Wednesday, 27 February 2013

माय मराठी - स्वाक्षरी

स्वाक्षरी
मी मराठीतून स्वाक्षरी  करतो . मला ही सवय लहानपणापासूनच लागली . याच्यामुळेच मला बऱ्याचदा वेगवेगळे अनुभव आले . आज जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने मला पटकन या गोष्टींची आठवण झाली.
आयुर्विमा खरेदी करताना तर हमखास माझ्या मराठी स्वाक्षरी मुळे  बिचाऱ्या महामंडळाला आणखी एका जाणत्या माणसाची ओळख द्यायला लागते. त्यांच्या नियमानुसार जर तुम्ही भारतीय भाषेतून स्वाक्षरी करत असाल तर आयुर्विम्याचे सगळे नियम व त्यांची माहिती तुम्हाला नीट समजली आहे, असे त्यांना वाटत नाही. म्हणून ज्या माणसाची स्वाक्षरी इंग्रजीतून असेल, त्याला सगळे कळते असा आपल्या आयुर्विमा महामंडळाचा समज आहे. मला वाटते तो अजूनही असावा. असाच अनुभव मला अमेक्सच्या बाबतीत देखील आला. त्यांना देखील मला माझ्या पारपत्राची प्रतिलिपीत सत्यप्रत पाठवून द्यावी लागली. इतकेच नव्हे तर त्यांनी माझी मराठी स्वाक्षरी शहानिशा करण्यासाठी तर एका माणसाला देखील पाठवले होते.
एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी उतरलो. आप्रवासन ( Immigration) मंडळाच्या एका माणसाने तर मला विचारले देखील ," तुम्ही नक्की अभियंता आहात का?" मी विचारले," का? काही शंका आहे का? माझ्याकडे अभियंता असल्याचे प्रमाणपत्र आहे. तुम्हाला बघायचे आहे का?" तर तो म्हणाला," नाही. तुम्ही मराठीतून स्वाक्षरी केली आहे. म्हणून विचारले,"
मराठीतून किंवा इतर कोणत्याही मातृभाषेतून स्वाक्षरी करणे गौण का मानले जाते, मला अजूनही कळाले नाही. या उलट एक खूप छान अनुभव मला फ्रान्स देशात आला . तेथील विश्रामगृहातील माणसाने माझी स्वाक्षरी बघितली. मला म्हणाला," तुमची लिपी सुंदर आहे. तुम्ही मला माझे नाव तुमच्या भाषेत लिहून द्याल का?" मी म्हणालो, " देईन की, त्यात काय. " त्याची जास्त चौकशी केल्यावर तो म्हणाला," आमच्याकडे पण अशीच एक बोलीभाषा होती. काळाच्या ओघात ती नामशेष झाली. सध्या फक्त इतिहासाच्या पुस्तकात किंवा संग्रहालयातील कक्षात ती दिसते. जुन्या काळातील व्यापारी लोकांची ती भाषा. तुमच्या लिपीत आणि त्यात मला साम्य आढळले, त्या निमित्ताने का होईना, जुन्या पिढीशी जवळीक सांगणारे एक नाते दिसले."
हे ऐकून  पटकन एक  विचार डोक्यात आला. आपण जर मातृभाषेला जपले नाही तर आपल्या पुढील पिढीचे चित्र असेच असेल.
जागतिक मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!
- अभिजीत जोशी, २७ फेब्रुवारी २०१३. 

No comments:

Post a Comment