![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGyA_LP8XsOzBQ5F4DtI-b3xaES3d1WMAZfL4RKvXzB1k3Mhth0Qf8mI0Aiu6-tnj0YagMMfT0O3ogFS8fClh3h5lUkkt3gnnbxGmJ0bMsXDbw6q0yFGK_JVCQ__u2Skif2hSZI7EdmxpEQmLLExfWzDN59Z958fCSfW2o9SwhQw_aV3LMJTjhvDsdZFQZ/s320/FumblePicture.jpg)
फंबल, जंबल अणि विडंबन हे तिन्ही प्रकार म्हणले तर एकमेकांशी निगडित आहेत. रंगमंचावर काम केलेल्या किंवा करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला विचारा. त्याच्या आयुष्यात किमान एकदा तरी फंबल आणि जंबल हे झालेले असतातच. त्यात आपली मराठी भाषा म्हणजे तुम्ही म्हणाल तशी ती वळते. याच भाषेचा आधार घेऊन दादा कोंडक्यांनी अनेक विनोदी चित्रपट गाजवले.
फंबल म्हणजे शब्दांचा गोंधळ. कधी कधी वाक्ये मोठी असतात. कधी शब्द अवघड असतात. कधी ऐनवेळी शब्द आठवत नाही. आणि त्याजागी कुठला तरी वेगळाच शब्द कलाकार म्हणतो. त्यातून बऱ्याचदा हास्यनिर्मिती होत असली तरी सादर करणाऱ्याला मात्र ती मोठी चूक वाटते. मी देखील एका कार्यक्रमात गाण्याचे काही शब्द विसरलो होतो आणि त्याची सल पुढे २-३ दिवस होती.
एकदा एका लहान मुलांच्या नाटकात शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग होता. सगळी छोटी मुले काम करत होती. त्यात संवाद असा होता, " मातोश्री, आम्ही शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला लाल महालातून पळवून लावले." त्या छोट्या मुलाला शाहिस्तेखान हा शब्द आठवला नाही. तिथे न अडखळता म्हणाला, " मातोश्री, आम्ही शाहरुख खानाची बोटे छाटून त्याला लाल महालातून पळवून लावले." एकदम प्रेक्षकांमध्ये हास्याची लहर उठली. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या छोट्या कलाकारासाठी जोरात टाळ्या देखील वाजवल्या.
गाणी म्हणताना तर असे खूप प्रकार होतात. एकदा एक गायक "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो " हे गाणे म्हणत होता. त्याला निरंतर हा शब्द आठवला नाही तर त्याने चक्क "मानसीचा चित्रकार तो, तुझे मी नंतर चित्र काढतो" असे गाणे म्हणले.
अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमात "धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना" या शब्दांऐवजी "बुंदी तळाना, लाडू वळाना" असे शब्द म्हणले गेले. गायक बहुतेक आचारी असावा.
मराठी मध्ये विडंबन प्रकार खूप आढळतात. काही लोकप्रिय कवितांची विडंबने तर खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य अत्रे यांनी तर चक्क विडंबन कवितांचा झेंडूची फुले नावाचा कविता संग्रह लिहिला. प्रसाद शिरगावकर हे तर विडंबनावर आधारित गाणी आणि कवितांचा विशेष कार्यक्रम करतात.
आजकाल तर कोणत्याही गाण्याची सर्रास विडंबन गाणी (Parody Songs) बनवली जातात. निवडणुकांमध्ये, महत्वाच्या राजकीय, क्रीडा सामन्यात तर लोकांच्या सृजनशीलतेला (Creativity) बहार येते. "Spoofs", "Parody", "Meems" हे social media वर खूप लोकप्रिय आहेत. यशराज मुखाते, अथर्व सुदामे अशी कितीतरी नावे आजच्या घडीला त्यांच्या अशा सृजनशील निर्माण (Creative Content) मुळे प्रसिद्ध झाली आहेत.
असेच एका लोकप्रिय मराठी गाण्याचे केलेले विडंबन. मूळ गाणे - नसतेस घरी तू जेव्हा
असतेस घरी तू जेव्हा, जीव कावरा बावरा होतो,
वाघाचा होतो बोका, अन कोपऱ्यात जाऊन बसतो,
मी निवांत क्षणी असताना, कर्कश आवाज आदळतो,
मेंदूचा होतो भुगा अन कानात भोंगा वाजतो
येतात मित्र दाराशी, हिरमुसूनी परतुनी जाती,
खिडकीशी चोरून बघता, सुटकेचा मार्ग न उरतो,
तव दिठीत लखलखणाऱ्या, मज दिसती ठिणग्या लाखो वेळा,
घशाला पडते कोरड, अन पोटात गोळा येतो,
तू अशी मज बघतेस काय, मी काही नाही केले,
मित्रांचा जीव उदास, माझ्यासाठी तीळतीळ तुटतो,
ना अजून झालो शूर, ना स्मार्ट अजुनी झालो,
तू नसता उमगत जाते, जीव शांत शांत का होतो...
तुम्हाला कोणत्या गाण्याचे विडंबन आठवत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा.
-- अभिजीत जोशी
९ ऑक्टोबर २०२४
No comments:
Post a Comment