Tuesday, 20 October 2026

नवरात्री २०२६ - तोच चंद्रमा नभात

 तोच चंद्रमा नभात…


तुम्हा सर्वांना दसरा, विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी सलग दहा दिवस लिहायला जमले नाही. पुढील नवरात्रात नक्कीच हा उपक्रम सुरु ठेवेन. 

आजच एक गाण्याचा कार्यक्रम बघत होतो. त्यात वादळवाट या मालिकेच्या शीर्षक गीताचे नवीन अंतरे ऐकले. खूप मस्त लिहिले आहेत आणि गाण्याच्या मीटर मध्ये मस्त बसतात. 

त्यातच “तोच चंद्रमा नभात” हे शांता शेळके यांनी लिहिलेले आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेले गाणे ऐकत होतो. 

हे एक प्रकारचे विरहगीत आहे. सर्व काही असूनही मनात सलणारी एक खंत आहे. 

हे नाते प्रेमभंगाच्या अगदी शेवटच्या वळणावर आले आहे. 


तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,

एकांती मज समीप तीच तूही कामिनी


नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे, 

छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे,

जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, 

एकांती मज समीप तीच तूही कामिनी ।।१।।


सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे?

मीही तोच, तीच तूही प्रीती आज ती कुठे?

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी,

एकांती मज समीप तीच तूही कामिनी ।।२।।


त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा,

वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा,

गीत ये न ते जुळून, भंगल्या सूरातुनी,

एकांती मज समीप तीच तूही कामिनी ।।३।।


आणि अचानक जर प्रियकराला वाटले की ती परत येईल आणि आपल्या प्रेमाला नवीन झळाळी येईल. तर काय लिहिता येईल? 


आता हे पौर्णिमेचे गाणे आहे. चंद्राचा शीतल प्रकाश सगळीकडे पसरला आहे. अशा वेळी प्रियकराला एक आशा वाटते आहे की काहीतरी चमत्कार होईल. बघूया तरी आपण आर्त साद घालून. न जाणे ती येईल.


भरल्या या चांद राती, प्रीती दाटते उरी,

तू असशी पैलतीरी, मी इथे अधांतरी,

ये जवळी तू सखये, पाश सर्व सोडुनी,

एकांती मज समीप, तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी ।।४।।

तोच चंद्रमा नभात..!!


हे शब्द चालीवर म्हणून बघा. कसं वाटतंय?


अभिजीत जोशी 

दसरा - २० ऑक्टोबर २०२६


No comments:

Post a Comment