Wednesday, 12 October 2011

माझ्या घराच्या खिडकीतून चंद्र दिसतो.....

माझ्या घराच्या खिडकीतून चंद्र दिसतो...कालच पोर्णिमा होऊन गेली...निरभ्र आकाशात फक्त त्याची एकट्याचीच सत्ता...
चंद्राला कवींनी प्रेयसीची उपमा का दिली आहे ते कळतच नाही...कदाचित त्याचे वागणे पोर्णिमा आणि अमावास्येसारखे....प्रेयसी सारखेच जणू...कधी काय मनात असते ते तिलाच माहिती...
पण पूर्ण चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र हा सुंदरच दिसतो...मग त्याची शीतल किरणे तलावाच्या पाण्यावर पसरोत किंवा रुक्ष मनावर...
तलम हळुवार पसरत जाणारे त्याचे वलय मनोहारी दिसते...त्याला जर निरभ्र आकाश असेल तर क्या कहने...
दगडाला पण कविता सुचेल...मनातून खूप आनंददायी भावना निर्माण करतो हा चंद्र...
कोजागिरीच्या चंद्राकडे बघून तर खूप मस्त वाटते...
माझ्या घराच्या खिडकीतून चंद्र दिसतो..
कधी बघून हसतो..कधी चिडतो...कधी कधी खूप वेड्यासारखाच वागतो...
कधी चंद्र खूप बोलतो..शीतल प्रकाश पसरतो..
जणू वाटते तूच बोलते आहेस माझ्याशी...
अशीच शीतल...मन शांत करणारी...
कधी चंद्र लपंडाव खेळतो...ढगांशी, वाऱ्याशी अन माझ्याशी पण...
हळूच ढगाआडून वाकुल्या दाखवतो..तुझ्यासारखाच खट्याळ अन अवखळ...
तू जशी चिडतेस..तसा तो ही चिडतो...
मग चिडून गायब होतो..
विरहातली हुरहूर अन मनाची चिडचिड..
त्यालापण जाणवते अन लगेच प्रतिपदेला उगवतो..
मी समजूत काढली की तू जशी हसतेस..तसा तो ही हसतो..तुझ्या कपाळावरील चंद्रकोरी सारखा..

मला तुझी आठवण आली की मी चंद्राकडे बघतो..अन चंद्र तुझ्याकडे...
अगदी आरशाचे काम करतो हा..क्षणभर तुझे रूप दाखवतो अन लगेच नाहीसा होतो..
चंद्र...समुद्राला उधाण आणतो...
कवींना कल्पनांची प्रेरणा देतो..
राधेला बावरा करतो
अन युगलांना भावी आयुष्याची स्वप्ने दाखवतो..
अजूनही बघ खिडकीतून...दिसत असेल तुला...पहाटे अस्ताला जाणारा चंद्र...
रात्र सारी जागवून दिवसा विश्रामणारा चंद्र...
बघ तुझ्या मनाला विचारून...चंद्र हळूच मनात डोकावून जातो...
विचारांच्या तरंगाना शांत करून...हळूच डुलकी काढतो...
माझ्या घराच्या खिडकीतून चंद्र दिसतो.....
-- अभिजीत जोशी - कोजागिरी पोर्णिमा..११/१०/२०११

No comments:

Post a Comment