Tuesday, 22 November 2016

पैशांना फुटती पाय

पैशांना फुटती पाय
सरकारने काही दिवसांपूर्वी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बंद केल्या. पहिल्यांदा हा निर्णय ऐकताना धक्काच बसला. ध्यानीमनी नसताना एकदम असा निर्णय...मग त्यानंतर आतापर्यंत बऱ्याच प्रतिक्रिया, बातम्या, वर्तमानपत्रे, सामाजिक कट्टे, दूरदर्शन इत्यादी वरून बरीच मते ऐकली, वाचली बघितली. काळा पैसा हा विषय इतक्या सहजपणे चर्चेत आला की त्यावर लोक तुटून पडू लागले. पहिले काही दिवस तर atm आणि नजर जाईल तिथंपर्यंत भल्यामोठ्या रांगा, हळूहळू रांग पुढे सरकते तर चलन संपते. मग रांगेतील लोकांना होणार त्रास, आतापर्यंत गेलेले जीव, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न, व्यापारी, लघु व्यायसायिक यांच्या धंद्यावर झालेला परिणाम या गोष्टी बऱ्याच चघळल्या गेल्या. देशभक्ती, देशद्रोह, आताताई (बंगालच्या ताईंना वाटलेला)निर्णय, हातावरच्या पोट असलेल्या लोकांनी कसे जगायचे? असे बरेच प्रश्न निर्माण झाले. बघता बघता गल्लोगल्ली अर्थशास्त्रज्ञ निर्माण झाले. हा निर्णय चांगला की वाईट हे काळच ठरवेल. असा सर्व सामान्यांशी रोजच्या जगण्याशी निगडित असलेला निर्णय घ्यायला मोठे धाडस लागते.
काळा पैसा ही अशी गोष्ट आहे की काही छोटासा जरी अवधी मिळाला तरी त्याला पाय फुटतात. अन मग न्यूटनच्या ऊर्जेच्या नियमाप्रमाणे काळा पैशाचे रूपांतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होते. काळा पैसा काही लोक निर्माण करतात. फक्त काही लोकांनाच, कुणालाही न कळता दुसऱ्या प्रकारात रूपांतर करणे इतक्या बेमालूमपणे जमते की न्यूटन आता हयात असता तर त्याने देखील डोक्याला हात लावला असता. काही ऋणभारित कणांना (electrons)  या काळ्या जादूची (बंगाली नव्हे) ऊर्जा इतकी पछाडते की स्व:ताची कक्षा ओलांडून ती केंद्रस्थानी पोचते. (विज्ञानाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही) असो...
या निर्णयाची अंमलबजावणी करताना, सामान्य नागरिक सोडला तर बाकी कुणाचीच साथ दिसली नाही. पल्सपोलिओ लसीकरण मोहीम जशी यशस्वी केली तसे या वेळीही करता आले असते. ज्या लोकांच्याकडे बँक खाते नाही, त्यांना आधार कार्ड असेल तर लगेचच खाते उघडता येईल. रोकड नसेल तर दुसरे कोणते उपाय वापरता येतील? त्याचा फायदा, तोटा इत्यादी माहिती देखील प्रसिद्ध करता आली असती. दूरदर्शन वगळता बाकी कोणत्याच वाहिनीने या विषयावर सतत माहिती पूर्वक कार्यक्रम दाखवले नाहीत.(कदाचित सरकारी जाहिराती मिळाल्या नसतील) बऱ्याच वाहिन्यांनी जनसामान्यात गोंधळ उडवून टाकण्याचे काम मात्र चोख पार पाडले. खरे तर ३० डिसेंबर पर्यंत अवधी असताना एकदम सर्व लोकांनी बँकात, ATM समोर गर्दी करण्याचे हे एक कारण असू शकेल.
कदाचित येत्या काही महिन्यात सर्वत्र रोकड विरहीत (कॅशलेस) व्यापार, व्यवहार होतील अशी अपेक्षा आहे. जेवढी जास्त लोक बँक खात्याशी जोडली जातील, तितके चांगलेच आहेत. भाकरी का करपते, घोडा का अडतो आणि अर्थचक्र का ठप्प होते? न फिरवल्यामुळे...पैसा फिरला तर अर्थचक्र सुरळीत होते. असो... आता इथेच थांबतो...शेवटी जाता जाता पटकन सुचलेल्या काही ओळी...
पैशांना फुटती पाय, कसे काय? कुठे काय?
टेबलाखालून, पानपट्टीवर, घोटाळ्यातून, हातभट्टीवर,
कर चुकवला, हिशोब कटवला, काटा मारला, कालवा फोडला,
या धरणातून, त्या धारेवर, निवडणुकीच्या या तिकिटावर,
पैशांना फुटती पाय...कसे काय? कुठे काय?
बंगले कुठले, कुठल्या जमिनी, चौकातल्या पोस्टरवर, नमस्कार माता अन भगिनी,
लिननचे कपडे, कडक इस्त्री, रे-बॅन चा गॉगल अन कोरड्या जमिनी...
रोज करतो कल्ला, सोबत सारा मोहल्ला,
रिकामटेकड्या पोरांसोबत, नुसताच हल्लागुल्ला...
अचानक एक निर्णय होतो, नोटांचे मूल्य शून्य होतं...
न मिळतो अवधी, काळ्या पैशाची होते रद्दी...
इतक्या नोटांचे काय करायचे? कुठे जमा करायचे? कसे दाखवायचे?
पंटर होती गोळा, ४० टक्क्यांचा भाव बोला, रांगेत उभे राहून, रंगतो ४ हजारांचा सोहळा,
सोनार वाढवतो भाव, नातेवाईकांचा होतो ठाव, अडीच घरांच्या चालीत,
पैशांना फुटती पाय, कसे काय? कुठे काय?
-- अभिजीत जोशी
२२ नोव्हेंबर २०१६
(तुमच्या प्रतिक्रिया नक्की इनबॉक्स करा/ कळवा)
#demonetisation




No comments:

Post a Comment