मागच्या वर्षी आम्ही आइसलँड देशात फिरायला गेलो होतो. या देशाला खलाशांचा देश किंवा "Land of Viking" असे देखील म्हणतात. पश्चिम युरोपातील या देशावर कित्येक शतके डेन्मार्क या देशाचे राज्य होते. पहिल्या महायुद्धानंतर या देशाला स्वतंत्रता मिळाली. साधारण भारतासारखाच या देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. आइसलँड त्याच्या नावाप्रमाणे सदैव बर्फात असणारा देश आहे. बाकीच्या उत्तर ध्रुवीय (Nordik Conutnries such as Norway, Sweden, Denmark, Finland and Greenland) देशांप्रमाणे इथे देखील अतिशय थंड तापमान असते. इथेही ध्रुवीय प्रकाश (Northern Lights), ध्रुवीय वादळे, हिमवर्षाव होत असतात. वर्षातील ८-९ महिने बर्फ आणि फक्त ३-४ महिने उन्हाळा असं विषम वातावरण इथे असते. उन्हाळ्यात ३-४ महिने पर्यटनाचा सिझन असतो.
या देशातील पर्यटनाला बॉलीवूड मुळे चांगलाच हातभार लागला आहे. रोहित शेट्टीच्या दिलवाले चित्रपटातील "रंग दे तू मोहें गेरूआ" या गाण्याचे चित्रण आइसलँड मध्ये झाले आहे. मला वाटतंय जसा इंटरलाकन मध्ये यश चोप्रा यांचा पुतळा बसवला आहे तसाच काही वर्षांनी रोहित शेट्टीचा देखील इथे सन्मान मिळेल. या देशाच्या भौगोलिक वैविध्यामुळे इथे बाकीच्या युरोप सारखी वाहतूक व्यवस्था नाही. तुम्हाला प्रवास हा बसने किंवा रेंटल कारने करावा लागतो. या देशात एका बाजूला अतिशय थंड अशा हिमनद्या (Glaciers) आढळतात तर दुसऱ्या बाजूला ज्वालामुखी. बऱ्याच ठिकाणी भूगर्भातून धूर येताना दिसतो. काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे देखील आहेत. इथला ज्वालामुखी तर दर ४-६ महिन्यांनी जागृत होतो आणि गरम गरम लाव्हा पसरत जातो.
आम्ही जून महिन्यात जायचे ठरवले होते. जून जुलै मध्ये साधारण ११ डिग्री तापमान असते आणि जवळपास २१ तासांचा दिवस असतो. १५ जून ते १५ जुलै पर्यंत तर सूर्य मावळत नाहीच २४ तास लख्ख सूर्यप्रकाश. त्यामुळे घरात कृत्रिमरीत्या अंधार केला जातो. आम्ही केफलाविक (Keflavik) विमानतळावर उतरलो. विमानतळापासून रेकवीक (Reykjavik) साधारण ५० किलोमीटर दूर आहे. हे शहर आइसलँड ची राजधानी म्हणून ओळखले जाते. गंमतीची गोष्ट म्हणजे या देशातील ५२% लोक हे रेकविक मध्ये राहतात. इथल्या विषम हवामानामुळे खेड्यापाड्यांवर अतिशय विरळ वस्ती आहे. मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय. अतिशय थंड तापमान असल्यामुळे इथे कोणतेही पीक/धान्य उगवत नाही. अन्नधान्यासाठी हा देश बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे जगातील सर्वात महागड्या देशामंध्ये याचा समावेश होतो.
आम्ही इथे रेंटल कार घेऊन भ्रमंती करणार होतो. या खेपेला फक्त पश्चिम आणि दक्षिण भाग बघायचा असे ठरवले होते. जूनचा पहिला आठवड्यात उत्तरेकडचे काही भाग अजून ही बर्फात होते. त्यामुळे तिकडे जाणे आम्ही टाळले. इथे रेंटल कार घेताना पूर्ण इन्शुरन्स घेणे चांगले असते. तुम्ही जर डोंगर दऱ्यात जाणार असाल तर ४x४ गाडी घेऊन जाणे सोयीचे ठरते. आम्ही पहिले ३ दिवस दक्षिणेच्या टोकाला म्हणजे "विक" या गावात राहणार होतो. या गावापासून "Black Sand Beach/ Reynisfjara beach " आणि "Diamond beach" जवळ आहेत. तसेच बरेचसे धबधबे देखील अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत.
आम्ही Air-BNB केले होते. ती एक छोटीशी केबिन होती. घरातून समुद्राचा आणि डोंगराचा भन्नाट देखावा दिसत होता. मुख्य म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त खूप छान दिसत होता. आम्ही केबिन कडे यायच्या आधी दूध, ब्रेड आणि मुख्य म्हणजे चहासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणल्या होत्या. सगळ्या सामानाची आवराआवर करून आम्ही मस्त चहा केला. उद्या सकाळी लवकर उठून आम्ही डायमंड बीचला जाणार होतो. (क्रमशः )
-- अभिजीत जोशी,
६ ऑक्टोबर २०२४
No comments:
Post a Comment