊन येते. या संकटाने देखील बऱ्याच संधी निर्माण केल्या. निराशेच्या काळात आशेचा आधार मिळाला.
१) वर्क फ्रॉम होम (WFH)/ घरी बसून काम करायला संधी मिळाली. माझ्या व्यावसायिक आयुष्यात पहिल्यांदाच सलग एवढा वेळ घरी बसून काम करावे लागले. अर्थात संगणक क्षेत्रातील लोकांना याचा फायदा मिळाला. आता तर असे म्हणत आहेत की पुढील काही वर्षे घरी बसूनच काम करावे लागणार आहे. संगणकच नव्हे तर बाकी इतर क्षेत्रात देखील याचा वापर सुरु झाला आहे. कंपन्यांना त्यांचे काम वेळेवर मिळतंय आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळ लवचिक ठेवण्याची संधी.
२) कुटुंबासाठीचा वेळ - या वर्षात दमलेल्या बाबाची कहाणी ऐकूच आली नाही. बाबा सतत घरीच. त्यामुळे मुलांना आई बाबा सोबत छान वेळ मिळाला. हे २०२० मधील काळ्या ढगाची रुपेरी किनार होती/अजूनही आहे. मुलांना आई बाबांचा सहवास मिळणे, सगळ्या कुटुंबाने एकत्र वेळ घालविणे ही खूप सुंदर आणि अमुल्य गोष्ट आहे. भारतात तर खेडोपाडी इंटरनेट सुविधा जाऊन पोचली. कित्येक शहरी कर्मचाऱ्यांनी गावाकडे राहून काम केले. जग हे global village झालंय असे जाणवले. आणखीन काही वर्षांनी तर शहरात स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही इतपत हा बदल होईल.
३) घरपोच सामान/ drive through pick up - कितीतरी नवीन प्रकारचे रोजगार निर्माण झाले. online खरेदी वाढली. त्यामुळे घरपोच सामान आणि जीवनावश्यक वस्तू पोचवण्याची सुविधा निर्माण करावी लागली. गरज पडली की लोकं नवीन बदलाला सामोरे जातात याचे प्रत्यक्ष अनुभव आले. अमेरिकेत तर लोकांनी घरी भाज्या पिकवल्या, घरातील रंगकाम, सुतारकाम, गवंडी काम स्वतः केले. त्यामुळे DIY साठी उपयुक्त साहित्य विकणाऱ्या दुकानात लोकांच्या रांगा लागल्या.
४) द्रुकश्राव्य माध्यमे - झूम मीटिंग, नेटफ्लिक्स, युट्युब सारख्या कंपन्या एकदम प्रकाशझोतात आल्या. कित्येक माध्यमांनी मोबाईल ऍप्स च्या साहाय्याने मनोरंजन सुरु ठेवले. बऱ्याच लोकांनी स्वतःचे युट्युब चॅनेल सुरु केले. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्याचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आणि त्याचा बराच वापर या वर्षात झाला.
५) सामाजिक जबाबदारीची जाणीव - या निमित्ताने सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. किमान मास्कचा वापर करणे, स्वच्छता करणे, ६ फुटांचे अंतर ठेवणे, आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे वैगरे वैगरे. कुणा परिचित व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर त्याचा किराणा माल भरणे, भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू आणून देणे असे अनुभव देखील खूप लोकांना आले. (हे सर्व मी सामान्य नियम पाळणाऱ्या लोकांबाबत लिहितो आहे. आपण बरेच अपवाद देखील बघितले असतील.)
६) कृतज्ञतेची भावना (gratitude)- या कालावधीत कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. कोविड योद्धा (डॉक्टर, नर्स, पोलीस, सार्वजनिक सेवेतील कर्मचारी, अग्निशमन दल) यांचे अविश्रांत श्रम, सामाजिक जनजागृती करणारे लोक, जबाबदार राजकीय नेतृत्व यांच्या बद्दल असलेला आदर आणखीन दुणावला. टाळ्या, थाळ्या वाजवून, मेणबत्त्या प्रज्वलित करून यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केला गेला. कुटुंब म्हणून असलेली नात्याची वीण आणखीन घट्ट झाली. किमानपक्षी आज मला जेवायला मिळाले, राहायला घर आहे, डोक्यावर छप्पर आहे, प्रकृती उत्तम आहे अशा इतरवेळी कमी महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीबद्दल आत्मीयता निर्माण झाली. कितीतरी लोकांना आवश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. "सर सलामत तो पगडी पचास" या म्हणीचा प्रत्यय आला.
२०२० च्या पहिल्या ६ महिन्यामध्ये आम्ही घरी भाजी पिकविली. थोड्या प्रमाणात का होईना पण निदान बीज ते फळ हा प्रवास अनुभवता आला. घरात रंगकाम केले. स्वतः साठी नवीन टेबल बनवले. नवनवीन पदार्थ करून बघितले (यात जास्त वाटा सौभाग्यवतींचा आहे).उन्हाळ्यात रोज न चुकता चालण्याचा उपक्रम केला. युट्युब वर बरेच छान छान मुलाखती बघायला मिळाल्या. त्यात प्रामुख्याने स्पृहा जोशी यांच्या चॅनेल वर "खजिना", स्मृतिगंध वरील "साज तरंग", राहुल देशपांडे यांची दर आठवड्याला प्रसारित होणारी नवनवीन गाणी (Cover versions). भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर यांचे विश्लेषणात्मक व्हिडिओ, सायली राजाध्यक्ष, प्रशांत कुलकर्णी (हलकं फुलकं वाले), मानसिक विश्लेषण करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ब्लॉग्स..ही यादी बरीच लांब आहे.
या कालावधीत थोडा आयुष्याचा वेग कमी झाला अन स्वतः कडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला.
तुम्हाला २०२० मध्ये काय काय सापडले? तुम्ही हा कालावधी कसा व्यतीत केला? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
No comments:
Post a Comment