Sunday, 28 September 2014

थेट टाईम्स स्क्वेअर वरून....!!!


मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी गेले २ दिवस न्यूयॉर्क मध्ये आहेत. त्यांच्या भाषणे ऐकायला प्रचंड गर्दी आहे. एखाद्या रॉकस्टारला देखील कधी मिळाली नसेल एवढी लोकप्रियता त्यांना इकडे मिळती आहे.
त्यांचे मेडिसन स्क्वेअर प्रेक्षागृहातील भाषण ऐकायला आम्ही देखील लॉटरी मध्ये नाव समाविष्ट केले होते, दुर्दैवाने आम्हाला काही भाग्यवान सोडत मिळाली नाही. म्हणून त्यांचे भाषण ऐकायला आम्ही टाईम्स स्क्वेअर येथे जायचे ठरवले. PATH ने ३३व्या रस्ता स्थानकात उतरलो. पुढे १० ब्लॉक चालत जायला लागते. जाताना वाटेत भरपूर घोषणा सुरु होत्या. एकंदरीत भन्नाट वातावरण होते. वाटेतच आम्हाला समदु:खी लोक मिळत गेले. साधारण १५ मिनिटात आम्ही टाईम्स स्क्वेअर येथे पोहोचलो. सकाळचे ११. १५ वाजले होते. लोकांना बराच उत्साह होता. मोदींचा दौरा वार्तांकन करण्यासाठी भारतातून खूप सारे पत्रकार आले आहेत.
 न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअर म्हणजे नुसता झगमगाट. बऱ्याच कंपन्यांच्या चलत चित्र जाहिराती इकडे सदैव सुरु असतात. त्यातीलच एका मध्यवर्ती, मोठ्या आकडीय पडद्यावर (डिजिटल स्क्रीन) वर त्यांच्या भाषणाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण सुरु होणार होते. फक्त एकच अडचण होती, डिजिटल स्क्रीन सोबत ध्वनिक्षेपक नसतो, त्यामुळे तेथील व्यवस्थापकांनी एका दूरध्वनी क्रमांकावर प्रत्यक्ष भाषण ऐकायची सोय केली होती. थोडासा गोंधळ, काहीशी गडबड होती. थोड्याच वेळात थेट प्रसारण सुरु झाले. अमेरिकेतील उच्चपदस्थ स्थानापन्न होत होते. भारतीय नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी ११.५० वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. ते येताच त्यांच्या नावाचा जयघोष सुरु झाला. आम्ही देखील खूप साऱ्या घोषणा दिल्या. बऱ्याच वृत्त वाहिन्यांनी (news channels) त्यांचे वार्ताहर, कॅमेरा व प्रत्यक्ष प्रसारण सुविधेसह (Live Telecast) टाईम्स स्क्वेअर येथे तैनात केल्या होत्या.
मोदींचे आगमन होताच प्रथम अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाले. त्यानंतर लगेचच भारतीय राष्ट्रगीत सुरु झाले. न्यूयॉर्क मध्ये, ते देखील टाईम्स स्क्वेअरला जन गण मन म्हणताना उर अभिमानाने भरून आला.
राष्ट्रगीत संपताच पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु झाले. त्यांनी सुरुवातच भारत माता की जय ही घोषणा देऊन केली आणि एकेक शब्द हृदयापर्यंत पोचत गेला. पुढील एक तास हा नुसता आत्मविश्वासाने भारून गेला.
या माणसाकडे लोकांशी समरस होण्याची एक वेगळीच कला आहे. आत्मविश्वास, भाषेवर प्रचंड प्रभुत्व, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान अन दुर्दम्य आशावाद…त्यांच्या शब्दातून भारताचे उज्ज्वल भविष्य आपसूक डोळ्यासमोर उभे रहाते. आपण सर्व मिळून भारताचा विकास करू शकतो, हे सहज शक्य आहे. किती समर्पक शब्दात त्यांनी सांगितले…आपण जे काम करतो त्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रत्येक छोटी छोटी गोष्ट बराच मोठा परिणाम करू शकते हे दाखवून द्या. महात्मा गांधीच्या "कर के देखो…" या वाक्याला समर्पक बरीच उदाहरणे दिली गेली. नुकत्याच यशस्वी झालेल्या मंगळ मोहिमेबद्दलचा अभिमान देखील या भाषणातून दिसून आला.
येथील स्थायिक भारतीय लोकांना भारतात येण्याचे आवाहन करतानाच सरकार अन निर्णय प्रक्रियेमधील वेग वाढवण्याचे संकेत देखील या भाषणातून दिले गेले. सरकार व त्यातील निर्णयांचे दाखले देताना जन धन योजना, मेक इन इंडिया इत्यादी गोष्टी तर सांगितल्याच पण सरकार आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग देखील वाढवता येईल. आता जास्तीचे काही लिहित नाही, तुम्ही प्रत्यक्ष हे भाषण ऐकले असेलच.
खूप दिवसांनी एवढे सकारात्मक उर्जेने भरलेले भाषण ऐकून मन भरून आले. भारतीय लोकांना उत्साह तर मिळालाच पण बऱ्याच विदेशी नागरिकांनी देखील विचारले की हे काय सुरु आहे? तुम्ही एवढ्या संख्येने इकडे कशासाठी आला आहात? त्यांना उत्तरे देता देता आम्हाला पण खूप भारी वाटत होते. We were feeling proud to tell about India and recent changes. गंगा शुद्धीकरण, स्वच्छ भारत अभियान इ. बदल ऐकून त्यांना पण आश्चर्य वाटले. हो भारत बदलतोय आणि आम्ही बदलत्या भारताकडे सकारात्मक नजरेने पाहतोय.
भाषण संपले. Standing Ovation अन टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
 टाईम्स स्क्वेअरला काही लोकांनी मोदींच्या सन्मानाप्रित्यर्थ काही मिठाई वाटली होती. भाषण संपताच मिठाई खाउन बऱ्याच लोकांनी त्याचा कचरा तिकडे टाकला. आमच्यातीलच काही लोकांनी "स्वच्छ भारत" या संकल्पाला सुरुवात करत तो कचरा गोळा केला अन लगेचच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली. या घटनेचे Times Now या वाहिनीने प्रसारण केले.
आज नुसतेच भाषण ऐकले नाही तर कृती करून नवीन सुरुवात देखील केली.
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले", असे का म्हणतात, त्याचा आज प्रत्यय देखील आला…!!

No comments:

Post a Comment