प्रत्येक जण नवीन वर्षाच्या सुरवातीला नवनवीन संकल्प करत असतो. काही संकल्प हे वर्षानुवर्षे सुरु असतात. जसे की वजन कमी करणे, रोज व्यायाम करणे, पुस्तक वाचणे इत्यादी इत्यादी. मी पण करतो. गेल्या काही वर्षांच्या वैयक्तिक अनुभवातून असे दिसत आहे की मी आरंभ करतो, पण काही कालावधी नंतर उत्साह निघून जातो अन त्या नंतर तो छंद/सवय देखील नाहीशी होते. डिसेंबर महिना आला की त्या सर्वांची परत आठवण येते अन कालचक्र तसेच सुरु रहाते.
समर्थ रामदास म्हणतात तसे "आधी केले, मग सांगितले". काही दिवसांपूर्वी atomic habits नावाचे पुस्तक ऐकले. अर्थात या पुस्तकाविषयी बरेच वाचले होते. मला ते आवडले. त्यातील काही गोष्टी मी २०२० मध्ये आधीच केल्या होत्या. जसे की social media चा कमीतकमी वापर करणे. मी या वर्षी मे-जून मध्ये पूर्ण महिनाभर तोंड पुस्तकापासून दूर होतो. आजकाल तर मी २ आठवड्यातून एकदा चक्कर टाकतो. त्याचा फायदा स्वतःसाठी अधिक वेळ देण्यात घालवला. नखे कुरतडण्याची वाईट सवय बंद झाली. योगासने आणि व्यायामात सातत्य आणले. गेल्या दीड वर्षात मी १० किलो वजन कमी केले. वजन कमी होणे हे व्यायामातील सातत्य या प्रक्रियेचे बक्षीस आहे. सातत्य निर्माण करणे/होणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
काहीतरी नवीन करायला हवे
वर्ष नवे, संकल्प नवे, काहीतरी नवीन करायला हवे..
कोण जाती gym, कोण करते swim,
बऱ्याच जणांना व्हायचे असते स्लिम आणि ट्रिम
कोण काढी फोटो, कोण करे painting,
कोण करतो लेखन,कोण करे gardening,
या काही दिवसांत, असंख्य संकल्पांचे उडतात थवे,
काहीतरी नवीन करायला हवे..
संकल्पांची फुले, काही फुलतात, काही सुकतात,
त्यांना खतपाणी द्यायला हवे, काहीतरी नवीन करायला हवे..
नवीन संकल्प, काही टिकतात, काही विरतात,
काही चालतात, काही टाकतात,
काही जानेवारी नंतर एकदम डिसेंबर मध्ये लक्षात येतात,
काही संकल्प नुसते उत्साहाचे झरे,
काहीतरी नवीन करायला हवे..
काल काहीसे स्फुट लिहताना "शुभास्ते पंथानः संतु" हे संस्कृत मधील सुभाषित वाचनात आले. माझ्या २०२१ मधील पहिल्या ब्लॉग चे नाव मिळाले. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या २०२१ मधील नवीन संकल्पाना डिसेंबर पर्यंत सातत्य राहो. तुमचे या वर्षातील संकल्प नक्की कळवा.
- अभिजीत जोशी
३ जानेवारी २०२१
No comments:
Post a Comment